गृहिणीने दिलं मॅनेजमेंट चं ज्ञान..

रोशन कॉलेज ला जाताना डबा विसरला आणि आईच्या काळजाचा ठोकाच चुकला…रोशनला उपाशी पोटी चक्कर येतात आणि त्याला भूक सहन होत नाही हे आईला माहीत होतं, रोज स्वतःच्या हाताने आई रोशन च्या बॅगेत डबा ठेवत असे. कॉलेज मध्ये कॅन्टीन ची व्यवस्था खूप वाईट होती त्यामुळे विद्यार्थी सहसा तिकडे फिरकत नसत हे आईला माहीत होतं. आज पहिल्यांदा असं झालं की रोशन डबा विसरला. अखेर आईने ठरवलं, काहीही झालं तरी रोशन कडे हा डबा पोचवायचा.

रोशन चे बाबा ड्युटीवर गेलेले..त्यामुळे आईने एकटीने बस पकडली आणि रोशन च्या कॉलेजकडे ती निघाली. कॉलेज तसं बऱ्यापैकी दूर होतं. कॉलेजच्या गेटपाशी आल्यावर तिने कपाळावरचा घाम पुसला, बाहेर भलमोठं नाव लिहिलेलं…”Kantilal Management Institute”
मुलाच्या MBA करण्याचं तिला पुन्हा एकदा कौतुक वाटलं आणि ती आत शिरली, गेटवर तिला watchman ने अडवलं, आई त्याला विनवणी करून डबा द्यायला सांगते..त्याला दया येते…

“मावशी, इतक्या लांब आल्याच आहात तर मुलाला भेटुन घ्या आणि डबा सुद्धा देऊन या….”

आईला आनंद झाला…आई एकेक वर्ग शोधू लागली, गॅलरीतल्या कोपऱ्याचा वर्ग त्याचा आहे असं रोशन ने एकदा आईला सांगितलं होतं…नुकतंच पगार सरांनी वर्गात प्रवेश केला आणि मुलं उठून उभी राहिली… आईने रोशन ला लांबूनच इशारा केला…रोशन पुढे आला आणि सरांना आई आल्याचं सांगितलं आणि आईला भेटण्याची परवानगी मागितली..

पगार सर, अत्यंत रागीट आणि खडूस व्यक्तिमत्त्व. त्यांनी परवानगी तर दिली नाहीच, वर रोशन ला रागवायला सुरवात केली..

“हे बघा, आपल्या वर्गातील लहान मूल…डबा विसरून आलाय आणि आई आपल्या लेकराला डबा द्यायला आलीये…अरे साधा डबा आणायचं लक्षात रहात नाही तुमच्या, तुम्ही काय मॅनेजमेंट शिकणार?? आणि आईला सुद्धा काय म्हणावं, मुलगा इतका मोठा होऊनही वर्गात डबा द्यायला येते..”

सरांच्या या बोलण्याने संपूर्ण वर्गाला खरं तर राग आलेला…रोशनला सर बोलत होते तोवर रोशन ऐकून घेत होता…पण सरांनी जसं आईला बोलायला सुरुवात केली तसा रोशन चा संयम सुटला..

“सर तुम्ही जास्त बोलताय, बाहेर जी उभी आहे ती माझी आई आहे, आणि माझ्यावरच्या प्रेमापोटी ती डबा द्यायला आली आहे..”

“हो हो…बरोबर, तुम्ही कधीच सुधारणार नाही, अरे आपण MBA सारखी पदवी मुलाला शिकवतोय…याचं भान बाळगावं पालकांनी…असो, यांना काय माहीत मॅनेजमेंट कशाशी खातात ते…” पगार सर आईकडे तुच्छ नजरेने बघत म्हणतात…

“सर…आईशिवाय उत्तम मॅनेजमेंट कुणालाही जमणार नाही हे लक्षात ठेवा..”

पगार सर चिडले, “हो??? मॅडम आत या, आज तुम्ही मुलांना शिकवा मॅनेजमेंट काय असतं ते…मी मागे बसतो..”

आई घाबरून आत येते..

“माफ करा सर…चूक झाली..”

“आई तुझी काहीही चूक नाहीये…चल, आज शिकवच तू सरांना, मॅनेजमेंट म्हणजे काय…घरात तू कसं सगळं मॅनेज करते हे सांग फक्त..”

पगार सर आईच्या हातात मार्कर देतात आणि स्वतः मागे बेंचवर जाऊन बसतात…

रोशन आईकडे बघतो, आणि खूप आत्मविश्वासाने “सुरू कर” असा इशारा करतो..

मुलाच्या इज्जतीचा प्रश्न असल्याने आईमध्ये एक बळ संचारतं… आई मार्कर हातात घेते..

“मी तुम्हाला माझ्या मॅनेजमेंट, म्हणजेच घराच्या मॅनेजमेंट बद्दल सांगते….आता बघा, रोशन ला आज पालक पनीर ची भाजी दिली, म्हणजे याची काळजी मला कालपासून होती की आज डब्याला काय द्यावं, मग मी बाजारात जाऊन सामान घेऊन आले…दुसऱ्या दिवशी काय द्यावं याची खबरदारी मला आदल्या दिवशी सगळं सामान बघून करावी लागते…”

“This is calles as a first phase of the fundamental management, planning…”

रोशनचा मित्र गिरीश उभा राहून आईला साथ देतो…

“मग दुसऱ्या दिवशी मला सगळी तयारी करावी लागते, म्हणजे एकीकडे स्वयंपाक आणि दुसरीकडे अनेक कामं… मधेच कचरागाडी येते, एकीकडे एकाला चहा हवा असतो, मधेच कपडे इस्त्री करावे लागतात, अनेकांना गरम गरम नाश्ता द्यावा लागतो…मग मला या सर्वाचं नीट वेळापत्रक करावं लागतं…”

“This is the 2nd phase of management, that is organising…and her multitasking is her plus point”

रक्षा आईला उद्देशून म्हणते..

“एवढ्या सगळ्यात घराची साफसफाई पण महत्वाची असते, मग त्यासाठी मी घरकामात मदत म्हणून कांता बाईला कामाला घेतलं…तिला कामावर ठेवताना फार काळजीपूर्वक ठेवलं, तिची नीट माहिती काढली आणि विश्वास बसला तेव्हाच तिला घेतलं..”

“Staffing…3rd phase of the management…”

मानस उत्तरला…

“बरं घरातलं एवढंच काम नाही पुरत बर का…रोशनला अभ्यासाला चांगलं वातावरण मिळवून देणं, रोशन च्या बाबांच्या ऑफिस च्या फाईल्स नीट जपून ठेवणं, सर्वांची महत्वाची कागदपत्र, बिलं सांभाळून ठेवणं आणि मागितल्यावर पटकन काढुन देणं अशी एक ना अनेक कामं असतात..”

“Coordinating…4th phase of the management..”

“रोशन ने अभ्यासात नीट लक्ष द्यावं यासाठी आम्ही घरातली केबल काढून टाकली, आणि यांनासुद्धा कामाचा ताण येऊन शारीरिक त्रास होऊ नये म्हणून पथ्यपाणी सांभाळावं लागतं… दोघांना काम करायला ताकद यावी, त्यांना आजाराने ग्रासू नये, त्यांची प्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी खाण्यापिण्याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते…”

“Controlling…5th phase of the management…”

“बस, एवढंच माझं काम…कुठे माझं एक साधारण गृहिणीचं काम आणि कुठे तुमचं MBA चं इतक्या जाडजूड पुस्तकी ज्ञान…”

“नाही काकू, तुम्ही आज आम्हाला मॅनेजमेंट च्या कन्सेप्ट अगदी उदाहरणासकट समजवल्या, गेल्या आठवडा भरापासून पगार सर शिकवताय पण एक अक्षर समजत नव्हतं… आज तुम्ही आम्हाला प्रात्यक्षिक दिलं…मॅनेजमेंट चं..”

एक विद्यार्थी असं म्हणतो आणि आईसाठी टाळ्यांचा गडगडाट होतो..

पगार सर खजील होऊन तावातावाने निघून जातात…

रोशन च्या चेहऱ्यावर अभिमानाची चमक आली…का नाही येणार?? एक गृहिणी आज शिक्षणाच्या सर्वोच्च पदासाठी ज्ञान देऊन आली होती…

2 thoughts on “गृहिणीने दिलं मॅनेजमेंट चं ज्ञान..”

Leave a Comment