कोरडी झालेली ती

 “तुझं बरंय, तुझी बायको बिचारी काहीही बोलत नाही तुला..नाहीतर आम्ही, जरा कुठे उशीर झाला की फोनवर फोन सुरू..”

“हो मग, माझी बायको नाही तुमच्या बायकांसारखी..आज पिऊन आले म्हणून जाब विचारणारी..”

राकेशचे 4-5 मित्र नशेत बोलत होते. आज या मित्रांची मस्त मैफिल जमली होती. अकरा वाजत आले तसे एकेक जण उठू लागले.. घरून फोन येऊ लागलेले..

“अरे बस रे, जाशील की..”

राकेश एकेकाला सांगत होता, राकेशला काही भय नव्हतं पण बाकीचे मित्र मात्र बायकोच्या धाकाने आवरतं घेत होते. राकेश मात्र मोठ्या मिजाशीने आपण किती निवांत आहोत हे दाखवत होता. सर्वजण निघून गेल्याने राकेशलाही निघावं लागलं. घरी जाताच बायकोने जेवायचं विचारलं, जेऊन आलोय सांगताच बायकोने स्वतः जेऊन घेतलं अन काहीही न विचारता ती झोपी गेली.

“अशी बायको पाहिजे” राकेश मनातल्या मनात गर्व बाळगत झोपी गेला..

बरीच वर्षे उलटली, राकेशचं निवृत्तीचं वय झालेलं. कंपनीतून रितसर कार्यक्रम होऊन तो रिटायर झाला आणि घरी मस्तपैकी आराम करू लागला. आता कुठे मेघनासोबत त्याला जास्त वेळ मिळत होता. घरात बसून त्याला कंटाळा यायचा. आजवर मेघना सोबत कामाव्यतिरिक्त काही गप्पा होत नव्हत्या पण आज त्याला तिच्याशी बोलू वाटे, पण ती कुठे रिटायर झालेली? तिची कामं दिवसभर सुरूच असायची.

राकेश तिच्याशी बोलू पाहायचा..

“चहा पाहीजे? नाश्ता हवाय का?” हेच ती विचारे.. नवऱ्याला काही दुसरं बोलायचं असेल हे तिच्या ध्यानीमनी सुदधा नसायचं..

ती उठायची, अंघोळ, देवपूजा होताच स्वयंपाकाला लागायची. मग कपडे, भांडी, झाडझुड, फरशी यातच दिवस निघून जाई. एकही दिवस कामात खंड नाही. 10 वाजले की तिच्या पोळ्या व्हायच्या, 1 वाजता ती दुपारची भांडी घासायची, राकेशला हे सगळं आता पाठ झालेलं.

आज मात्र त्याने ठरवलं, बायकोला घेऊन मुव्हीला जायचं. संध्याकाळी 8चा शो होता. दुपारी 1 वाजता तो तिच्याजवळ आला, सिंकपाशी ती उभी होती. 

“मेघना, आज संध्याकाळी आपल्याला मुव्हीला जायचं आहे..”

“काय?”

“मुव्हीला जाऊ संध्याकाळी..”

“हो जाऊया..”

राकेश तिथेच उभा होता..मेघनाने चार ग्लास घासून धुऊन जाळीत ठेवले. बाकीचेही भांडे धुवून ठेऊन दिले. सिंक मोकळा झाला. पण पुन्हा तिने ते चार ग्लास काढले अन घासू लागली. निघाले नसतील म्हणून परत घासत असेल, राकेशला वाटलं. पण पुन्हा तेच? झालेली सगळी भांडी तिने तीन वेळा पुन्हा पुन्हा धुवून ठेवली…आणि म्हणली, “तुम्हाला काही विचारायचं होतं का?”

“संध्याकाळी मुव्ही ला..”

“आत्ता सांगताय? मला अजून भांडी घासायची आहे एवढी..” रिकाम्या सिंक कडे बघत म्हणाली..

राकेशला दरदरून घाम फुटला.. हे काय करून बसलो मी? बायकोचं हे वागणं माझ्या कधी लक्षात का आलं नाही? किती दिवसापासून? महिन्यापासून? नव्हे वर्षांपासून ही मानसिकरित्या आजारी आहे? 

राकेश खोलीत गेला, त्याने दार लावून घेतलं आणि आधीचे दिवस आठवले..

“मी चुकीचा वागायचो तेव्हा मेघना मला टोकायची, बोलायची..पण मी तिला कायम धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला, माझ्या आईने मी कितीही चुकलेलो असलो तरी माझीच बाजू घेतली. मी आजवर समजत होतो की माझी बायको चांगली आहे, मला टोकत नाही, जाब विचारत नाही. पण..कारण वेगळंच होतं. सततच्या धक्याने ती अगदी कोरडी झालेली, मी कायम माझ्या दुनियेत.. मी सकाळी पेपरमध्ये गुंग असायचो, ही डबाच बनवत असायची..मी ऑफिसला जायचो ही घरात कामच करत असायची, मी घरी यायचो ही पोळ्याच लाटत असायची, मी झोपायचो ही भांडीच घासत राहायची…माझा दिनक्रम बदलायचा पण हिचा कधीच बदललेला पाहिला नाही…आणि म्हणूनच, इतकी कोरडी झालीये ही? इतका यांत्रिकपणा आलाय तिच्यात? मला टोकत नव्हती, दारू प्यायला जायचो तरी बोलायची नाही ती चांगली होती म्हणून नाही, तर तिच्यातला भावच मी मारून टाकलेला. आणि इतकी वर्षे ही अशीच जगतेय? कसली तक्रार नाही, कसली चिडचिड नाही..मला वाटायचं चांगलंच आहे..ती बाहेरून कितीही चांगली दिसून आली तरी आतून पोखरली गेलीय हे कधी मी पाहिलं का नाही??” राकेशला आज समजलं मेघनाचं वागणं. थोडा उशीरच झालेला..

मेघना खोलीत आली, जेवण झालेलं असताना म्हणू लागली,

“जेवायला वाढू का??”

राकेश उठला.. तिच्यापाशी गेला. तिचा हात धरून तिला बाहेर पडत असलेल्या पावसात नेलं. ती डोळे बंद करून पावसाला मनात भरून घेत होती. त्यावेळी दोन संकल्प जन्माला आले..पावसाला कोरड्या मातीला तृप्त करण्याचा आणि दुसरीकडे कोरड्या झालेल्या मनाला आर्द्र करण्याचा.  

____
ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल. 

4 thoughts on “कोरडी झालेली ती”

  1. खूप सुंदर.. असच घडतं..आम्ही पुरुष स्वतःच्या मस्तीत वावरत असतो पण आपण आपल्याच मस्तीमुळे आपल्या बायकोचे इतके अवमूल्यन केले आहे हे आमच्या गावीही नसते इतके बधीर झाले असतो आम्ही …

    Reply
  2. चांगलं आहे एक पुरुष म्हणून तुम्हाला हे समजत.. नाही तर बाकी पुरुषांना नाही समजत हे..

    Reply

Leave a Comment