खाली दिमाग..शैतान का घर

 आज चारही भावांची टेरेसमध्ये गंभीर चर्चा सुरू होती. चौघेही बायकांच्या एकमेकीबद्दल असलेल्या कुरकुरीला कंटाळले होते. रोज उठून तेच..”ती मला अशी बोलली, तिने मला टोमणा मारला, ती स्वतःला शहाणी समजते..” चारही जावा एकमेकींना वरचढ..माघार घ्यायला कुणीही तयार नाही. आई वडील गेल्यानंतर मोठा वाडा सुना पडला. चौघाही भावांनी लग्न करून बायकांना आणलं, वाड्याला एक चैतन्य येईल असं त्यांना वाटलेलं, पण झालं उलटंच.

एक दिवस मोठीने भाताचा कुकर लावलेला, दुसरीला सांगितलं की मी अंघोळीला जातेय लक्ष ठेव..तितक्यात तिसरी तिथे आली, तिसरी आली म्हणून दुसरी मोबाईल मध्ये बोटं घालू लागली.. चौथीने तर शिट्ट्या व्हायच्या आत कुकर बंद करून दिला…

एवढासा प्रसंग, पण घरात रामायण उभं राहिलं…

“अगं घरात मी मोठी, पण कधी मान नाही दिला तुम्ही…स्वैपाकाचं तुम्ही पाहायचं तर मलाच मरावं लागतं… नुसतं कुकर कडे लक्ष द्यायला लावलं तेसुदध होत नाही..”

“वहिनी घरात नुसता स्वैपाक नसतो, बाकीचीही कामं असतात..”

तसं पाहिलं तर कामं थोडी असायची, पण डोक्यात दुसरं काही नसल्याने दिवसभर एकमेकींच्या विरुध्द कट कारस्थान रचण्यातच या बायकांचा वेळ जाई.

सर्व भावांनी मिळून एक उपाय काढला..मोठीला शिलाई मशीन आणून दिलं, दोन नंबरच्या सुनेला एक लॅपटॉप घेतला, तिसरीला पार्लर चं दुकान थाटून दिलं आणि चौथीला वाळवणच्या ऑर्डर दिल्या..

मोठीने शिलाई कामात अडचण नको म्हणून उठल्या उठल्या भाजी टाकून दिली, दुसरीला टायपिंग चं काम मिळालं, तिला कामाला बसायचं म्हणून झटपट पोळ्या करून घेतल्या, तिसरीला पार्लर मध्ये जायचं होतं, तिने पटापट भांडी धुतली अन झाडू मारून घेतला, चौथीला नागली वाळवायची असल्याने तिने झटपट फरशी पुसून कपडे मशीन मध्ये लावून वाळत टाकून दिले.

चौघींनी पटापट आवरून आपापली कामं करायला घेतली, त्यांच्यात एक नवीन उत्साह संचारला होता,डोकं आता रिकामं रहात नव्हतं, एका मागून एक कामं मिळत गेल्याने दिवसभर त्या व्यस्त राहू लागल्या..

एक दिवस मोठ्या भावाने सहज परीक्षा घ्यायची म्हणून बायकोला म्हटलं..

“काय गं, या पोरी कामं करतात की तुझ्यावर टाकून देताय सगळा भार?? तसं असेल तर चांगलं झापतो बघ त्यांना.”

“कशाला उगाच वाद, करतात सगळेजण कामं..आणि राहिली तरी करून घेईन मी..आणि असल्या क्षुल्लक गोष्टींचा उदोउदो करत जाऊ नका बरं.. सरका बाजूला…उद्या चार ब्लाउज द्यायचेत मला…वेळ नाही अजिबात..”

भाऊ आ वासून पाहतच राहिला..

लहान भावांनीही बायकांची परीक्षा घेतली,

“अगं किती कामं करतेस, आराम करत जा…बाकीच्या नुसत्या बसून आराम करतात..मी काय म्हणतो, आपण जरा फैलावर घेऊया त्यांना एकदाचं..”

“ह्या असल्या वाह्यात गोष्टींसाठी वेळ नाही मला…ऑर्डर आहेत पुढचा पूर्ण आठवडा… ती कामं करू द्या…आणि कशाला किरकोळ कामावरून तू तू मै मै करायचं…व्हा बाजूला…कामं करू द्या..”

चौघे भाऊ खुश, प्लॅन यशस्वी झालेला…
पुन्हा एकदा सर्वजण टेरेस मध्ये जमले, इतरवेळी गंभीर चर्चा करणाऱ्या बैठकीत आज मात्र पार्टी रंगणार होती..

तात्पर्य: तुम्हीच सांगा 😁😁😁

Leave a Comment