गृहलक्ष्मी

“इतके पैसे कुठे जातात गं??”

लग्नानंतर पुढच्याच महिन्यात दिवाळी आली होती..अजय आणि शरयू, नवीन शहरात स्थायिक झाले होते. अजय ने ठरवलं होतं, लग्न झालं की बायकोच्या हातात पगाराची रक्कम द्यायची आणि तिला घरखर्च बघायला सांगायचा…

दिवाळी चा महिना होता, शरयू आधी आपल्या आईकडे अगदी बिनधास्त असायची..आई, आजी, वडील मिळून दिवाळीचं सगळं पाहून घेत..आता मात्र शरयू वर सगळी जबाबदारी आली..हातात घरखर्चासाठी पहिल्यांदाच अशी रक्कम टेकवली गेली आणि आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याची जाणीव तिला झाली…

दिवाळीचं फराळ, घरातली साफसफाई, किराणा…सगळं अगदी नेटाने शरयू बघत होती. यातच अजय चा एक लांबचा भाऊ घरी आला, पैसे उसने मागत होता..

अजय ने शरयू कडे पैसे मगितले,

“अहो इतके नाही उरले..”

“उरले नाही? कुठे खर्च केले?”

“घरातलाच खर्च…”

“इतका? अगं वेडबीड लागलंय की काय तुला…”

“अहो खरंच बोलतेय मी…”

भाऊ घरात असल्याने अजय ने आवरतं घेतलं..

भाऊ निघून गेल्यावर अजय ने शरयू सोबत जोरदार भांडण केलं…

“अगं काही अक्कल आहे की नाही तुला? इतके पैसे संपवलेस? मला वाटलं चांगला संसार करशील तू…आता यापुढे तुझ्या हातात 1 रुपयाही देणार नाही…सगळा घरखर्च मी बघेन…”

ठरलं, अजय ने घरखर्च हातात घेतला…

किराणा, बिल, भाडं सगळं बघू लागला…

“अहो येताना भाजीपाला आना..”

“आज पाहुणे येणार आहेत, स्वीट घेऊन या..”

“सासूबाई येणार आहेत, साडी नेसवावी लागेल..”

“गोट्या च्या हातात 100 रुपये द्यावे लागतील…”

घरातला हा इतर खर्च त्याच्या खिजगणतीतही नव्हता..

सगळा पगार त्याने 10 दिवसात संपवला…

शरयू ने पैसे मागितले तेव्हा तो मान खाली घालुन उभा राहिला…त्याला चूक समजली, हा बारीकसारीक खर्च माझ्या लक्षातही येत नाही, उलट शरयू ने दिवाळी असूनही महिनाभर पैसे पुरवले होते…इतकंच काय, तिने स्वतःसाठी साडीही घेतली नव्हती हे त्याचा आत्ता लक्षात आलं…

तो शरयू कडे आला आणि म्हणाला.

“माझं चुकलं..माफ कर…तूच खरी लक्ष्मी आहेस, काटकसर करून माझा संसार तूच नेटाने पूढे नेशील…यापूढे गृहलक्ष्मी कडेच लक्ष्मी चा वास असेल..”

1 thought on “गृहलक्ष्मी”

  1. खूप छान,,,घरचे बारीक बारीक खर्च जो करतो त्यालाच माहीत असतात,,जो व्यक्ती करत नाही त्याला समजत नाही

    Reply

Leave a Comment