कोरोना संकटात देव कुठे आहे असं म्हणणाऱ्यांनी.. नक्की वाचा

“राजेश….अरे तुझे आई बाबा कपाटाखाली अडकलेत..”

“काय? कपाटाखाली? कसेकाय? तुला कसं समजलं? ठीक आहेत ना ते?”

राजेश ची धडधड वाढते, प्रचंड वेगाने तो टेरेस मधून खाली उतरत घरात शिरतो…पाहतो तर काय, आई बाबांचं पासपोर्ट फोटो कपाटाखाली पडलेला….अन आई बाबा त्यांचा बेड मध्ये शांतपणे बसले होते…

राजेश चिडला, “मोहन…लाज वाटते का असा विनोद करायला…लहान आहेस का तू? का असं मूर्खासारखं वागलास??”

“कारण काल मी तुझं स्टेटस पाहिलेलं..देवही इथे हरला.. कुठे आहे आता तुमचा देव…मंदिरं सुद्धा बंद केलीत अखेर असं काहीतरी तू लिहिलेलंस…मग मला वाटलं की तुझ्यातलं अज्ञान दूर करावं…”

“काय चुकीचं बोललो मी, इतर वेळी संकट आलं की धाव मंदिरात, दुःख आलं की धाव मंदिरात… आता ती जागाच बंद केली..तुमचा देवही कैद झाला…”

“तुझे आई बाबा कपाटाखाली अडकले होते ना?”

“मूर्खा, ते नाही, त्यांचे फोटो..”

“मग तेच मला सांगायचं आहे…जसं फोटो ही एक प्रतिकृती असते…एक प्रतीक असतं तसंच मंदिरसुद्धा प्रतीकं असतात…श्रद्धेची…तू बाहेर असताना आई वडिलांची आठवण आली की हेच फोटो बघायचा ना? मग देवाचं ही तसंच आहे…”

“पण मग ज्या धर्माला तुम्ही इतकं वर नेऊन ठेवलं…ज्याचा उदो उदो केलात तो या कोरोना च्या संकटात कुठे गेला? आला का तो कामात?”

“मित्रा…धर्माने आधीच असलं काही संकट येऊ नये म्हणून माणसाला खूप गोष्टी शिकवल्यात… पण दांभिक माणसांनी धर्माचा वेगळा अर्थ काढून त्याचा अनर्थ केला..आज के कर्मकांड तुला दिसतंय ना, ते खऱ्या धर्माचं स्वरूप नाहीये…”

“हे बघ, या जगात केवळ विज्ञान हेच एक सत्य आहे…”

“विज्ञानाला सुद्धा धर्माचं समर्थन आहेच की..”

“काय सांगितलं आहे तुझ्या धर्माने??”

गीतेत सांगितलं आहे…

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ (१६)


युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ (१७)

आहाराचं प्रमाण, व्यायामाचं महत्व, झोपेच्या वेळा असं आरोग्यास पूरक विधान याच धर्मात सांगितलं आहे..

आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः৷৷17.8

असं सात्विक आहाराचं महत्व सुद्धा धर्मात सांगितलं आहे..

“जिवो जीवस्य जीवनम..”

निसर्ग केवळ मानवाचे भोग पूर्ण करायला नाही, संपूर्ण प्राणिजातीला आश्वासक आहे…पण जर माणूस दुसऱ्या प्राणिजातीवर हल्ला करायला लागला तर निसर्ग कसा ऐकेल??

धर्मात सूर्य, वृक्ष, पशु, प्राणी, पंचमहाभूते यांना देव मानलं आहे…अर्थात निसर्गाला देव मानलं गेलं आहे…आणि हा निसर्ग म्हणजेच देव…हेच धर्म सांगतो…मग निसर्गाला आपण आव्हान देणं म्हणजे देवालाच आव्हान देणं नाही का? म्हणून वेळोवेळी निसर्गाची पूजा म्हणजेच निसर्गाचं रक्षण आपल्या धर्मात सांगितलं गेलं आहे….

वटपूजा, नागपंचमी, वसुबारस, तुळशी विवाह हे सगळं बाहेरून दांभिक दिसत असेल पण त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलेली एक दृष्टी आहे…धर्माने माणसाला आधीच सर्व सूचना दिल्या होत्या…पण माणसाला प्रयोग हवे होते, निष्कर्ष हवा होता…धर्मावर विश्वास ठेवतय कोण…
कोरोना हे निसर्गाच्या ऱ्हासाचाच परिणाम आहे हे सत्य डावलून चालणार नाही…म्हणून धर्माने निसर्गाच्या विरुद्ध जाण्यापासून रोखले होते..

या स्पष्टीकरणावर राजेश मात्र निःशब्द झाला…मोहन ने त्याला सांगितलं…

“मित्रा…जिथे विज्ञान संपतं ना…तिथे अध्यात्म सुरू होतं…”

_______
कोरोना आला अन आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवणाऱ्यांचं चांगलंच फावलं. स्वतःला विज्ञानवादी मानत असलेल्या लोकांना तर “कुठेय तुमचा देव, कुठेय तुमचा धर्म” म्हणायला मार्ग मोकळा झाला.
स्वतःला विज्ञानवादी म्हणवणाऱ्या माणसांना आता देवाचं अस्तित्व नाकारायचा एक पुरावाच हाती लागलाय जणू. मंदिर, चर्च बंद झालीत…देव अडकून पडलाय…असं म्हणणाऱ्यांना आता कुठल्या पातळीवर जाऊन अध्यात्म शिकवावं हाच प्रश्न पडलाय….
अशांनी ही कथा जरूर वाचावी…
©संजना सरोजकुमार इंगळे

1 thought on “कोरोना संकटात देव कुठे आहे असं म्हणणाऱ्यांनी.. नक्की वाचा”

Leave a Comment