खेळ मांडला (भाग 19)

नकुल मदतीसाठी याचना करतो. आजूबाजूला कुणीही नसतं. आरही दोन्ही हात डोक्याला लावून विव्हळत असते. आर्वीला आवाज ऐकू आल्याने ती तिच्या आईला आणि बाबाला सांगते.

“बाबा, तिकडे कुणीतरी मदत मागतंय..”

सर्वजण आवाजाच्या दिशेने धावायला लागतात. इतक्या वेळ रडकुंडीला आलेल्या नकुलला लांबून येणाऱ्या या माणसांना बघून जरा बरं वाटतं. ते जसजसे जवळ येतात तसं नकुलला समजतं, अरे हे तर आपले बॉस.. मानव सर आहेत..

“सर? बघा ना माझ्या बायकोला काय झालंय..मदत करा सर..”

मानवने सागरच्या लग्नात नकुलला बघितलेलं नसतं, नकुल आरोहीचा नवरा?

“सर…प्लिज..”

मानव भानावर येतो, त्याच्या मागे त्याची बायको उभी असते. शुभम, नकुल आणि आर्वी मिळून आरोहीला उचलतात आणि मानवच्या गाडीत बसून ते हॉस्पिटलमध्ये जातात.

आर्वी आधी जाऊन बसते, आरोहीला तिच्या शेजारी बसवण्यात येतं, तिला बसणं शक्य नसल्याने आरोहीचं डोकं आर्वी आपल्या मांडीवर ठेवते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते.

काही क्षण का होईना, आरोहीला पुत्रसुखाचा स्पर्श मिळत होता, पण त्याची जाणीव कुणाला होती? ना आरोहीला, ना आर्वीला…दैवाने अजब खेळ मांडला होता!

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पुन्हा तेच सांगतात, की जुन्या स्मृती जागृत झाल्याने हे सगळं होतंय. मेंदूत विचित्र अशी रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचा ताण नसांवर पडतो आणि मेंदूवरचा ताबा सुटतो. यापुढे तिला जुन्या आठवणी आठवणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.

आरोही आत असते आणि बाहेर नकुल आणि मानव बसून असतात. मानवच्या मनात हजार प्रश्न निर्माण होतात.

“आरोहीची स्मृती गेलीये? कशी? केव्हा? तिच्या आई वडिलांनी मला नाकारल्यावर ती कुठे गेली होती? काय झालं तिच्यासोबत?”

नकुल डोळे पुसत होता, मानवने ते पाहिलं आणि त्याला धीर दिला. मानव ने त्याच्या बायकोला अन मुलांना घरी जायला सांगितलं. मी नकुल सोबत थांबतो. पण आर्वीचे पाय हॉस्पिटलमधून काही निघत नाहीत. ती बाबाला सांगते..

“बाबा, मी थांबते ना तुझ्यासोबत.. एखादी लेडीज हवी ना सोबत..”

मानव अन त्याच्या बायकोला आर्वीचं खूप कौतुक वाटतं, आज पहिल्यांदा त्यांनी आर्वीला इतकं जबाबदार वागताना पाहिलं होतं.  पण त्यांना काय कळणार, आई अन मुलीची ही अदृश्य नाळ होती, जी आर्वीला तिथून पाय उचलू देत नव्हती.

मानव नकुलला विचारू लागला..

“तुमच्या मिसेस ची स्मृती गेलीये? कशी? केव्हा?”

“दैवाचा खेळ सगळा. तिच्या अपघातात मी तिला मदत केली, तिच्यात मला माझी गतप्राण झालेली बायको दिसली..आरोहीला मी मदत केली, आणि तिच्या आई वडिलांनी मला लग्नासाठी विचारलं. आयुष्य कुणासाठी थांबत नसतं.. आरोहीने तिचा भूतकाळ गमावला..आणि सोबतच..तिची कूसही..”

“म्हणजे?”

“अपघातानंतर तिची स्मृती तर गेलीच, पण ती कधीही आई होऊ शकणार नाही अशी शस्त्रक्रिया करावी लागली..”

नकुलने सर्व गोष्टी मानवला सांगितल्या, मानवला आरोहीबद्दल खूप वाईट वाटलं. या सर्वाला तो स्वतःला दोषी मानू लागला..

“आरोहीला मी त्यावेळी एकटं सोडलं नसतं तर कदाचित..”

पण आता वेळ निघून गेली होती, कितीतरी वर्ष लोटली होती या सर्वांना..

डॉक्टर बाहेर आले,

“पेशंट शुद्धीवर आलेत, तुम्ही जाऊन भेटू शकता..”

हे ऐकताच मानव, नकुल आणि आर्वी तिच्याकडे जातात. आरोही शून्यात नजर भिडवून बघत असते..समोर अचानक मानवचा चेहरा बघून तिची धडधड वाढते, मानवला माहीत असतं की आरोही त्याला ओळखू शकणार नाही ते, पण आरोही मात्र मनभरून त्याला बघतच राहिली..

“आरोही? कसं वाटतंय आता?”

नकुलने तिच्या डोक्यावरून हात फिरवला..

“ठीक..”

आरोही आर्वीकडे बघू लागली, आणि नकळत तिचे दोन्ही हात तिला कुशीत घेण्याकरिता पसरले गेले..आर्वी तिच्याजवळ गेली आणि तिचे दोन्ही हात हातात घेतले..

“आंटी आता बरं वाटतंय ना तुम्हाला?”

“हो बाळा, आता बरंय..”

आर्वीच्या प्रेमळ शब्दांनी आरोही भारावून जाते. ही गोड मुलगी आयुष्यात कितीतरी वळणावर आपल्याला भेटली, मागच्या जन्माचं नातं असावं काहीतरी..

आरोहीला घरी सोडण्यात येतं. यावेळी तिची अवस्था वेगळीच झालेली असते. नेहमीसारखी ती वागत नव्हती. सैरभैर झालेली असायची, नकुलला तिची अजूनच चिंता वाटू लागली. तो तिला खूप जपत होता.

ऑफिसच्या कामानिमित्त मानव आणि नकुलचं नेहमी बोलणं होई. एके दिवशी मानवने दोघांना घरी जेवायला आमंत्रण दिलं. त्या निमित्ताने काही क्षण आरोही सोबत घालवता येईल असं मानवला वाटत होतं. मानवचा संसार सुखात सूर होता. पण तरीही त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण त्याने अजूनही मनात जपली होती. आरोहीबद्दल त्याला अजूनही तितकंच प्रेम होतं. नंतर केलेलं लग्न हे फक्त तडजोड होती. आरोहीला दिलेलं प्रेम मात्र त्याच्या बायकोच्या वाट्याला आलेलं नव्हतं.

____

“आर्वी बाळा, कोण पाहुणे येणारेत गं आज? तुझ्या आईने मला छान जेवण बनवा असं सांगितलंय..”

“अगं एक अंकल आणि आंटी आहेत, ते अंकल बाबांच्या ऑफिसमध्ये काम करतात..आणि त्या आंटी खूप छान आहेत, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आपलंच कुणीतरी आहे..”

“अच्छा…तुला आवडतात ना ते? बघ आता असा स्वयंपाक बनवते की बोटं चाटत बसतील..”

“सरिता काकू, अळूच्या वड्या बनवशील? तुला माहितीये ना मला खुप आवडतात..”

“बरं बाळा, नक्की बनवेन..”

सरिता काकू कामाला लागतात. घरातील सर्वजण आरोही आणि नकुलची वाट बघत असतात..

___

“आरोही तू का नाही म्हणतेय यायला?”

“नाही यायचं मला तुमच्या सरांकडे.. कारण विचारू नका..”

“असं कसं? अगं त्यांनी मदत केली वेळेवर म्हणून तुझ्यावर वेळीच उपचार झालेत..माझी शपथ आहे तुला, तू येणार..”

आरोही नाईलाजाने तयार होते. दोघेही मानवच्या घरी पोचतात. मानवची बायको दोघांचं छानपैकी स्वागत करते.

“नमस्कार.. या, तुमचीच वाट बघत होतो..”

आर्वीसुद्धा तिथेच घुटमळत असते. सर्वांच्या गप्पा होतात आणि मानव म्हणतो..

“चला आता जेऊन घेऊया..”

“सरिता..पानं वाढायला घे. ”

सरिता काकू बाहेर येतात अन डायनिंग वर ताटं मांडतात. सर्व पदार्थ टेबलवर मांडून झाल्यावर पाण्याचं घ्यायला आत जातात.

सरिता काकू काम करत असतानाच मानवची बायको त्यांची ओळख करून देते..

“या सरिता ताई, खूप वर्षांपासून आमच्याच कुटुंबाचा एक भाग आहेत..”

सरिता पाहुण्यांकडे एकदा बघते..तिची नजर आरोही वर स्थिरावते..आरोही तटस्थ… सरीताच्या हातून ग्लासचा ट्रे जोरात खाली आपटतो…

क्रमशः

भाग 20
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-20/

भाग 21
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-21/

भाग 22
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-22/

भाग 23
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-23/

भाग 24
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-24/

भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

■■■■■■■■■■

ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल.

52 thoughts on “खेळ मांडला (भाग 19)”

Leave a Comment