गर्भ (भाग 2) ©संजना इंगळे

भाग 1 https://www.irablogging.in/2020/09/1.html

 एपिसोड 2 – “मातृत्व”

“सरका…बाजूला व्हा….नो सेल्फीज…प्लिज..”

डॉक्टर शलाका च्या हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी जमलेली…मॉडेल गिरीजा आणि ऍक्टर इम्रान हॉस्पिटलमध्ये आले होते…तिथे असलेल्यांनी त्यांना ओळखलं आणि एकदम गर्दी केली..सेल्फी साठी सर्वजण ताटकळू लागले…प्रसंग ओळखता दोघांना तातडीने डॉक्टर च्या केबिन मध्ये नेण्यात आले…

डॉक्टर शलाका…देशातील नावाजलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ.. देशातूनच नव्हे तर जगभरातून श्रीमंत लोकं त्यांच्याकडे appointment घेत असत…त्यांच्याकडून आजवर एकही ऑपरेशन fail झालेलं नव्हतं..

“बसा तुम्ही, मॅडम OPD मध्ये आहेत..डिलिव्हरी चालुये..थोडा वेळ लागेल..”वॉर्डबॉय म्हणाला…

“Ok… we will wait..”

दोघेही केबिन मध्ये बसून असतात…केबिन मध्ये एका शोकेस मध्ये भरपूर पुरस्कार, सन्मानपत्र, ट्रॉफीज ठेवलेल्या असतात…काही भिंतींवर गोंडस मुलांचे फोटोज असतात, त्या फोटोत इम्रान हरवून जातो…गिरीजा त्या फोटोजवरून नजर बाजूला करायचा प्रयत्न करते पण त्या निरागस बाळाकडे पाहायचा तिचा मोह आवरत नाही…

आत डिलिव्हरी चालू असते..डॉक्टर शलाका अर्भकाला अलगद हातात घेते…आणि काही डोळ्यात पाणी आणून काही क्षण बघत राहते…प्रत्येक डिलिव्हरी नंतर डॉक्टरला परी ची आठवण यायची आणि त्या तुटून जायच्या…सिस्टर अनु बाळाला हातात घेऊन पुढच्या गोष्टींसाठी घेऊन जाते आणि म्हणते…

“मॅडम, किती दिवस त्रास करून घेणार त्याचा…किती दिवस विचार करणार त्याच त्याच गोष्टीचा??”

“कसं विसरू मी.. परी ब्लड कॅन्सर च्या शेवटच्या स्टेज ला होती…तिचा फोन एकीकडे चालू होता आणि दुसरीकडे माझी सर्जरी…मी बाळाला हातात घेतलं आणि तिने फोनवर बोलता बोलता प्राण सोडला… मला अजूनही तिचे शब्द आठवतात.. आई, आई श्वास नाही घेता येत आहे..आई..आई..एकीकडे नवीन जन्म झालेला, आणि दुसरीकडे….माझी मुलगी….” डॉक्टर शलाका असं म्हणतच रडायला लागतात…

बाहेरून बाळाचा रडायचा आवाज येतो…गिरीजाच्या अंगावर काटा उभा राहतो…ती इम्रान ला म्हणते..

“जस्ट imagine… आपल्याच बॉडी मधून एक जिवंत बाळ बाहेर येतं आणि पहिल्यांदाच आवाज काढतो…I can’t bear this..no way…किती भयानक आहे हे सगळं..”

इम्रान विचारात गढून गेलेला असतो…

“इम्रान…काय झालं..?”

“काही नाही..”

“माझ्या निर्णयाशी तू सहमत आहेस ना??”

इम्रान काही उत्तर द्यायच्या आधीच सिस्टर मीना आत येते…

“ओ माय गॉड… तुम्ही?? एक सेल्फी प्लिज..”

मागून सिस्टर अनु येते…आणि हळूच म्हणते.

“सिस्टर मीना…काय चाललंय हे, पेशंट म्हणून आलेत ते..”

“अगं कोण आहे पाहिलंय का…इम्रान आणि गिरीजा…”

अनु नाव ऐकते आणि चटकन बाहेर येते…त्यांच्यासमोर ती आपलं तोंड दाखवत नाही…डॉक्टर शलाका केबिन बाहेर येऊन अनु ला बघतात,

“सिस्टर अनु?? सगळं ठीक आहे ना??”

सिस्टर अनु काहीही बोलत नाही आणि तिथून निघून जाते..डॉक्टर शलाका आत येतात..इम्रान आणि गिरीजा उठून उभे राहतात…

“बसा बसा…so… कधी घ्यायचं ठरवलाय चान्स..”

“डॉक्टर.. आम्हाला मूल नकोय..”

“Okk… so birth control साठी आलात का??”

“नाही…म्हणजे, आम्हाला मूल कधीच नकोय…मला गर्भपिशवी काढूनच टाकायची आहे..”

“काय??”

डॉक्टर शलाका एकदम चकित होतात…

“हे बघा, तुम्ही बर्थ कंट्रोल करू शकता, आणि हवं तर मूल कधीच होऊ देऊ नका…पण समजा कधी वाटलंच तर?? काही पर्याय राहणारच नाही तुमच्याकडे… अजून खूप मोठं आयुष्य पडलं आहे समोर….”

“आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत…आम्हाला मूल नकोच आहे, आज नाही आणि कधीच नाही…”

“ठिके, जशी तुमची इच्छा..”

डॉक्टर शलाका त्यांना सर्जरी साठी एक तारीख देतात आणि इतर सर्व सूचना सिस्टर मीनाला द्यायला सांगतात…

ते निघून गेल्यावर सिस्टर अनु आत येते…

“मॅडम…”

“बोला सिस्टर अनु…”

अनु काहीही बोलत नाही..

“पैसे हवेत का?”

“नाही..”

“मग, सुट्टी हवीय का??”

“नाही..”

डॉक्टर शलाका च्या लक्षात येतं की सिस्टर अनुला काय हवंय..डोक्याला हात लावत डॉक्टर म्हणतात..

“हे बघ अनु, तुला आई होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करून पाहिले…ivf पासून अगदी सगळं…पण तुझ्या नवऱ्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे आणि त्याच्या कमजोर शुक्राणूंमुळे ते यशस्वी होतच नाहीये…”

“मॅडम, दुसऱ्या कुणाचे sperm घ्या…पण मला आई बनवा..”

“सिस्टर अनु, आई होण्यासाठी तुम्ही फारच वेडेपणा करताय…काहीही बोलायला लागल्या आहात..”

“मॅडम मला आई व्हायचं आहे…माझ्या बरोबर च्या मुली आपल्या बाळाशी खेळताना बघून, त्यांचे मुके घेताना बघून जीव पिळवटून निघतो माझा…माझा नवरा पाहिला असा, आई वडील नाहीत मला…मला जगण्यासाठी काहीतरी कारण म्हणून मला आई व्हायचं आहे..”

“सिस्टर अनु…जा तुम्ही, आपण नंतर बोलू..”

*****
(20 वर्षांपूर्वी)
श्यामप्रसाद शास्त्रींच्या घरी मोठा सोहळा असतो…त्यांचा मोठा मुलगा रामनाथ नुकताच शास्त्रीय गायनातील एक मैल गाठून आलेला असतो…घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते…संगीतातील सर्व दिग्गजांना बोलावण्यात आले होते..एकिकडे गायनाचा कार्यक्रम चालू होता आणि दुसरीकडे लता सर्व पाहुण्यांचे आगत स्वागत पाहत होती…

“ही शास्त्रीजींची सून लता ना??”

“होय…”

“फार सुंदर गाणं म्हणते म्हणे…पण कधी ऐकलं नाही..”

“शास्त्रीजी म्हणू देतील तेव्हा ना, त्यांना फक्त वंश पुढे नेण्यासाठी संगीतातील पारंगत स्त्री हवी होती..बाकी काही नाही..”

“मग काही गुडन्यूज??”

“कसलं काय…लग्नाला बऱ्यापैकी वर्षे उलटली, अजून पाळणा हलला नाही म्हणे..”

“शास्त्रीजी तर फार दिमाखात वावरतात…पण त्यांच्यानंतर हा वारसा चालवायला आहे का म्हणा कुणी..एक तर तो गीतेश, कुठे पळून गेलाय कुणास ठाऊक..”

“जाऊदे…शास्त्रीजींना nepotism नको असेल असंच समजू… हा हा हा..”

दोघेही गृहस्थ हसायला लागतात..शास्त्रीजी जवळच असल्याने त्यांना बऱ्यापैकी ते ऐकू आलं होतं… त्यांचा एकंदरीत सुरच बदलला…कार्यक्रम झाल्यानंतर ते रामनाथ ला बोलावून घेतात…

“रामनाथ…बातमी कधी देणारेस??”

“बाबा…तुम्हाला माहितीये की, लता आई होऊ शकत नाही कधीच..”

“मग काय उपयोग तिचा??”

“बाबा???”

“नाहीतर काय, अरे या घराण्याचा वारस म्हणून अख्खी संगीतसृष्टी आपल्याकडे डोळे लावून बसलीय…आणि तू असं म्हणतोस..”

“काय करू बाबा मी, माझ्या हातात काहीही नाही..”

“दुसरं लग्न कर..”

“शक्य नाही..”

“चालता हो मग इथून..”

“हो जातो जातो…नको मला तुमचं संगीत अन घराणं…लता आणि मी, सुखी राहू दोघे..”

रामनाथ तिथून तडक आपल्या खोलीत जातो आणि लता ला सांगतो..

“आपल्याला हे घर सोडावं लागेल…”

लता ला कल्पना आली होती काय झालं असेल याची, तिनेही जास्त चर्चा न करता आपलं गाठोडं बांधलं…

“लता, आता आपल्याला एकमेकांसाठी जगायचं आहे…मूल होत नाही म्हणून आपले सगळे प्रयत्न संपले आहेत..आता पुन्हा नाही, आयुष्य जसं दिलं आहे तसं जगायचं..”

रामनाथ आपल्या माळ घातलेल्या आईच्या फोटोकडे बघतो…आणि तिथून लता ला घेऊन निघून जातो..

क्रमशः

भाग 3

1 thought on “गर्भ (भाग 2) ©संजना इंगळे”

Leave a Comment