खरी पूजा

गणपती बसणार म्हणून नित्या च्या घरी धावपळ सुरू होती, यावेळी तिचे सासू सासरेही आले होते त्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला…सर्वांनी मिळून छान आरास केली होती, नित्याने नेट वर बघून शाडू च्या मातीची छानशी मूर्ती तयार केलेली..सासूबाईंनी आदल्या दिवशीच पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आणि नैवेद्यासाठी काय काय बनवायचं याबद्दल नित्या ला सांगून ठेवलं होतं…

नित्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असे. शिकवण्यात तिचा हात कुणीच धरू शकत नसे…नित्या मॅडम म्हणजे मुलांच्या आवडत्या शिक्षिका…lokcdown मुळे एकदम शाळा बंद झाल्या, पण ऑनलाइन तास मात्र सुरू झाले…त्यात शाळेने मुलं मागे राहू नये म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारेच तोंडी परीक्षा घ्यायला लावली होती…मागे एकदा नित्या ने सुट्टी घेतली होती त्यामुळे तिचा काही पोर्शन मागे राहिला होता…

गणपती साठी ती लवकर उठून तयार झाली..

“आई मी नेवैद्य तयार करते, मला थोड्या वेळात ऑनलाइन तास घ्यायचा आहे एक तासासाठी…”

“अगं तू निश्चिन्त रहा…काही घाई नाही, आपली सगळी तयारी झालेलीच आहे..” सासूबाईंच्या बोलण्याने तिला जरा हायसं वाटतं.

“आज गणपती बसणार असताना कसला तास? शाळेला सुट्टी नाही का आज??” तिचा नवरा चिडूनच म्हणाला…

“अहो मागे एकदा सुट्टी घेतलेली ना मी, त्यामुळे आज ते पूर्ण करायचं आहे…1 तास फक्त..प्लिज..”

“प्लिज काय म्हणतेस? तुझं काम आहे ते..परवानगी का मागावी लागते तुला??”

“तू मुलाची बाजू कधीच घेऊ नकोस..”

“मी खऱ्याची बाजू घेते फक्त..”

तिघांमधला प्रेमळ वाद संपवून नित्या तिच्या खोलीत जाते…लॅपटॉप सुरू करून सगळा सेटअप करून तिचा तास ती सुरू करते…समोर स्क्रीन मध्ये सर्व मुलं दिसत असतात…काहीजण छानपैकी तयार झालेले असतात…काहीजण नुकतीच उठलेली असतात…एकाच्या हातात तर अर्धा संपलेला मोदक होता अन तोंडाची हालचाल न करता तू गपचुप संपवत होता…नित्या ला मुलांमधला तो निरागसपणा बघून हसू आलं…तिने तिचा तास सुरू केला..

“तर आज आपण शिकणार आहोत…” असं म्हणत तिने इतिहासातील एक धडा सुरू केला…तो धडा गोष्टीरूपात शिकत शिकत मुलं त्यात इतकी रमली की कुणालाही वेळेचं भान राहिलं नाही…

नित्या तास संपवून बाहेर येते…बघते तर काय, गणपती प्रतिष्ठापना केव्हाच झालेली असते…आरती सुद्धा झालेली असते…ती घड्याळात बघते, दोन तास निघून गेलेले असतात अन तिला समजलंही नाही…ती अपराधीपणाने सर्वांसमोर गेली… तिचा नवरा ओरडला..

“एकच तास होता ना फक्त? किती आवाज दिले आम्ही, तुला आरतीचाही आवाज आला नाही??? दार वाजवलं तर उघडलंही नाही…शेवटी आम्ही पूजा करून घेतली..किती गं हा बेजबाबदारपणा..”

“अहो..खरंच सॉरी, मुलं इतकी रमली होती की त्यांनाही वेळेचं भान राहिलं नाही, आणि हेडफोन मुळे कसलाच आवाज आला नाही..”

“जाऊदे, यावेळी काय पुण्य मिळायचं ते आम्हालाच मिळेल…तुला मात्र ठेंगा..”

सासूबाईंनी रोखून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या..

“पूजा आपण केलीये पण पुण्य मात्र तिच्या पदरात पडेल हा..”

“ते कसं??”

“गणपती म्हणजे ज्ञानाची, बुद्धीची देवता…ज्ञानाची उपासना म्हणजेच गणपती ची उपासना…आपण फक्त भौतिक पूजा केली…पण तिने मुलांना मनापासून शिकवून..त्यांना ज्ञान देऊन खऱ्या अर्थाने पूजा संपन्न केली…त्यामुळे ठेंगा तिला नाही…तुलाच..”

सासूबाईंच्या अश्या समजूतदार वागण्याने आणि अश्या उच्च विचारांनी नित्या भारावून गेली… ती म्हणाली..

“ज्या घरी गणेशाची पूजा खऱ्या अर्थाने समजून घेतली गेली, अश्या घरात येऊन मी खरंच धन्य झाले…थँक्स सासूबाई..”

2 thoughts on “खरी पूजा”

Leave a Comment