किंगमेकर (भाग 3) ©संजना इंगळे

बराच वेळ मुलांचा नाच सुरू होता, घरात पाहुणे मंडळींची रेलचेल होती, अश्यातच एक धिप्पाड, उंचापुरा, सावळ्या रंगांचा, कपाळावर टिळा लावलेला, अंगात फिक्कट तपकिरी रंगाचा शर्ट आणि करड्या रंगाची पॅन्ट असलेला एक पाहुणा मध्ये आला..

“चला चला, झाला का नाच? आता पूजा सुरू होईल आत..”

हा माणूस कार्यक्रमांना घाई करत होता..लग्नाचे अर्धेअधिक काम याच व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते.

संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरू झाला..त्या व्यक्तीचे नाव “नाना पवार” असल्याचे समजले. नानाची धावपळ आणि कामाची अचूकता सुरभीच्या नजरेतून सुटत नव्हती.

लग्नाचा दिवस उजाडला, सकाळ पासून नाना घरी हजर होता..एकेक करून सर्वजण त्याला प्रश्न विचारत होते.

“नाना आज जावई येणारेत 8 च्या गाडीने, त्यांना घ्यायला जावं लागेल”

“नाना वर वधूचे हार कुठे आहेत?”

“नाना आचारी अन त्याची माणसं कितीला येणारेत?”

“नाना माझी साडी घरीच राहिली हो.. लग्नासाठी खास घेतली होती..”

“अगबाई, यावर मॅचिंग बांगड्याच नाहीत..”

अगदी बायकांचे प्रश्नही ऐकायला नाना तत्पर होते..

“वेशिजवळ आबाला पाठवलं आहे..तो जवाईबापू आणि आचारीला घेऊनच येणारे..वर वधूचे हार सकाळीच फुलबाजारातून आणून कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानात ठेवलेत, माई तुझ्या घराकडून बापू येतोय, त्याला लगेच सांगतो तुझी साडी पिशवीत टाकून आन म्हणून, गाण्याला बाजारात पाठवतोय काही टोप्या आणायला, माऊ तू जा सोबत अन तुला छान बांगड्या घेऊन ये..आणि हे काय, माईला चहा दिला नाही का?”

बसलेल्या 8 बायका आणि समोर ठेवलेले 8 कप नानांनी एवढ्या गडबडीत हेरले..

नाना आले आणि सर्वांच्या अडचणी क्षणात सोडवल्या. इकडचं सगळं सावरून नाना लगबगीने बाहेर गेले, त्यांचा कामाचा सपाटा  सुरभी ब्रश करता करता लांबूनच बघत होती.

“चल सुरभी आवर लवकर…”

आईने हातात चहा आणून दिला, सुरभिने चहा पिऊन झटपट अंघोळ केली, छानशी तयारी करून घरात एका खुर्चीवर मोबाईल घेऊन बसली. इतका वेळ मोबाईल दूर असल्याने शेकडो मेसेज अनरीड होते, तिने एकेक करून वाचायला सुरवात केली. ऑफिसच्या ग्रुप मध्ये कसलेतरी वाद सुरू होते, चार पाच लोकांनी ग्रुप left केले होते, काहीतरी भयंकर घडलं आहे याची जाणीव तिला झाली. एकेक करून प्रत्येकाचे मेसेज ती वाचू लागली.

“माझा शो 6 वाजता होता माहीत असून तुम्ही व्हिडीओ एडिटिंग ला लेट केलं..एकाच्या चुकीमुळे सगळं वेळापत्रक बिघडलं..”

“काही लोकं फक्त पगार घेतात, काम वेळेवर करत नाही”

“तुम्ही माझ्यावर बोट दाखवत आहात, स्पष्ट बोला ना..”

सुरभी ज्या चॅनेल मध्ये काम करत होती त्याचा TRP तळाला तर होताच, वर भोंगळ कारभारामुळे सगळं विस्कळीत झालं होतं. सुरभिने चॅनेल साठी जी माणसं हवी होती ती त्यांना दिली पण पुढचं नियोजन त्यांना काही जमलं नाही. चॅनेल आता बंद पडायच्या मार्गावर होतं.

“सुरभी चल मंडपात जाऊ”

आईने फर्मान सोडलं तशी सुरभी भानावर आली. पुन्हा एकदा आरशात बघून ती आईमागे चालू लागली. ती लग्नात होती पण तिचं लक्ष मात्र चॅनेल च्या लाईव्ह शो कडे होतं. आज दुपारी 1 वाजता लाईव्ह auditions दाखवायच्या होत्या. Audition साठी कॅण्डीडेट्स गोळा करायचं काम सुरभिने केलं होतं आधीच, आता फक्त ही मुलं कशी परफॉर्मन्स देताय हे बघायचं होतं.

सुरभी लग्नमंडपात बसली होती, वरात अजूनही आली नव्हती, गावाकडे मिरवणूक करून टाळी लागेपर्यंत अडीच तीन वाजून जात. एक वाजला तसं सुरभिने मोबाईलमध्ये लाईव्ह शो लावला.   साधारण अर्धा तास झाला, शो सुरळीत सुरू होता इतक्यात वरातही आली, सर्वजण नवरा नवरीकडे बघू लागले, अक्षतांचा जोर वाढला..सुरभी कानातून हेडफोन काढणार तोच लाईव्ह मध्ये गडबड झाली..माईक अचानक बंद पडला..सर्वांची धावपळ सुरु झाली. Recorded एपिसोड मध्ये असं काही झालं की पुरेसा वेळ असतो, पण चॅनेल च्या भोंगळ कारभारामुळे टीमने काही बॅकअप सुदधा ठेवला नव्हता..सुरभी बैचेन झाली, तिलाही काही करता येईना..ऑफिसमध्ये गडबड सुरू..

“सुरभी अगं तिकडे बघ, मोबाईल मध्ये काय डोकं घालून बसलीये..”

आता आईला तरी कसं सांगणार काय झालं ते. समोर स्टेजवर मंगलाष्टके अंतिम टप्प्यावर आलेली, आता गळ्यात माळा टाकणार तोच इथेही माईक बंद पडला..सर्वजण चुळबूळ करू लागले, जरा अजून वेळ लागला असता तर बायका अपशकुन वगैरे बोलून मोकळ्या झाल्या असत्या.. या बिकट प्रसंगी एकच हाक मारण्यात आली..

“नाना…नाना कुठाय..”

कितीही बिकट प्रसंग असो, नानांकडे त्याचं सोल्युशन असणार म्हणजे असणार..माईक दुरुस्त होणार नाही समजताच नानांनी आपल्या फोनला स्पीकरची वायर लावली..गुरुजींच्या मोबाईलवर फोन केला आणि म्हणाले..

“गुरुजी पूर्ण करा अष्टक..”

गुरुजींनी मोबाईलवर अष्टक पूर्ण केलं, मोबाईल वर येत असलेला आवाज स्पीकरमध्ये वाजू लागला अन लग्न पार पडलं. नानांच्या या कृतीचं भारी कौतुक झालं, पण नाना हुरळून गेले नाहीत, कारण हा एकच प्रसंग नव्हता. असे कितीतरी प्रसंग नानांनी लीलया हाताळले होते.

गावातल्या एकेका व्यक्तीचं सुरभीला कमालीचं कौतुक वाटत होतं.

लग्न झालं अन पंगती बसल्या, सुरभी जेवत असताना काही माणसं वाढायला येत होती, जेवणाचा आग्रह करत होती. काहीजण डोक्यावर कुरडया फोडत होत्या. शहरा सारखं शांततेत असं जेवण नव्हतं, हसत खेळत गमती जमती करत सर्वजण जेवत होते.

जेवण झालं आणि सुरभीची आई तिला म्हणाली,

“चल, आता सर्वांना भेटून निघुया आपण..”

सुरभीची परत जायची काही ईच्छा नव्हती. पुन्हा ते ऑफिस, पुन्हा कटकट. अनिच्छेनेच ती गाडीत बसली. गाडीत इतरही काही गावाकडची मंडळी होती. त्यांच्या गप्पा सुरु होत्या. त्यातले काहीजण भजनी मंडळातील होते, त्यांनी भजन सुरू केलं..भजन थांबताच सुरभीला एक फोन आला..

“सुरभी..दुसरा जॉब बघायला लागणार आता..लाईव्ह पार बारगळून गेलं..आता चॅनेल बंद करायची मागणी होतेय..”

सुरभीला धक्काच बसला. तिला दुसरीकडे जॉब मिळणं कठीण होतं. ती नाराज झाली. डोळे बंद करून शांत बसून राहिली. पुन्हा एकदा भजन सुरू झालं..

अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥

नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥

विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥

तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥

का कोण जाणे पण हे ऐकताच सुरभीच्या मनात एक नवीन वीज संचारली गेली, गावात भेटलेली माणसं तिला आठवू लागली..नव्वदीतली ती आजी, नाचणारे ते युवक, व्यवस्थापन सांभाळणारे नाना आणि गाडीत भजन गाणारी मंडळी..ही लोकं जन्मजात हुशार आहेत, त्यांना कलेची निसर्गतःच देणगी मिळाली आहे, मग ही देणगी फक्त गावपुरतीच मर्यादित का असावी? या टॅलेंट चा प्रसार व्हायला हवा, ही लोकं खूप जास्त deserve करतात..

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

सुरभिने मनाशी काहीतरी पक्क केलं आणि तिने गाडी थांबवायला सांगितली..

क्रमशः

किंगमेकर (भाग 4)

2 thoughts on “किंगमेकर (भाग 3) ©संजना इंगळे”

Leave a Comment