गर्भ (भाग 8) ©संजना इंगळे

 गर्भ (भाग 8) ©संजना इंगळे

भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/09/3.html

भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html

 भाग 5

https://www.irablogging.in/2020/09/5.html

 गर्भ 6

https://www.irablogging.in/2020/09/6.html

भाग 7

https://www.irablogging.in/2020/09/7.html

#गर्भ_भाग 8
एपिसोड 8: “सत्याच्या जवळ”

बंगलोरला पोचल्यावर गीतेश दिलेल्या पत्त्यावर जातो..फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप असतं.. बाहेर कुठे गेले असतील म्हणून गीतेश शेजाऱ्यांना विचारतो…

“सर यहा जो रेहते है वो बाहर गये है क्या??”

“हा जी वो तैयार होकर यही कही गये है..”

“कबतक आएंगे कुछ आयडिया??”

“नही साहाब..”

एवढं बोलून तो माणूस दार लावून घेतो…गीतेश तिथेच वाट बघत बसतो, दादा आणि वहिनीचा जुना नंबरही बंद झालेला असतो…दुपार होते, संध्याकाळ होते तरीही घरी कुणी येत नाही…गीतेश जवळच एखादं हॉटेल बघून तिथे मुक्काम करायचं ठरवतो…

हॉटेल मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात, रात्री उशिरापर्यंत गाण्यांची मैफिल रंगलेली असते…दुरदूरवरून विविध गायक बंगलोर ला होणाऱ्या संगीत संमेलनासाठी जमलेले असतात…गीतेशला ते पाहून खूप आनंद होतो, कारण ते वातावरण म्हणजे त्याचाच प्रांत होता…तो गर्दीत एका खुर्चीवर बसतो…

काही वेळाने एक ग्रुप गीतेशजवळ येतो..

“तुम्ही पंडित गीतेश ना??”

“हो…पण तुम्ही कसं ओळखलं??”

“अहो पंडितजी तुम्हाला कोण नाही ओळखत, तुमच्या संगीताचा आदर्श आमच्यापुढे ठेवला जातो..तुम्ही जी साधना केलीत त्याचं उदाहरण आमच्यासमोर ठेवलं जातं…”

“भेटून आनंद झाला..”

“आमची एक विनंती आहे पंडितजी. या सभेत तुम्हीही एखादा राग गावा..”

गीतेश लगेच तयार होतो…मैफिलीत सन्मानाने गीतेशला स्टेजवर आमंत्रित करण्यात येतं… वादक मंडळी बाजूला बसतात आणि गीतेश हात जोडून आसनस्थ होतो..तो गायला सुरवात करतो..

“तोरे बिना मोहे चैन नहीं ब्रिज के नंदलाला
पैंयां पडूं बिनती करूं डारू गले माला”

गीतेशच्या तालात संपूर्ण मैफिल तल्लीन होऊन जाते, शास्त्रीय संगीतातील अनेक बारकावे, चढउतार, अंतरा अगदी अचूकपणे गीतेश गात असतो..संपूर्ण दिवस उपाशीपोटी तो भावाला शोधत दमलेला असतो, गाताना मधेच त्याचा आवाज बदलतो, तो खोकू लागतो…आवाज काही केल्या मूळ सुरात येईना…मैफिलीत कुजबुज होऊ लागली…इतका वेळ शांत असलेली मैफिल चुळबूळ करू लागली…तेवढ्यात गर्दीतून कुणीतरी एक माईक हातात घेऊन राग पूर्ण करतो…

“ढूँढे फिरे ब्रिंदाबन साँवरो बँसीवाला
गोकुल में जनम लियो जग में उजियाला”

गीतेशला समजत नाही नक्की गर्दीतून कोण म्हणतं आहे..पण “तो” आलाप जेव्हा कानी पडतो तेव्हा गीतेश एकदम उठून उभा राहतो…स्टेजवरून खाली उतरत गर्दीत त्याला शोधू लागतो…

“माझा दादाच आहे हा…दुसरा कुणीही नाही..”

अखेर खुर्च्यांच्या मागे असलेल्या पायरीवर त्याला दादा दिसतो….त्याच्या शेजारी शाल पांघरून बसलेली लता वहिनी त्याला दिसते…

गीतेश धावत जाऊन त्याला मिठी मारतो…वहिनीच्या डोळ्यात पाणी असतं…

“दादा…दादा कुठे होतास तू…आम्ही समजलो की तू….ते काही नाही, घरी चल आता, मी तुला न्यायला आलोय..”

“यायचं असतं तर आम्ही कधीच आलो असतो, पण माफ कर, आम्ही नाही येऊ शकत…”

“दादा अरे बाबांचा सगळा राग निवळला आहे, तू चल माझ्यासोबत..”

“नाही गीतेश, आग्रह करू नकोस…आमचं इथे स्वतःचं एक विश्व आहे…बाबांनी आम्हाला जी वागणूक दिली ती आम्ही कधीही विसरू शकत नाही..”

गीतेशने खूप आग्रह केला पण दादाने ऐकलं नाही, अखेर गीतेश निराश होऊन हॉटेलवर गेला..

_______

हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला सलाईन लावण्यात सिस्टर मीना आळशीपणा करत होती..डॉक्टर शालाकाच्या ते लक्षात येताच त्यांनी सिस्टर मीना ला चांगलच झापलं… सिस्टर मीना दातओठ खातच पेशन्ट च्या खोलीत गेली अन रागारागाने सलाईन लावली…

“इतकी वर्षे काम केलं त्याचं हेच दिलं..उगाच सलाईन चं ढोंग चालुये, पेशन्ट केव्हाच बरा झालाय…थोडा वेळ उशीर झाला तर काही मरत नाही पेशन्ट..स्वतः काय काय उद्योग करतात, लोकांना समजलं तर तोंडात शेण घालतील.”

तिचं हे बोलणं मेघनाद खोलीबाहेरून ऐकत असतो…

“मेघनाद सर? तुम्ही इथे?”

“हो…माझं काही सामान राहिलं होतं ते न्यायला आलोय..”

“बरं..”

“तुम्ही काहीतरी म्हणत होतात, लोकांना समजलं तर..वगैरे…”

“काही नाही, ते असच..”

मेघनाद च्या मनात सुडाची भावना आधीच निर्माण झाली होती, डॉक्टर शलाका नावाच्या बाईने आपला अपमान केला हे त्याचा पुरुषी अहंकार मान्य करत नव्हतं… तो सिस्टर मीना ला शब्दांच्या जाळ्यात ओढतो..

“काहिही म्हणा सिस्टर, पण तुमच्याइतकं काटेकोर काम कुणीही करत नाही..””

“पण लोकांना किंमत हवी ना त्याची..” सिस्टर अजून चवताळून म्हणते..

“अहो, डॉक्टर लाही काही गोष्टी जमत नाही त्या तुम्ही केल्या, अन तुम्हाला मॅडम ने असं बोलावं?? मला नाही पटत बुवा..”

“खरंच, फक्त तुम्ही ओळखलं मला नीट, नाहीतर बाकीचे..”

“पण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणजे झालं, कसं आहे, मॅडम ला आपल्या वरचढ असलेली लोकं नको असतात…म्हणून तुम्हाला काढायची ही सुरवात आहे.”

“खरं की काय??”

“पण काळजी करू नका, काहीही होणार नाही…पण एक सांगा, ते मॅडम चं काय लोकांना समजलं तर अनर्थ होईल?? काय आहे ते??”

“तुम्ही जवळचे म्हणून सांगते, कुणाला सांगू नका…अहो एका दाम्पत्याने ivf साठी सॅम्पल दिले होते, खूप प्रयत्न केल्यानंतर ते यशस्वी झालेलं… पण त्या दाम्पत्याचं विमानात निधन झालं…अश्या वेळी ते सॅम्पल डीस्पोज करून द्यावं लागतं….पण…”

“पण?? पण काय?”

“मॅडम ने ते सिस्टर अनुच्या गर्भात रोपण केलं..”

“काय??? हे बेकायदेशीर आहे..”

“कुठला कायदा आहे याला? अजूनही अश्या विचित्र गोष्टींना काही कायदा आलेला नाही….यात नुकसान कुणाचं झालेलं नाही.पण फायदा झाला एका स्त्री चा…ते काहीही असो, पण ही गोष्ट जगाला कळली तर किती तमाशे होतील..”.

“ते सॅम्पल कुणाचं होतं काही अंदाज?”

“नाही माहीत..”

मेघनाद चं विचारचक्र फिरू लागतं… त्याला आठवतं…

“गीतेश…दादा…लता वहिनी…विमान अपघात… सॅम्पल…”

त्याला सगळं लक्षात येतं.. तो तडक गीतेशला फोन लावतो…

“अरे तुझ्या दादा आणि वहिनीचं मूल जन्माला घातलं गेलंय कधीच….”

“काय??”

मेघनाद गीतेशला सगळी हकीकत सांगतो….गीतेश दादा आणि वहिनीला हातपाय जोडून विनंती करून डॉक्टर शलाका कडे नेतो..सोबत मेघनाद ही येतो….

“गीतेश अरे का नेतोय आम्हाला तिकडे?”

“दादा मी आता काहीही सांगणार नाही, तू फक्त चल…”

दादा, लता वहिनी, मेघनाद आणि गीतेश सर्वजण हॉस्पिटलमध्ये येतात… डॉक्टर शलाका या सर्वांना एकत्र बघून गोंधळतात….

मेघनाद सर्व आवाज एकटवुन आपला सगळा राग बाहेर काढतो..

“या आहेत डॉक्टर शलाका….लोकांचा अपमान करतात पण स्वतः मात्र बेकायदेशीर धंदे करतात..”

“मिस्टर मेघनाद, तोंड सांभाळून बोला…”

“मी तुमच्याकडे नोकरीला नाही आता, माझ्यावर आवाज चढवायचा नाही…”

गीतेश मेघनाद ला शांत करतो…

“हे बघा मॅडम, तुम्ही आमच्या दादा वहिनीचं सॅम्पल दुसऱ्याच्या गर्भात रोपण करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला दादा वहिनीची परवानगी…. ओह सॉरी, तुमच्या मते ते विमान अपघातात गेले असतील, पण निदान त्यांचे नातेवाईक म्हणून आम्हाला तरी कळवायला हवं होतं…”

डॉक्टर शलाका लता कडे एकदा बघते…लता मान खाली घालुन उभी असते..

“वहिनी, तुम्ही तरी बोला..”

“हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे..तुझे दादा वहिनी जिवंत आहेत याची खबर मला होती, त्यांना मी भेटले सुद्धा…”

“वहिनी??? हे काय ऐकतोय मी”

“हो…हेच खरं आहे…डॉक्टर ने मला सांगितलं होतं…पण ज्या मुलाच्या हव्यासापोटी बाबांनी आम्हाला अपमानित केलं…ज्या गर्भासाठी आम्ही अपघातातून कसेबसे सावरलो, असं अपशकुनी मूल नको होतं आम्हाला…आयुष्यभर निपुत्रिक राहण्याचा निर्णय आम्ही घेतला होता…त्या सॅम्पल चं तुम्हाला हवं ते करा असं मीच सांगितलं होतं डॉक्टर ला..”

क्रमशः

1 thought on “गर्भ (भाग 8) ©संजना इंगळे”

Leave a Comment