किंगमेकर (भाग 1) ©संजना इंगळे

कुणालची आई पेढे द्यायला घरी आली होती, मोठ्या अभिमानाने कुणालच्या नव्या नोकरीच्या बढाया मारत होती..

“हे घ्या पेढे, एकच कशाला हे दोन घ्या..एक काम करा पूर्ण बॉक्सच ठेऊन घ्या..”

“अहो कशाला..तुम्हाला वाटायचे असतील ना अजून?”

“वाटू हो..आता काय, 20 लाखांचं पॅकेज मिळालंय कुणालला..आता कंजूसी करून चालणार नाही..”

“अय्या किती छान, कौतुक वाटतं हो कुणालचं.. आमच्या सुरभीलाही सांगत असते मी, की कुणाल तुझ्याच बरोबरचा.. किती पुढे निघून गेलाय अन तू अजूनही खटपटी करतेच आहेस..”

“त्यासाठी मुळातच हुशार असावं लागतं..आणि मुलींचं काय हो, शिकल्या नाही शिकल्या तरी शेवटी धुणी भांडीच करायला लागणार..”

जोशात कुणालच्या आईला आपण काय बोलत आहोत हे समजत नव्हतं, ओघाओघात सुरभीच्या आईला आपण दुखवतोय हे तिच्या लक्षातच आलं नाही..कुणालची आई निघून जाते, सुरभीच्या आईला त्यांचे शब्द कानात टोचू लागतात, एक तर मुलगी आहे म्हणून एक टोमणा अन दुसरीकडे अजून नीट नोकरी नाही म्हणून चिडचिड..

—–

(सुरभीच्या ऑफिसमध्ये)

“सुरभी, टॅलेंट मॅनेजर चा अर्थ समजतो का तुला? आमच्या चॅनेल ला उत्तमोत्तम टॅलेंट शोधून आणून द्यायचं काम तुमचं आहे..अगं टॅलेंट मॅनेजर म्हणजे किंगमेकर असतो किंगमेकर… एखाद्याला रातोरात स्टार बनवतो तो असतो किंगमेकर.. तो असतो टॅलेंट मॅनेजर..”

“सर मी खरंच चांगली मुलं आणून दिलीये ऑडिशन साठी..आपल्या चॅनेल वर रिऍलिटी शो मधले डान्सर्स, नवीन सिरियल्स साठी कलाकार, सिंगिंग शो साठी सिंगर्स.. खुप माणसं शोधून दिली आहेत मी सर..”

“खरंच? मग हा बघ, राघव…सूर निघत नाही त्याचा.. ही मेघना, डान्स चा D माहीत नाही हिला..सिरीयल साठी या रॉकी ला आणलं, तोंडावरची माशी हलत नाही याच्या..”

“एक मिनिट..ही सगळी मंडळी कोण आहेत? मी नाही आणलेलं यांना..”

एवढ्यात बॉस चा PA त्यांना मागून सांगतो,

“सर ही आमदार कदम आणि ऍक्टर कृन्वेष ची मुलं आहेत..”

बॉस वरमतो, पण मान्य करत नाही की सुरभी निर्दोष आहे, चोरावर मोर अजून म्हणतो कसा..

“तू चांगली माणसं आणत नाहीस म्हणून ओळखीतल्या लोकांना बोलावतो आम्ही..”

सुरभीच्या डोळ्यात आग असते, वशिला अन पैशाच्या जोरावर आलेली मुलं हमखास आपटतात आणि खापर मात्र सुरभीवर..

ती घरी गेली..गेल्या गेल्या आईनेही सुरू केलं..

“अगं कुणालला म्हणे 20 लाखांचं पॅकेज मिळालं आहे, म्हणजे महिन्याला दीड एक लाखाच्या आसपास..”

“अरेवा..छान..”

“त्या म्हणत होत्या, सुरभी काय करतेय.. किती पगार आहे तिला..”

“आई हे बघ, आधीच ऑफिसमध्ये माझं डोकं खराब झालंय, हो मी नाही केली प्रगती, नाही मला इतका पगार… जीव देऊ का आता?”

सुरभी या स्पर्धेच्या जगात भरडली जात होती, शिक्षणात फारसा रस नसल्याने कसाबसा मार्केटिंग चा एक कोर्स केला आणि टॅलेंट मॅनेजर म्हणून तिला इंटर्नशिप वर एका ठिकाणी घेतलं होतं, तिथलं राजकारण, घराणेशाही यामुळे अपयश येणाऱ्या तिथल्या सिस्टीम चं खापर मात्र सुरभीवर पडत होतं आणि दिवसेंदिवस ती चिडचिड करू लागलेली.

वैतागलेल्या सुरभीला पाहून आईला वाईट वाटलं, अपेक्षेच्या ओझ्याखाली सुरभीला दाबून तिचा आनंद आपण हिरावून घेतोय हे तिच्या लक्षात आलं..सगळं बाजूला ठेऊन आई म्हणाली.

“माफ कर मुली, हे बघ…कसलाच विचार करू नकोस..तू फक्त आनंदी रहा..या जगाची स्पर्धा कधीच संपणार नाही..या स्पर्धेत माणूस जगायचं विसरून जातो…तू भलेही चार पैसे कमी कमव पण आनंदी राहायला शिक. ”

आईच्या या शाब्दिक उबेने सुरभीला खूप आधार वाटला..ती आईच्या कुशीत शिरून रडू लागली..

“एक काम कर, माझ्यासोबत उद्या गावी चल..लग्न आहे माझ्या एका मावस भावाच्या मुलाचं..”

“नको गं आई, खेडेगावात ना कसल्या सुविधा ना कसली सोय..हाल होतात खूप तुला माहितीये ना..”

“म्हणूनच तर नेतेय तुला..त्या लोकांचं जगणं बघितलंस की मग समजेल, आपण किती नशीबवान आहोत ते..”

“पण आई..”

“पण बिन काही नाही..तुला यावच लागेल. तेवढाच जरा बदल..”

सुरभिलाही थोडा चेंज हवा होता सर्व व्यापातून.. ती तयार झाली.

(खेडेगावातील तळागाळातील लोकांमध्ये सुरभीला सापडेल का टॅलेंट? फिल्मी दुनियेत सुरू असलेलं राजकारण सुरभीला संपवेल की गावाकडील टॅलेंट तिला किंगमेकर बनवेल? सुरभीचा हा प्रवास कराल एन्जॉय? Stay tuned  किंगमेकर या कथामालिकेसोबत ❤️)

भाग 2

किंगमेकर (भाग 2) ©संजना इंगळे

2 thoughts on “किंगमेकर (भाग 1) ©संजना इंगळे”

Leave a Comment