खेळ मांडला (भाग 22)

प्रमिलाच्या नवऱ्याच्या डोक्यातील शंकेने आता उग्र रूप घेतलं होतं. इतकी वर्षे एका खोटारड्या आणि चरित्रहीन बाई सोबत संसार केला हे त्याला बोचू लागलं. सागरचा सर्वात जास्त राग आला, आई बापाविन वाढलेल्या बहिणीला तिचा भाऊ नीट सांभाळू शकला नाही. पण अजूनही त्याला खात्री झालेली नव्हती, त्यासाठी तो अनाथाश्रमात गेला पण तिथे काहीही हाती लागलं नाही.

“एक पोटुशी मुलगी इथे राहायची..”

तिथल्या मजूर महिलेने सांगितलेलं त्याच्या कानात घुमू लागलं.

इथे प्रमिलाशिवाय दुसरं कोण राहायचं? नक्की ती प्रमिलाच असणार..आता इकडून तिकडून माहिती जमा करण्यात काहीही अर्थ नाही, सरळ जाऊन प्रमिलाला जाब विचारतो असा विचार त्याने केला.

____

सागर खुशीला खूप काही बोलला होता पण खुशीने त्याला माफ़ही केलं होतं. पण सागरला अजूनही स्वतःवरच राग येत होता, किती सहजपणे नकुल आणि खुशीच्या मैत्रीच्या शुद्ध नात्यावर आपण बोट ठेवला? त्याला खूपच वाईट वाटू लागलेलं. पण खुशीने त्याची समजूत काढली. सागरला असं काहीतरी करायचं होतं ज्याने खुशीला छान वाटेल..

“मी काय म्हणतो, आपण नकुलला आणि आरोहीला घरी बोलवूया का जेवायला?”

“सागर?”

“हे बघ मला खूप गिल्टी वाटतंय तुमच्या नात्यावर बोट ठेवल्याने, नकुल इथे आला तर माझ्या मनावरचं ओझं हलकं होईल..प्लिज..”

“नको..नको बोलवायला त्याला..”

“तुझा अजूनही माझ्यावर राग आहे?”

“सागर फक्त तेवढंच नाहीये, घरी ताई आल्या आहेत. ताई समोर आरोही येणार, पुन्हा भूतकाळात डोकावणार. आरोहीला काही आठवणार नाही हे खरं.. पण ताईचं काय? ती कितपत सावरू शकेल स्वतःला? त्या दोघींची मैत्री इतकी घट्ट होती की जणू एक दुसरीची सावलीच..बोलण्या बोलण्यात चुकूनही आरोहीचा भूतकाळ बाहेर पडला तर…”

“किती विचार करतेस सर्वाचा? काहीही होणार नाही तसं.. आपण सगळे काळजी घेऊच ना.. आणि वाईट गोष्टी उकरून काढण्यापेक्षा सकारात्मक बाजू बघत जाऊया…ताईला आपल्या मैत्रिणीला बघून बरं वाटेल, नकुलला तुला भेटून बरं वाटेल, आणि तुम्हाला बरं वाटलेलं पाहून मला बरं वाटेल..काय?”

“बस बस..आता मला बरं वाटत नाहीये, मी झोपते जरा.”

“काय गं अचानक?”

“अहो प्रेग्नन्सी मध्ये मळमळ होणं नॉर्मल आहे, तेच होतंय.. बाकी काही नाही..”

“बरं तू आराम कर, मी नकुलला फोन करतो..”

सागर नकुलला फोन try करतो पण लागत नाही, थोड्या वेळाने करू म्हणत तो त्याच्या कामाला निघून जातो.

______

“अगं बाहेर पाऊस बघ किती चालुये…कसं जाणार इतक्या पावसात?”

“आई तूच म्हणते ना की मला तुझ्यासोबत यायला आवडत नाही म्हणून, आज मीच तुला फोर्स करतेय तर तू नाही म्हणतेय..”

“आर्वी तू पण ना..थांब, तुझ्या पप्पांना विचारते..”

“आणि हो, सरिता मावशीला पण सोबत घ्यायचं आज..”

“बरं बाई..”

मानवची बायको मानवला पावसात बाहेर फिरायला जाण्याबद्दल विचारते, आर्वीचा हट्ट असल्याने मानव नाही म्हणू शकला नाही. आणि सरीतालाही खूप आग्रह करून ते सोबत घेतात .तो गाडी काढतो आणि आर्वी, तिची आई, शुभम आणि सरिता..सगळे फिरायला जातात. बाहेर पाऊस खूप असतो, आर्वीच्या हट्टानुसार 2-3 ठिकाणी थांबून सर्वजण भजी, चहाचा आस्वाद घेतात.. पुढे मक्याचं कणीस खातात..आज आर्वी खूप खुश असते..

“बाळा आज फारच खुश दिसतेय..काही स्पेशल?”

“नाही गं आई..असंच आपलं..”

खरं तर आर्वी एका मुलाच्या प्रेमात पडलेली असते. श्रीरंग, तिच्याच कॉलेजमधला मुलगा..माणूस प्रेमात असला की सगळं गुलाबी गुलाबी दिसू लागतं. सगळीकडे आनंदी आनंद दिसू लागतो..गालावर नकळत हसू फुटतं, मधेच एखाद्या चेहऱ्यात तोच दिसू लागतो.. तसंच काहीसं झालेलं आर्वीच्या बाबतीत. म्हणूनच आज तिला पावसात जायची इच्छा झाली, त्या रोमँटिक वातावरणाचा अनुभव घेण्याची ईच्छा झालेली…

____

“हॅलो नकुल, अरे कितीवेळ तुला फोन try करत होतो, लागतच नव्हता..”

“मोबाईल ला काहीतरी प्रोब्लेम झालाय रे सागर, असो..काय म्हणतोस?”

“आज संध्याकाळी तुझ्या मैत्रिणीच्या घरी जेवायला यायचं..”

“कोणती मैत्रीण?”

“किती मैत्रिणी आहेत तुला?”

“हाहा.. अरे तसं नाही रे..आमच्याकडे जेवायला ये असं विचार ना..आणि तू नाही का रे माझा मित्र?”

“गम्मत केली रे..बरं आज संध्याकाळी तू येतोय.. बाकी मला काही माहीत नाही..संध्याकाळी म्हणजे, असा कितीसा वेळ बाकिये संध्याकाळ व्हायला..तयारी करायला सुरुवात कर..”

“आता तू इतका आग्रह करतोय तर ठिके..”

दोघेही फोन ठेऊन देतात. नकुल आरोहीला आवाज देतो..

“अगं ऐकलं का, सागरकडे जेवायला जायचं आहे आज..”

आरोही काहीकाळ स्तब्ध..

“काय गं काय झालं?”

“काही नाही..”

“जायचं ना?”

“हो जाऊया..”

“फक्त मला एक महत्वाचा मेल करायचा आहे मानव सरांना, तो केला की आवरायला सुरवात करतो..तोवर तू कर तयारी..”

नकुलच्या फोनला काहीतरी तांत्रिक त्रुटी निर्माण झालेली असते, बऱ्याचदा फोन hang होत असायचा..एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने फोन बंद करून चार्जिंग ला लावला आणि तयारी करायला निघून गेला. तयारी होताच फोन चालु केला, तो आता चांगला चालायला लागला मात्र नेटवर्क मिळत नव्हतं. वैतागून त्याने मेल draft करून ठेवला आणि नंतर नेटवर्क आल्यावर पाठवू असा विचार केला. दोघेही आवरून सागरकडे जायला निघाले आणि अर्ध्या तासात पोहोचले.

____

पावसाचा जोर खूप वाढला होता. आर्वी अन कुटुंब पाऊस थांबायची वाट पाहू लागले, पण तो काही थांबायचं नाव घेईना. शेवटी हळुहळु कार चालवत घरी जाऊया असं ठरलं. सर्वजण गाडीत बसले, पण गाडी काही केल्या सुरू होईना. मॅकेनिक ला फोन केला तर तोही available नव्हता.

तेवढ्यात नकुलचा फोन,

“सर मी मेल केलाय तुम्हाला, एकदा बघून घ्या..”

“बरं बरं नंतर बघतो, आता जरा एका ठिकाणी अडकलोय..”

“काही अडचण आहे का सर?”

“काही नाही ओ पावसात अडकलोय अन त्यात ही गाडी बंद पडलीय… मॅकेनिक सुद्धा नाहीये जवळ..जाऊदे बघतो काहीतरी..”

“मी काही करू शकतो का? मला सांगा कुठे आहात तुम्ही?”

“आम्ही आता MG रोड वर आहोत..”

“अरे म्हणजे इथून जवळच..आम्ही एका मित्राकडे आलोय..त्याचं घर तिथून जवळच आहे..मी एक काम करतो तुम्हाला घ्यायला येतो…चालेल ना?”

मानव विचार करतो..आता काही पर्याय नाहीये..पावसात या सर्वांना किती वेळ थांबवून ठेवायचं, मॅकेनिक कधी येईल देव जाणे..

“चालेल..सॉरी माझ्यामुळे उगाच त्रास..”

“नाही सर its ok.. मला लोकेशन पाठवा मी आलोच..”

नकुल सागरला सगळं सांगतो,

“अरे तुमचे बॉस अडचणीत आहेत, मदत करायलाच हवी, काही हरकत नाही, त्यांना इथे बोलवूया..”

नकुल गाडी काढतो अन त्यांना घ्यायला जातो..

आता सागरकडे सगळेजण जमणार असतात..आरोही, नकुल, मानव, त्याची बायको, आर्वी, प्रमिला आणि सरिता…आता पुढे काय वादळ निर्माण होतं बघा पुढील भागात

क्रमशः

भाग 23
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-23/

भाग 24
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-24/

भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

6 thoughts on “खेळ मांडला (भाग 22)”

Leave a Comment