घराणं (भाग 14) ©संजना इंगळे

“काय? 500 करोड? कसं शक्य आहे??”

“शक्य आहे..हे ज्यांनी कुणी केलं आहे त्यांनी खूप हुशारीने दूरदृष्टी ठेऊन हे सगळं केलंय..”

“मला अजून समजलेलं नाही, काय आहे हे नक्की??”

“साधारण 1890 ते 1950 मधला काळ असेल, काही उद्योजकांनी मिळून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची म्हणजेच BSE ची स्थापना केली. शेयर मार्केट म्हणतात ना ते हेच, त्याकाळी याची नुकतीच सुरवात झालेली, आजही लोकं शेयर मार्केट म्हटलं की घाबरतात, नाक मुरडतात.. त्याकाळी तर काय परिस्थिती असेल सांगणही अवघड आहे. त्याकाळी मोजक्या लोकांनी 1-1 रुपया इन्व्हेस्ट केला होता. अर्ध्या लोकांनी घाबरून ते काढूनही घेतले, पण तुमच्या ज्या कुणी पुर्वजांनी हे केलं आहे त्यांनी फार विचारपूर्वक इन्व्हेस्ट केले होते, बऱ्यापैकी रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली..मधल्या काळात कुणीही ते शेयर विकलेल्याची नोंद दिसत नाहीये, आणि त्यामुळेच आज त्याची किंमत 500 करोड झालीये. काही कागदपत्रांची पूर्तता करा, सगळे शेयर विकायला काढा, 500 करोड तुमच्या खात्यात जमा होतील..”

शुभदा हे ऐकून अक्षरशः घडाघडा रडायला लागते, अधिकाऱ्याला हात जोडून ती बाहेर निघून येते. बाहेर जमलेली मंडळी तिला रडताना पाहून कुजबुजायला लागतात..

“पैसे बुडले वाटतं..”

“शहाण्याने शेयर मार्केट ची वाट धरू नये हेच खरं..”

“एक तर शेयर मार्केटचा जुगार, त्यात ह्या बाईने गुंतवणूक केली असणार..आता रडणार नाही तर काय..”

शुभदा काय सांगणार होती त्यांना, आम्ही 500 करोड चे मालक झालोय असं?? लोकांना तरी काय कळणार, शुभदाला किती अनोख्या दिव्यत्वाचं दर्शन झालेलं ते.. शुभदाच्या मनात दुर्गावती विषयी असलेला आदर अन जिव्हाळा अजूनच द्विगुणीत झाला.

परतत असतांना शुभदा विचारात पडते,

“दुर्गावती देवींनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये की त्यांनी शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे ते, इतकं मोठं पुस्तक लिहितांना त्याचा उल्लेख करणं का टाळलं असावं? दुर्गावती हुशार होती, चलाख होती, पुस्तक कुणा दुसऱ्याच्या हाती पडलं असतं अन त्याचा दुरुपयोग झाला असता तर? यात इतकी मोठी संपत्ती आहे हे जर कुणाला समजलं असतं तर पुस्तकासाठी भांडणं झाली असती, मालकी हक्कासाठी भावंडात वाद झाले असते,दुर्गावतीने हे कागद त्यांनाच मिळण्याची सोय केली होती ज्यांनी या पुस्तकाचा शेवटपर्यंत अभ्यास केला अन पुस्तकातलं मर्म जाणून घेतलं.

शुभदाला आठवलं, दुर्गावतीने काही संकेत दिले होते. ती जेनीचा उल्लेख करायची,तिला सगळी माहिती असायची असा उल्लेख दुर्गावतीने केलेला, तसंच ती खूप हुशार होती असंही म्हटलं गेलं होतं. तिच्या सोबत मी बॉम्बे ऑफिसला जायचे असा 3 वेळा उल्लेख केला गेलेला, आणि शेवटी शेवटी “मी पहिल्यांदा ऑफिसच्या आत गेले, अंगठा दिला” असा काहीसा संकेत दिला होता. बॉम्बे ऑफिस म्हणजेच BSE, bombay stock exchange चं ऑफिस. आजही जिथे शेयर मार्केटला लोकं घाबरतात, तिथे 1800 च्या शतकात दुर्गावतीने ती गोष्ट समजून घेऊन आपल्या पुढील पिढ्यांना भरघोस आर्थिक फ़ायदा कसा होईल याचा विचार केला होता. तिची जमापुंजी तरी किती असावी? 50 रुपये? 100 रुपये?? यांची किंमत पुढे कमी होणार हेही ती जाणून होती, म्हणूनच मूल्य वाढवणारी गुंतवणूक त्या काळातल्या गुलामीत वावरणाऱ्या अशिक्षित स्त्रीने इतकी मोठी दूरदृष्टी ठेऊन करावी याहून मोठं दिव्यत्वाचं दर्शन ते काय असेल?

“आज जर दुर्गावती सारखी हुशार अन चलाख स्त्री असती तर? तिने कधीच जगावर राज्य केलं असतं..” शुभदाच्या मनात हा विचार तरळून गेला.

तिकडे दिगंबरपंतांच्या वार्ड मध्ये नेहमीप्रमाणे नर्स त्यांची सलाईन रिफिल करायला गेली. तिच्या कानावर रेकॉर्ड केलेली वाक्य पडली अन शुभदाची चलाखी तिला समजली. दिगंबरपंतांशी जे बोलायचं होतं ते तिने स्तोत्राच्या शेवटी टाकलेलं..पण नर्सने काहीही आक्षेप घेतला नाही, कारण जेव्हा जेव्हा ही वाक्य कानी पडायची तेव्हा तेव्हा माशीनवरील आकडे नॉर्मल व्हायचे. असं बऱ्याचदा झालेलं नर्सने पाहिलं. अखेर तिने एक शक्कल लढवली, रेकॉर्डिंग मधली फक्त ती शेवटची वाक्य सलग सुरू ठेवली, ती संपली की पुन्हा फास्ट फॉरवर्ड करत नर्स ती वाक्य पुन्हा चालू करे..

“संकटं ही माणसाला घडवतात, धीट बनवतात, नव्याने उभी करतात, संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा, पहा आपल्या एकाच कटाक्षाने कसं नामोहरम होतं ते. आपली इच्छाशक्ती ही भल्याभल्या संकटांना गारद करते, हे नेहमी लक्षात असुद्या”

या वाक्यांनी दिगंबरपंतांमध्ये एक शक्तीच संचारे. ते प्रतिसाद देऊ लागले. नर्सने ही गोष्ट डॉक्टर च्या कानावर घातली..डॉक्टर म्हणाले..

“काही वेळा शारिरीक आजारांवर उपाय हा माणसाच्या subconscious mind मध्ये असतो, माणसाची इच्छाशक्ती भल्या भल्या आजारांना दूर करते. हे ज्या कुणी केलं आहे त्याने फार विचारपूर्वक केलं आहे..त्यांना खबर द्या याची..”

दिगंबरपंतांमध्ये त्या वाक्यांमुळे जबरदस्त सुधारणा होऊ लागते. घरच्यांना जेव्हा हे समजतं तेव्हा ते ऋग्वेदला विचारतात..ऋग्वेद पुस्तक अन त्याच्या शोधा बद्दल सगळं काही सांगतो..

“पुस्तक?? अरे त्यामुळेच अरुंधती आई देवाला मिळाली..अन आज दिगंबरपंत त्यामुळेच..”

“नाही नाही..पुस्तकाची चूक नाही..काही वेळा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते अन तो नको त्या गोष्टी करून बसतो..”

नर्स अन डॉक्टर बाहेर येतात..

“तुमच्यापैकी कुणी ती रेकॉर्डिंग दिगंबरपंतांना ऐकवली होती??”

“शुभदाने…का? काय झालं??”

“काय चमत्कार आहे माहीत नाही, पण त्यामुळे दिगंबरपंत फार लवकर recover होताय..”

“पुस्तकाची कमाल आहे ती..पूर्वजांनी दिलेलं ज्ञान कामात येतंय. ”

शुभदा मागून केव्हा आली कुणाला कळलंच नाही. ती काय बोलतेय याचा अर्थ फक्त ऋग्वेद अन रेखालाच माहीत होता. इतरांना किती मोठं रामायण झालं याची काहीही कल्पना नव्हती.

“डॉक्टर… पेशन्ट शुध्दीवर आलेत..शुभदा म्हणून हाक मारताय..”

शुभदा तडक आत जाते..

“पोरी…कशी आहेस??”

“हे मी विचारायला पाहिजे आजोबा.. ”

“माझ्या एका चुकीने घरदार पणाला लागलं गं.. एवढी मोठी आपली व्याप्ती क्षणार्धात मातीमोल झाली…माझ्यामुळे..”

दिगंबरपंतांचा BP हे बोलता बोलता वाढू लागला..

“कोण म्हटलं आजोबा?? तुम्हाला एक सांगू? तुमच्या 15 कोटीच्या नुकसानीची आपल्याला 500 कोटी भरपाई मिळाली आहे..”

“काय काहीही बोलतेस..”

“हे बघा..500 करोड..”

दिगंबरपंत अवाक होतात..

“कसं? कुठे?कुणी?”

“सगळं सांगेन..सर्वांना सांगेन..आधी तुम्ही बरे होऊन घरी चला मग..”

“आत्ताच सांग..इतकी मोठी रक्कम??”

“घाबरू नका..वाईट मार्गाने आलेले नाहीयेत, आणि मी दरोडा वगैरे टाकलेला नाहीये बरका आजोबा..”

दिगंबरपंत खूप दिवसांनी खळखळून हसले..

क्रमशः

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

4 thoughts on “घराणं (भाग 14) ©संजना इंगळे”

Leave a Comment