गैरसमजाची कीड..!!!

 

वहिनी आणि आईचा वाद टोकाला पोचल्यावर सुनंदा तडक माहेरी गेली. वाद इतका टोकाला पोहोचेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. वहिनी समजूतदार होती, आईही प्रेमळ होती, मग हा वाद कशासाठी? काय कारण असावं? हा विचार सुनंदा पूर्ण प्रवासात करत राहिली.

ती घरी पोहोचली. आत भयाण शांतता होती. आई आणि वहिनी आपापल्या खोलीत. दोघींशीही ती बोलली, दोघीजणी समोरच्याला दोष देत होत्या. अखेर सुनंदा ने दोघींना समोरासमोर आणलं..

“आता जे काही आहे ते समोरासमोर बोला..आई, काय अडचण आहे तुला वहिनीची?”

“त्या दिवशी पाहुणे आले तर कामाचं निमित्त करून ही बाहेर गेली..”

“हो, कारण तुम्हीही माझे आई वडील आले की मुद्दाम बाहेर जातात..”

“आणि त्या दिवशी हिने माझा फोन बंद करून ठेवला मुद्दाम, का तर मी माझ्या मुलाजवळ तक्रार करू नये म्हणून…”

“तुम्ही तर अशीही तक्रार करतातच…फोन मी बंद करून ठेवलेला नव्हता…तुम्हीच सुरवात केली माझ्या नातेवाईकांचा अपमान करण्याची..”

“का नाही करणार? तू सुद्धा तेच करतेस ना?”

“मी कधी अपमान केला?”

“त्या दिवशी…तू किचन मध्ये होतीस आणि माझी बहिण आलेली…तेव्हा म्हणतेस कशी, यांना आत्ताच यायचं होतं का..”

“काय??? मी अशी म्हटलेली नाही..”

“खोटं… मी ऐकलं होतं..”

सुनबाई विचार करते..

“अरे देवा….घ्या… मी फोनवर बोलत होते सुनंदा ताईशी… तिच्याकडे बँकेची माणसं आली होती, मी म्हटलं की यांना आत्ताच यायचं होतं का, आमचं बोलणं रंगात आलेलं तेव्हा….”

“हो आई, वहिनी माझ्याशी हेच बोललेली..”

“अरे देवा…मला वाटलं…माझ्या बहिणीला…”

“पाहिलंस आई? सुरवात तिथून झाली…खरं तर दोघीही वाईट नाही, पण एका छोट्या गैरसमजुती मूळे हे सगळं रामायण घडलं…हे असं मनात राग ठेऊन गैरसमज निर्माण करणं योग्य नाही…”

“सुनबाई, खरं सांगते, मला तूझ्या नातेवाईकांबद्दल काहीही राग नाही…उगाच मला वाटलं की तू तशी वागतेस म्हणून मीही तसंच करत बसले..”

“आणि तुम्ही असं वागल्या म्हणून मीही ईच्छा नसताना तुमच्या नातेवाईकांशी चुकीचं वागले..”

“आता समजलं ना? चूक कुणाचीही नव्हती…आता गैरसमज करून घेत जाऊ नका…काही वाटलं तर मनात ठेवण्यापेक्षा आधी गैरसमज दूर करून घेत जा…”

तात्पर्य: गैरसमजाची कीड नात्यांना पोखरून टाकते, तिला वेळीच प्रतिबंध केला तर नाती टिकतात. 

2 thoughts on “गैरसमजाची कीड..!!!”

Leave a Comment