खेळ_मांडला (भाग 17)
आपल्याला हे समजलं नसतं तर बरं झालं असतं असं खुशीला वाटू लागलं. कारण जे काही तिला समजलं त्यानंतर तिचं कशातच लक्ष लागेना. पण नकुलला काय उत्तर द्यायचं? त्याच्याशी खोटं बोलणं तिला पटत नव्हतं पण काहीही करून तिला तो विषय नकुलपासून आता बंद करायचा होता. तिने एक विचित्र कथा तयार केली अन तीच नकुलला सांगायची ठरवली.
______
“आरोही?? काय होतंय तुला? काय झालं?”
आरोहीचं बागेतल्या प्रसंगाला बघून नियंत्रण सुटलेलं असतं आणि ती काहीबाही बोलत असते. नकुल तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. तिचं ते अवसान बघून इतर फ्लॅट मधील लोकही बाल्कनीत येऊन बघू लागलेले. या सगळ्यात आरोहीच्या डोक्यात दुखायला लागतं अन ती बेशुद्ध होते.नकुल सैरभैर होतो. खालच्या बाल्कनीतून बघत असलेल्या सुयशला तो पटकन बोलावतो अन आरोहीला दवाखान्यात दाखल करतो. डॉक्टर तिला ऍडमिट करून घेतात, काही टेस्ट करतात. संध्याकाळी रिपोर्ट येईपर्यंत नकुल रडवेला झालेला असतो. हा प्रसंग पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात घडलेला नसतो. या आधीही त्याच्या पोटूश्या बायकोला असंच ऍडमिट केलेलं असताना त्याची झालेली घालमेल आणि बाहेर डॉक्टरांनी येऊन उच्चारलेला सॉरी हा शब्द आजही त्याच्या अंगावर काटा आणत होता. पुन्हा तेच सगळं घडत होतं. कसबसं आयुष्य मार्गी लागत असताना आरोहीला आता काही झालं तर तो स्वतःला संपवणार होता इतके विचार त्याच्या मनात येऊन गेले.
डॉक्टर बाहेर आले, एव्हाना आरोहिचे आई वडीलही तिथे पोचले होते.नकुलला डॉक्टर कडे जाऊन काही ऐकायची हिम्मत होईना, दगड बनून तो बसूनच राहिला. आरोहिचे वडील डॉक्टरांकडे गेले.
“डॉक्टर, काय झालं आरोहीला?”
“ती ठीक आहे, काळजीचं कारण नाही..”
कुणीतरी फुंकर घालावी तसे हे शब्द नकुलने कानात प्राण आणून ऐकले आणि कितीतरी वेळ रोखून धरलेला श्वास अखेर मोकळा केला.
“पेशंटची मी जुनी फाईल बघितली, त्यांच्या डोक्यावर आघात झालेलाय आणि स्मृती गेली आहे असं समजलं. पण जेव्हा जुन्या काही मनावर घट्ट रुजून बसलेल्या आठवणी डोळ्यांना दिसतात तेव्हा मेंदूतील रसायन पुन्हा जागृत होतं. सुप्त मेंदू त्याचं कार्य पुन्हा जागृत करतो. असंच काहीसं झालं होतं का?”
वडील नकुलपाशी जातात,
“नकुल, काय झालेलं नक्की?”
काय सांगणार होता नकुल..तिने त्या मुलाला आईपासून दूर जाताना पाहिलं आणि…
“नकुलराव…बोला काहीतरी..”
“मला माहित नाही, मी आत होतो अन आरोही बाल्कनीत..तिने काय पाहिलं माहीत नाही..”
या गोष्टीवर इथेच पडदा पडला..पण नकुलला खात्री पटली की ते बाळ आरोहीचंच होतं.
आरोहीची आई रडायला लागली. भाऊ आणि वहिनीच्या दुःखातून वर येत नाही तोच आरोहीला अश्या अवस्थेत बघून आई पार कोसळली होती. नकुल आणि वडील तिचं सांत्वन करत होते..
“अगं आपली मुलगी सुखरूप आहे, काहीही झालेलं नाहीये तिला , तू का काळजी करतेय??”
“हो आई, तुम्ही शांत व्हा…”
“कशी शांत होऊ बाळा? माझा भाऊ मला सोडून गेला तेव्हा माझी मुलगी अन नवरा यातच माझं सगळं जग व्यापून गेलं, त्यातही जर पोकळी आली तर माझं काहीच उरणार नाही..माझ्या भावाचं तरी अंतिम दर्शन घडलं मला, पण ..माझी सरिता वहिनी? पोलीस म्हणाले तिचं शरीर इतकं छिन्नविच्छिन्न झालं होतं की…तिचं अंतिम दर्शनही घेऊ दिलं नाही आणि पोलिसांनीच तिला अग्नी…माझी सरिता वहिनी, का गेलीस गं एकटं सोडून??” बोलता बोलता आईला स्वतःला अजिबात सावरता आलं नाही…
_________
दरवेळी नकुल खुशीला फोन करत असे, पण यावेळी खुशीने नकुलला फोन केला. नकुल आरोहीला घेऊन नुकताच घरी आलेला असतो. आरोहिचे आई वडीलही 2 दिवसासाठी नकुलकडे थांबतात. बाल्कनीत जाऊन नकुल खुशीचा फोन घेतो..
“हॅलो..”
“नकुल..कसा आहेस?”
“आरोहीला ऍडमिट केलं होतं..”
“काय? कधी? कसं?”
“काय सांगू आता, तुला तर माहितीच आहे की आरोहीची स्मृती गेलीय. बाल्कनीत होतो तेव्हा समोर बागेत तिचं लक्ष गेलं. एक बाई, तिचा मुलगा आणि बेबी सीटर असे तिघे बागेत आलेले. आईने बेबी सीटर ला सूचना देऊन बाळाला खेळायला पाठवलं आणि स्वतः तिच्या मुलाला bye करून निघायला लागली तर आरोहीला काय झालं काय माहीत..तुझ्या मुलाला सोडून जाऊ नकोस गं, तुझी सर त्या बेबी सीटरला नाही येणार म्हणून ओरडू लागली..”
खुशीला ऐकून धस्स झालं..आरोही असं का बोलली असेल हे तिला लक्षात आलं. त्या बेबी सीटरमध्ये ती तिची मामी आणि त्या मुलामध्ये ती स्वतःचं बाळ बघत होती. नकुलला जरी याचा अर्थ कळलेला नसला तरी खुशीला मात्र तो समजला.
“आता कशी आहे आरोही?”
“आता ठीक आहे, डॉक्टर म्हणाले जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात, आणि कदाचित. .काही स्मृती परतही येऊ शकतात, पण शक्यता फार कमी आहे..”
“अच्छा..काळजी घे..”
“तू सहज केलेला का फोन?”
“नाही, तू जी माहिती काढायला लावली त्यातली काही माहिती माझ्या हाती लागलीय..”
“काय? ते बाळ, कुठेय ते बाळ?”.
“नकुल, जास्त भावविभोर होऊ नकोस..जे सांगतेय ते नीट ऐक.. आणि स्वीकार कर त्याचा..”
“सांग लवकर..”
“हो ते बाळ आरोहीचं होतं.. पण..अनाथाश्रमात त्या बाळ आजारी पडलं आणि दगावलं..”
“काय?”
“हो मला एवढीच माहिती समजली, त्यामुळे आता या विषयाचा विचार करणं सोडून दे आता..आता ते बाळच नाही म्हटल्यावर सगळा विषय संपतो..”
“खूप वाईट झालं..ठिके, काय करू शकतो आपण आता..झालं ते झालं..”
नकुल स्वतःलाच समजावत फोन ठेऊन देतो. हा विषय त्याच्यासाठी आता बंद झाला होता. आरोहीच्या बाळाला घरी आणणं या त्याच्या हेतूला पूर्णविराम लागला.
खुशीला एका अर्थाने समाधान मिळतं, जे चालू होतं तेच चालू राहावं, त्यातच सर्वांचं भलं आहे.
खुशीने पुढे येणाऱ्या मोठ्या वादळाला तिथेच शमवलं होतं.
नकुल नाराज होत घरात येतो, आरोहीची आई तिच्या पर्स मधील तिच्या भाऊ अन सरिता वहिनीचा फोटो बघत असते. आईला आज त्यांची फार आठवण येत असते. कठीण प्रसंगात दोघेही ढाली सारखे उभे राहत. नकुल त्या फोटोकडे बघतो आणि आरोहीच्या आईसाठी त्याला वाईट वाटतं..
“आपली माणसं सोडून गेली की काय होतं याची जाणीव आहे आई मला..”
_____
नकुल त्याच्या ऑफीसला पुन्हा जायला लागतो. आरोही साठी त्याने काही दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. त्याच्या कंपनीने नव्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी एका कंपनीत त्याला जायला सांगितलं. नकुल सगळी तयारी करून त्या कंपनीत जातो. कंपनी बरीच मोठी होती, बिल्डिंग पासून ते फर्निचर पर्यंत सगळं अलिशान.
नकुल त्या बॉस च्या PA ऑफिस मध्ये जातो..PA त्याच्या साहेबांशीच बोलत असतो.
“सॉरी मिस्टर नकुल आम्ही तुम्हाला कळवायला विसरलो, आज साहेबांची तब्येत बरी नसल्याने ते घरीच आहेत..तुम्हाला उद्या यावं लागेल..”
“हरकत नाही, उद्या येतो. ”
नकुल माघारी फिरतो..PA ला साहेब काहीतरी सांगतात आणि PA नकुलला पुन्हा थांबवून घेतो.
“एक मिनिट, साहेब म्हणताय की त्यांच्या घरी जायला जमेल का तुम्हाला?”
“हो चालेल, जमेल..”
“मी तुम्हाला पत्ता पाठवतो, जा तुम्ही..”
“Ok सर. ”
नकुल साहेबाच्या घरी जातो..
“नमस्कार मी नकुल..”
नकुलला पाहून साहेब जरा गोंधळतो,
“नमस्कार, मी मानव…कंपनीचा CEO..”
मानव आणि नकुल समोरासमोर येतात..मानवला लक्षात येतं की हा आरोहीचा नवरा आहे. नकुल मात्र मानवला फारसा ओळखत नसतो.
“मला वाटत तुम्हाला या आधी पाहिलं आहे..”
“हो, अनाथाश्रमात आणि सागर च्या लग्नात आपण समोरासमोर आलेलो..”
“काही माणसं सतत समोरासमोर येत असतील तर देवाच्या मनात काहीतरी असतं असं मी समजतो..”
“असेल कदाचित, एखादं नातं असावं आपल्यात, त्याशिवाय पहिल्याच भेटीत असं मोकळेपणाने बोलणं कठीण असतं..”
मानव आणि नकुल मध्ये कंपनीच्या कामाची चर्चा होते. मानव त्याला त्याचा निर्णय 2 दिवसांनी कळवतो असं सांगतो.. मानवाची तब्येत बरी नसल्याने त्याला नकुलच्या बोलण्याकडे जास्त एकाग्र होता आलं नाही, समजेल तेवढं समजून घेण्याचा मानवने प्रयत्न केला. नकुल काम झाल्यावर जायला निघतो तोच आर्वी त्याला दिसते, ती कॉलेजला जात असते..
“हिला आपण लग्नात पाहिलेलं, किती लहान होती..दिवस कसे पटापट निघून जातात कळतही नाही.”
तोच मागून एक वयस्कर बाई धावत येते,
“आर्वी बाळा, डबा विसरलीस..”
“थॅंक्यु मावशी..”
आर्वी तिची स्कुटी काढत भर्रकन निघून जाते. पण ती वयस्कर स्त्री…तिला कुठेतरी पाहिल्या सारखं वाटतं.. नकुल विचार करत करतच निघून जातो..
___
“आर्वी गेली का कॉलेजला?”
“हो..तुम्हाला बरं आहे का आता? गोळ्या घेतल्या का?”
“हो…आर्वी डबा घेऊन गेली का?”
“हो…सरिता ताई तिला असंच थोडी जाऊ देणार? आपल्याकडे स्वयंपाकीण म्हणून काम मागायला आल्या अन इथल्याच होऊन गेल्या, फार वाईट झालेलं त्यांच्या आयुष्यात.. नवरा गेला अन त्या एकट्या पडल्या..पण आर्वीला मात्र लहानपणापासून खूप जपलं त्यांनी..”
क्रमशः
_____
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.com/lv/register?ref=P9L9FQKY
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.