किंगमेकर (भाग 6)

एकीकडे चॅनेल वाचवण्याचं आणि दुसरीकडे गावाकडच्या लोकांना तयार करण्याचं टेन्शन. सुरभीचं चित्त ठिकाणावर नव्हतं. घरी येताच आईने तिला काळजीचं कारण विचारलं,

“सुरभी? काय झालं गं?”

“खूप मोठा निर्णय देऊन आलीये मी आज”

“म्हणजे?”

“मी ऑफिसमध्ये गेले तेव्हा चॅनेल बंद करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण होत आलेले, मी त्यांना अडवलं आणि चॅनेलची जबाबदारी मी घेते असं सांगून तयार केलं. मोठ्या मुश्किलीने ते तयार झाले. आता पुढच्या सहा महिन्यात चॅनेलचा trp वर आला नाही तर माझ्यासकट सर्वांचे जॉब जातील, चॅनेल बंद पडेल”

आई हे ऐकून काळजीत पडली.

“हे बघ बाळ, एक नोकरी गेली तर दुसरी मिळेल, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको”

“आई मी हार कशी मानू शकत होते? प्रश्न फक्त नोकरीचा नाही तर आमच्या सन्मानाचा आहे. आम्हा सर्वांचं कुठेतरी काहीतरी चुकत असेल म्हणूनच चॅनेल इतकं खाली गेलंय. पण आता त्याला पुन्हा वर आणायचं आहे.”

“हो पण कसं करशील हे सगळं?”

“आई तुला म्हटलेलं ना, आपल्या गावची मंडळी..”

“अगं त्यांच्या भरवशावर तू जबाबदारी तर घेतली नाहीये ना? एक तर त्यांनी साधं भेटायलाही नकार दिलेला..त्यात तू असं म्हणतेय..”

“आई काहीही करून त्यांना तयार करणं भाग आहे, मला शंभर टक्के खात्री आहे की ती लोकं काहीतरी चमत्कार घडवून आणतील..”

“कसं तयार करशील त्या लोकांना? काय उपाय आहे तुझ्याकडे?”

सुरभी विचार करते,

“आई, चांगल्या कामासाठी वागलेलं असत्य हे सत्यातच मोजतात ना?”

“म्हणजे?”

सुरभी फक्त हसते..

“आई, मी गावाकडे निघतेय.. गाडी बुक केलीये..1 तासात येईलच..मला जावं लागेल..”

सुरभी आता हट्टाला पेटलीये म्हणजे कुणालाच जुमाणणार नाही हे तिच्या लक्षात आलं. तिने सोबत काळी मिरी, भांड्यांचा साबण आणि एक डिश सोबत घेतली. आईने पटकन हाताला जो खाऊ लागेल तो बांधून दिला आणि तिला निरोप दिला. गावी फोन करून सुरभी येतेय असं कळवलं. सुरभी तिच्या चॅनेल मध्ये काम करणाऱ्या एका ज्युनियर ऍक्टर ला सोबत घेऊन जाते आणि काय काय करायचं आहे हे त्याला समजवते.

गावी पोचताच तिने मामेभावाशी चर्चा केली आणि एक प्लॅन केला. मामेभावाला सांगितलं की पूर्ण गावात बातमी पसरव की तुझ्या घरी एक मोठे मांत्रिक आलेत, अगदी अचूक आणि विनामूल्य भविष्य सांगतात म्हणून. मामेभावाने त्याचं काम केलं आणि गावात हळूहळू बातमी पसरू लागली. एकेकजण घरी येऊ लागला. सुरभिने ज्युनियर ऍक्टरला मंत्रिकाचा वेष परिधान करायला लावून काय करायचं हे सांगितलं.

गावातला एकेक व्यक्ती येऊ लागला..

“ओम नमम भट स्वाहा..”

ऍक्टरने त्याचे डायलॉग बोलायला सुरुवात केली. मामेभाऊ म्हणाला,

“खूप मोठे तपस्वी आहेत, हिमालयातून आलेत..ते सांगतील तसं करा..”

ऍक्टरने समोर एका ताटलीत पाणी टाकलं, दुसऱ्या एका वाटीत एक मंतरलेलं पाणी घेतलं..ताटलीत काळी पावडर टाकली आणि त्या माणसाला मंतरलेल्या पाण्यात बोट बुडवून ताटलीत मधोमध बोट ठेवायला लावला. त्याने जसा बोट ठेवला तशी ती काळी पावडर सर्रकन ताटलीच्या कडांना जाऊन पसरली, बोटापासून दूर झाली..

“अरेरे…हे मंतरलेलं पाणी म्हणजे तुमचं नशीब आहे..आणि ही ताटली म्हणजे ही दुनिया.. काळी पावडर तुमचा पैसा दाखवते…तुमचं नशीब त्याला लागलं अन पैसा दूर झाला..”

“बरोबर आहे, हातात पैसा टिकतच नाही माझ्या..काही उपाय?”

“होय, रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य देत जा..पैसा येईल घरात..”

सुरभीचं नाटक यशस्वी होत होतं, आधी घरात सर्वांना जरा विचित्र वाटलेलं, पण एकेकजण येऊ लागला तशी त्यांनाही गम्मत वाटू लागली. मग एकेक माणसं येऊ लागली, काहींच्या बोट बुडवण्याने काळी पावडर लांब पळत होती तर काहींच्या स्पर्शाने ती स्थिर होती.

सुरभी वाट बघत होती ती नानांची, आजीबाईंची, तरुणांची आणि भजनी मंडळातील व्यक्तींची. मोठ्या प्रतिक्षनेनंतर तरुण आले, सुरभिने ऍक्टरला इशारा केला तसं त्याला जे समजायचं ते समजलं.

तरुणांनी बोट बुडवताच काळी पावडर दूर पळाली..

“नशीब…नाशिबापुढे काहीही चालत नाही बरं माणसाचं..पैसा असाच दूर जाणार, कंगाल होणार तुम्ही..”

तरुण घाबरले,

“उपाय सांगा महाराज..”

“एकच उपाय, गाव सोडा…बाहेर पडा.. कामधंदा शोधा..”

तरुण मंडळींना ते पटलं. मग नाना आले, त्यांनाही तेच..भजनी मंडळ, त्यांनाही तेच…आजीबाई तर अजून गावाहून आल्याच नव्हत्या..

सर्व मंडळी काळजीत पडली, गाव सोडायचं म्हणजे त्यांच्यासाठी फार मोठं संकट होतं. गावातल्या चौकटीत त्यांचं आयुष्य सुखाचं चालू होतं. संघर्ष आणि या मंडळींचा काहीही संबंध नव्हता. शहरात जायचं म्हणजे संघर्ष करावा लागणार हे त्यांना माहीत होतं. त्यांना जाणीव झाली, की देवाने एक संधी दिली होती शहरात जायची पण आपणच तिला दूर लोटलं, सर्वांना सुरभी आठवली.

मग त्यांना समजतं की सुरभी इथेच आहे, ते तातडीने सुरभीला तिच्यासोबत येण्याचं आणि ती देईल ते काम करण्याचं मान्य करतात. आजीबाईंशी काही संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे इतर मंडळीही शहराकडे रवाना झाले.

इकडे गावी मात्र सर्वजण विचारात पडले, हा असा काय जादूटोणा होता? काहींच्या बोटाच्या स्पर्शाने काळी पावडर दूर पळत होती तर काहींच्या स्पर्शाने ती स्थिर होती..

क्रमशः

किंगमेकर (भाग 7 अंतिम)

1 thought on “किंगमेकर (भाग 6)”

Leave a Comment