घराणं (भाग 11) ©संजना इंगळे

तुफानी समुद्रात हरवलेल्या नावड्याला अथक प्रयत्नानंतर किनारा दिसावा तशी अवस्था शुभदाची झालेली, पुस्तकाचा दुसरा भाग तिच्याजवळच होता, अगदी डोळ्यासमोर, अन आता तो मिळालाय समजताच शुभदाची अवस्था गड सर केल्यासारखी झाली. शुभदा अधशासारखे सर्व पान जमा करते, ही पानं पहिल्या भागाच्या पानांपेक्षा सुस्थितीत असतात. दुर्गा मातेचा आशीर्वाद त्यांना असतो. आता कधी या पानांचा अर्थ शोधून काढते असं तिला झालं.

तिचा पुस्तकाचा शोध चालू होता अन घरात प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क होते. दिगंबरपंत जमीन व्यवहाराच्या अखेरच्या टप्प्यात आलेले, रश्मीची आज फिटनेस टेस्ट होती, मीनल चित्रांवर अखेरचा हात फिरवत होती, मेघना तिच्या गॅरेजच्या कामात गर्क होती.

शुभदा पुस्तकाची पानं अनुवादित करायला घेते,

“पांडुरंग फार उपद्व्यापी, दिवसभर नुसता फिरत असतो, याची चौकशी त्याची चौकशी. काय काय माहिती जमा करून आणतो, इथला एक इंग्रज अधिकारी त्याचा मित्र बनला, जिथे इंग्रजांना पळवून लावायचं तिथे याने त्याच्याशीच मैत्री केली, मला तर हे अजिबात पटलं नाही बुवा..पण तो अधिकारी भला माणूस होता, त्याची बायको फार हुशार होती. तिचे रंगेबेरंगी आणि सुटसुटीत कपडे पाहून आपल्या बायकांनाही असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न मला पडला. तिचं येणं जाणं घरी सुरू असायचं, तीही कामं करून पैसे कमवायची म्हणे. मला असा अभिमान वाटला म्हणून सांगू, इथे कुंकवासाठी सुद्धा चाराणे मागताना वाचा थरथरू लागते. ही बाई स्वतः कमावते अन स्वतः सगळं करते. माझ्या लेकरांनो, आपल्या घराण्यातही अशीच रित असुद्या, बायकांना मनापासून स्वातंत्र्य द्या. इथे आमच्या देशाला स्वातंत्र्य नाही तिथे बायकांना काय असणार, पण लवकरच हेही दिवस जातील, भारत स्वतंत्र होईल, पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य येईल. देशाचं स्वातंत्र्य माणसांच्या हातात पण बायकांचं स्वातंत्र्य कुणाच्या हातात आहे? जन्माला येताना प्रत्येक माणूस स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार घेऊन जन्माला येतो, स्वातंत्र्य कुणी कुणाला देत नसतो अन घेत नसतो..पण त्यावर जर संकट आलं तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवणं यात काही गैर नाही. मुलगी झाली की तिला जीणं नको नको करून टाकतात, आता हेच बघा ना, माझ्या मोठ्या जाऊ ला मूल होत नव्हतं, खूप वर्षांनी जुळ्या मुली झाल्या, नंतर मुलासाठी प्रयत्न अपयशी ठरले, माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याच्या अन नातवाच्या नावे बरीच जमीन दिली पण जावेच्या नवऱ्याला अगदी तोकडं दिलं, का तर म्हणे तिला मुलगा नाही, काय करणार एवढी संपत्ती घेऊन. मुलींना देण्याइतपत मोठं मन दाखवलं नाही त्यांनी. माझी जाऊ याच खंतेत लवकर गेली..एकदा भांडून गेलेली, माझ्या मुलींना काहीही दिलं नाही म्हणून, काय चुकीचं होतं म्हणा तिचं.. पण मुलगा नसल्याची खंत आईला समाजच देत असतो. आईला आपलं मूल प्रिय असतं मग ते मुलगा असो वा मुलगी..”

शुभदाच्या डोळ्यासमोर अचानक दोन नंबरच्या सासूबाई रेखा आल्या, त्यांनाही दोन मुलीच होत्या. त्यांचं वागणंही घरात संशयास्पदच असायचं. मला मुली आहेत, मुलगा नाही म्हणून खंत तर नसेल ना त्यांना??

“शुभदा…शुभदा…थँक्स थँक्स खूप खूप थँक्स..”

“अगं रश्मी काय झालं??”

“मी फिटनेस टेस्ट पार केली, माझा प्रशिक्षक एकदम अचंबित झाला..नक्की कशाने इतका स्टॅमिना आला याचं उत्तर शोधतोय तो..आता मी राष्ट्रीय स्तरावर खेळणार…तू मला सूर्यनमस्कार सांगितलेस अन त्यानेच हे सगळं झालं बघ..”

“माझे आभार नको मानू, आपल्या पूर्वजांनी पुण्याई..”

“बरं मी सर्वांना ही खुशखबर देऊन येते..”

शुभदाच्या वाक्याचा अर्थ न समजताच रश्मी जोशात निघून जाते.

शुभदा रेखाचा विचार करते, या लाल कपड्यात काहीतरी खजिना आहे असं त्यांना सांगितलं गेलं असेल, म्हणूनच त्या सर्वांना त्यापासून दूर करताय अन देव्हाऱ्यात कुणालाही जाऊ देत नाही, देवपूजा स्वतःच करताय, पण त्यांना कोण समजावणार की हा खजिना भौतिक नसून वैचारिक आहे. यातील अमूल्य विचार या घराण्याला जिवंत ठेवताय, तेजस्वी ठेवताय, 1800 च्या काळात अनुभवांनी दिलेले सल्ले हे मोलाचे ठरताय. हाच खरा खजिना आहे.

शुभदा पुढची पानं वाचते..

“पांडुरंग चा तो इंग्रज मित्र,त्याची बायको जेनीबाई. मला सांगत होती की तुम्हीही काहीतरी कमवायला हवं, काहीतरी अर्थार्जन करायला हवं. फार हुशार बाई होती बरं ती, इथे आल्यावर 6 महिन्यात इथली भाषा शिकलेली बरं ती. तिला उच्चार करणं अवघड जाई पण आम्हाला अर्थ मात्र समजायचा. तिला मी म्हटलं, बाई इथे आम्हाला दोन वेळचं शिळं का होईना पण खायला मिळतंय हेच खूप आहे, नाहीतर समाजाने तुच्छ वागणूक देणं अन नवऱ्याच्या पायी तुडवलं जाणं यापलीकडे आयुष्य नसतं आमचं. तिला आमची अवस्था पाहून वाईट वाटे अन संतापही होई, ती म्हणायची, आमचं राज्य आलंय आता आम्ही स्त्रियांना चांगले हक्क देऊ. असं वाटायचं की एकीकडे भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी स्त्रियांना काय मिळणार? त्यांना आहेच वर्षानुवर्षे गुलामी. पण माझ्या पुढच्या पिढ्यांनो, स्त्रियांना जर अशी वागणूक दिलीत तर याद राखा”

“माऊली, तुझ्या दिव्यत्वाने या घराण्याची स्त्री गुलामीपासून कधीच मुक्तता झालीय..”

शुभदा मनोमन दुर्गावतीला नमस्कार करते. एवढ्यात ऋग्वेद तिथे येतो..शुभदा पुस्तक चाळत असते, ऋग्वेद येताच ती वळते, तो तिच्या डाव्या गालावरील तिळावर बोट फिरवतो अन म्हणतो,

“दिसला..दिसला माझा वीक पॉइंट..”

“आता जन्मतःच तो आहे म्हटल्यावर..”

“मागच्या जन्मीची खूण असेल..”

“होना..मागच्या जन्मी मला कुणी नजर लावू नये म्हणून टीका लावला असावा, अन या जन्मात देव तो खोडायचा विसरून गेला असावा..”

“बरोबर..थांब मी देवाला सांगून येतो..”

“झालं?? बोल, काय काम काढलं..”

“अरेवा…बायको विचारतेय नवऱ्याला, काय काम काढलं..”

“अरे सॉरी..मी माझ्या कामात इतकी गुंतलेय ना…काय बोलते मी मला काही समजत नाही..”

ऋग्वेद नाराज होऊन सोफ्यावर बसून घेतो..

“काय रे काय झालं??”

“तू पुस्तकाचा शोध घेतेय ना?? काय शोध लागला मग??”

“वेळ आली की सांगेन, पण तुला असं नाराज व्हायला काय झालं??”

“त्या पुस्तकाने तुझा जीव धोक्यात येऊ शकतो..हे माहीत असून मी तुला..”

“गिल्टी वाटून घेऊ नकोस ऋग्वेद, घराण्याची तेजस्वीता टिकवण्यासाठी हे सगळं करतेय मी..आणि विश्वास ठेव, या पुस्तकात जे काही आहे त्यावरून अरुंधती आजी अन पुस्तकाचा काहीही संबंध नाही हेच समजतंय..”

“असं तुला वाटतंय, पण या पुस्तकाची स्वप्न आजीला पडायची, दुर्गे, दुर्गे..वाचव अशी आजी म्हणायची..त्या पुस्तकाला पाहून आजी दचकायची, तेव्हा रेखा आईने ते पुस्तक तिच्याकडे ठेऊन घेतलं आणि पुन्हा कुणीही या पुस्तकाचं नाव काढायचं नाही अशी ताकीद दिली..देवघरात ते ठेऊन दिलं आणि कुणालाही त्याच्याबद्दल बोलायला मनाई केली..”

अरुंधती आजीच्या शेवटच्या काळात रेखा सोबत होती अन तेव्हाच तिने त्या पुस्तकाचा ताबा मिळवला हे सगळं कुठेतरी खटकत होतं. रेखाने उगाच पुस्तकाचं नाव पुढे करून ते कुणीही वाचू नये म्हणून अशी अफवा तर पसरवली नसेल ना?? आजीच्या मृत्यूचं कारण वेगळं असेल पण जाणूनबुजून या पुस्तकावर खापर फोडलं गेलं नसेल ना??

शुभदाला रेखाबद्दल असा विचार करताना वाईट वाटत होतं, पण परिस्थिती तेच सांगत होती..पुस्तकात पुढे लिहिलं होतं..

“मी आज हे लिहिते आहे, पण हे पूर्ण होईल की नाही अन पुढच्या पिढीपर्यंत पोचेल की नाही याची शाश्वती मला नाही, पण तरीही मी जिद्द पकडतेय..जगडीशपंतांना समजलं तर पुस्तकाचे ते दोन तुकडे करून चुलीत टाकतील, पण मी याबद्दल फक्त पांडुरंग अन पद्मिनीला सांगितलं आहे. उद्या काही झालंच तर याचं रक्षण तेच करतील.पद्मिनी वरून आठवलं, तिची मुलगी कांता..खूप गुणी मुलगी..पांडुरंग अन ती अगदी सोबतच वाढले, आता वयात आलेत दोघे, कांता माझी सून व्हावी अशी खूप ईच्छा आहे माझी, पण ही जात कुणी निर्माण केली?? कुणी या भेदाच्या भिंती बांधल्या?? जात आडवी आली नाहीतर दोघांचं लग्न लावून दिलं असतं मी कधीच..अन तशी वेळ आलीच, तर दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन मी, राजस्थान ला माझ्या एकट्या राहणाऱ्या आईकडे पाठवून देईल. जगदीशपंत अन माझ्यासारखा संसार नको त्यांचा, काय मिळालं मला त्यांच्यासोबत?? आयुष्यभर गुलामी अन पदरात पोरं, यापलीकडे बायको म्हणून नाही पण निदान माणूस म्हणूनही वागणूक नाही, पोरांनो अशी चूक तुम्ही करू नका, तुमच्या बायकोला फुलासारखं जपा…”

पुस्तकातल्या सर्व गोष्टी आज अमलात आलेल्याच होत्या..

____

शुभदा काम संपवून जात असताना रेखा अन तिच्या नवऱ्याचे शब्द तिच्या कानी पडतात.

“सगळं आपलंच आहे, तू का पुन्हा पुन्हा कुरकुर करतेस?? तुझ्या एकटीमुळे घराण्याला गालबोट लावू नकोस..”

“मला मुलगा नाही म्हणून ना?? काय पाप केलंय मी? आपला पिढीजात खजिना सर्वांना मिळेल, पण माझ्या मुलींना काय मिळेल?? सर्वजण सून आणतील, नातवंड खेळवतील, खजिना त्यांच्याकडे जाईल, माझ्या मुलींना काय राहील?? त्यांना ना रत्नपारखी नाव राहील ना घराण्याचं नामोनिशाण..”

“मुलगी आहे म्हणून आजवर तुला कुणी हिनवले आहे घरात? उलट लक्ष्मी म्हणून दोघी मुलींना इतक्या प्रेमाने वाढवलं या घराने..आता ऐक माझं, ती चावी देऊन टाक दिगंबरपंतांना..”

“नाही, अजिबात नाही..देव्हाऱ्यात असलेल्या त्या लाल कपड्यातील खजिन्यावर तुमच्या लाडक्या सुनेचा, शुभदाचा डोळा होताच, तिने काही करायच्या आत मी ही चावी माझ्याकडे घेतली..नाहीतर ती खजिना घेऊन कधीच पसार झाली असती..तो ग्रंथ ठेवला मी तिथंच, काही उपयोग नाही त्याचा, पण या चावीने मात्र मोठा खजिना उघडणार असेल, मुलींच्या लग्नात देईन मी त्यांना..”

कसली चावी असेल रेखाकडे? कमेंट करून नक्की सांगा..

क्रमशः

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

7 thoughts on “घराणं (भाग 11) ©संजना इंगळे”

  1. खूपच छान कथानक. मस्त वळण आता या चावीने आणखी काय काय उलगडत ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे 🙏🙏

    Reply

Leave a Comment