केवळ एक सन्मान..

 नाही म्हटलं तरी ननंदेच्या घरी लग्न म्हणजे कावेरीच्या पोटात गोळाच उठायचा.

एका छोट्याश्या खेडेगावतल्या कुटुंबातील कावेरी. नवरा, मूल, सासू सासरे आणि नातेवाईक यापलीकडे स्त्रीचं काही आयुष्य नसलं तरी याच व्यापात आपलं सुख मानत कावेरीचं आयुष्य चाललं होतं. खेडेगावात भावाची बायको म्हणजे कामं करणारी हक्काची बाई, तिथे कामवाल्या बाया असा प्रकारच नसायचा, कारण या कामासाठी माम्या, आणि सुनाच वापरल्या जायच्या. आणि मग याच माम्या आणि सुना, आपल्या माहेरी तीच रीत चालवत आपल्या भावजयांकडून कामं करून घ्यायच्या.

पण वयाप्रमाणे कावेरीला आता दमणूक होई, इतकी वर्षे कायम सर्वांचं केलं, कधीतरी आपली सुटका होईल म्हणते तर नाही..एक झालं की एक सुरू..

आता ननंदेच्या घरी तिच्या धाकल्या मुलीचं लग्न निघालं, मग काय, पाहुणे रावळे त्यांचं चहा पाणी नाश्ता जेवण, सगळी जबाबदारी कावेरीवर..पदर खोचून ती पुन्हा तयार झाली, तिकडे जाऊन कामं करणं भाग आहे हे ती ओळखून होती.

तिने मुलांचं आवरलं, लग्नात जायचं म्हणजे मुलांना पर्वणीच. मुलं आनंदाने उड्या मारायला लागले, कावेरीने पटापट बॅग भरली, लग्नात घालता येण्याजोगे कपडे घेतले, एक बऱ्यातली साडी घेतली आणि बस पकडून लग्नघरी पोचली.

उन्हाळ्याचे दिवस होते, पोचता पोचता दमछाक झालेली. मुलं पटकन आपल्या भावंडांमध्ये मिसळले, कावेरीला समोर आपले नातेवाईक, सासूबाई आणि नणंद दिसली, तिने पटकन डोक्यावर पदर ओढून सर्वांच्या पाया पडल्या आणि लागलीच स्वैपाकघरात रवाना झाली.

किचन जणू तिची वाटच पाहत होतं, स्वतःच्या हाताने पाणी घेतलं, उभ्या उभ्याच पिलं, कारण बसून पिताना कुणी पाहिलं तर? पटकन तिने नणंद बाईशी बोलून काय काय कसं करायचं विचारून घेतलं अन ती कामाला लागली.

चहा टाकला, 25-30 लोकांना चहा देऊन होताच पोहे बनवायला घेतले. कांदा चिरेस्तोवर अजून 5 पाहुणे आले अन त्यांचा चहा वाढवला, दोन्ही कामं एका वेळी चालत होती, काही बायका मधेच येऊन “आमच्या लेकाला दूध द्या कपभर, चहा घेत नाही तो..”

“बिस्कीट आहेत का? सोन्या रडतोय..”

“मला बिनसाखरेचा चहा..”

अश्या एकेक डिमांड सुरू झाल्या.

चहा पोहे आटोपताच कावेरी स्वैपाकाला लागली, चहाचा एक घोटही घ्यायला उसंत नव्हती तिला..2 भाज्या, भात, वरण लावून झालं, आता पुऱ्या बाकी होत्या. तेवढ्यात धाकल्या जाऊबाई अंगावरचे दागिने मिरवत आल्या, तिला पुन्हा चहा नाश्ता दिला, कावेरी वाटच पाहत होती की ती मदतीला येईल आणि पुऱ्याचं बघेन, तेवढीच जरा आपल्याला उसंत. जाऊबाई नातेवाईकात मिरवतच राहिल्या, तती काही किचनमध्ये पाय टाकणार नाही हे लक्षात आलं आणि उसनं अवसान आणत कावेरी कशीबशी उठली. काहीतरी कारण करून इथून पळ काढावा असं तिच्या मनात येऊ लागलं…

तिकडे हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्यात हळदीच्या कार्यक्रमात लग्नातली महत्वाची स्त्री मुलीच्या अंगाला पहिले हळद लावे, हा मान शक्यतो आत्याचा असे, पण मुलीची आत्या काही कारणाने रुसून दुसरीकडे थांबली होती.

कावेरी सासूबाईंकडे आली, आता यांना सांगू, की तब्येत जरा नरम गरम आहे अन जाऊ इथून असं तिने ठरवलं.. ती काही बोलायच्या आत सासूबाई म्हणतात,

“कावेरी, आलीस बाई..तुलाच हाक देणार होतो बघ..जा मुलीला हळद लाव पहिले..”

“सर्वांची लावून झाली का??”

“पहिले तूच लाव..लग्नातल्या मुख्य स्त्रीने आधी लावायची..”

नातेवाईकात सर्वजण बोलू लागले,

“मामीचा मान कधीपासून सुरू झाला? हा मान आत्याचा, नाहीतर मावशीचा…हे काय सुरू केलं यांनी??”

“ए बायांनो…तुम्ही पोटात सकाळपासून चहा नाश्ता ढकळताय ना..ते सगळं या एकट्या बाईने पाहिलंय..5 बायकांचं काम या एकटीने केलं…किती महत्वाची बाय आहे ही…हिचाच मान हाय त्यो..”

आपल्याला पहिला मान मिळेल म्हणून लहान जाऊबाई नटून थटून जवळच बसलेल्या, हे ऐकून ती तर बोटच मोडू लागली..

कावेरीचा दिवसभराचा शीण एकदम उतरला, हळद लावायला पुढे जाताना अंगात असलेली खरखटी, ओलसर साडी सावरत पुढे जातांना तिला काहीच लाज वाटली नाही, हळद लावून झाली अन बायकांनी विचारलं,

“चला पंगती बसवायला सुरवात करा..”

सासुबाईंनी धाकल्या देराणीला सांगितलं..

“सकाळपासून राबतेय ती, जा आता पुऱ्या तू बनीव..”

“बसुद्या हो तिला..मी खमकी हाय अजून..आत्ता झटपट पुऱ्या लाटते बघा, बसवा तुम्ही पंगती..”

थोड्या वेळापूर्वीची कावेरी अन आत्ताची कावेरी यात खूप मोठा बदल होता.. तिला थोडासा मान मिळाला नसता तर पुऱ्या कुणी दुसरीनेच केल्या असत्या…फरक होता तो फक्त एक कौतुकाचा शब्द अन दिलेला सन्मान…

15 thoughts on “केवळ एक सन्मान..”

  1. बरोबर आहे. पण इवीतेवी कामं करायचीच असतात, करावीच लागतात, जर थोडा मान मिळाला तर कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं.

    Reply
  2. बरोबर आहे. पण इवीतेवी कामं करायचीच असतात, करावीच लागतात, जर थोडा मान मिळाला तर कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं.

    Reply
  3. असंच असत समाजात. जो लांब लांब राहतो तो सूटतो अन अंगावर घेणारा अडकतो. भावजय म्हणजे हक्काची. तीला मानपान नको नी काही नको. टोमणे मारायला मात्र पुढे नणंदा वगैरे.

    Reply
  4. मान मिळाला पण काम अंगावर पडलच ना. बाकीच्यांना enjoy मिळाला आणि ही राबत बसली.

    Reply
  5. Saglyanni milun kame keli tr ti lavkar hotat, kona ekavar tan padat nahi, saglyanni ekmekanna samjun ghyave, Milun kam karave an karyakramacha anand lutava,

    Reply
  6. खरंय, भावजय ही फकत कष्ट करण्यासाठीच असते.. नणंदेच्या मुलांचे लाड करण्यासाठी असते. पण तिच्याकडून काही चुकले अथवा राहिले तर लगेच टोमणे मिळतात.. किंवा सतत अपमान वाट्याला येतो..

    Reply
  7. हो आम्ही पण नणंदेच्या घरी प्रत्येक कार्यक्रमात अशाप्रकारे खुप कामे केलीत.

    Reply
  8. जी काम करणारी असते तिला कामच करवं लागते .. अगदी माझीच कथा वाटली… समजदार आहे.. असं म्हणून काम करून घ्यायचे. मान नाही..

    Reply

Leave a Comment