का असावे स्वावलंबी??

 

“कशाला हे असले उपद्व्याप करत बसतेस… लोकं काय म्हणत असतील..नवरा मोठा मॅनेजर आणि बायको घरात शिवणकाम करते…”

रुचिता खूप दिवसांनी तिच्या मैत्रिणीला भेटते आणि तिला शिवणकाम करताना बघून हे वाक्य बोलून जाते.

“अगं अशी हलकी कामं कशाला करतेस? आणि खरं सांग तुला पैशाची गरज तरी आहे का?”

“अगं चित्रा, केवळ पैशांसाठी नाही करत मी…काम करून मला एक समाधान मिळतं… या पैशातून घरातला किराणा जरी सुटला तरी मनाला छान वाटतं… आणि स्वतःची हौस स्वतः भागवता येते, प्रत्येक वेळी नावऱ्याकडे हात पसरवावे लागत नाही..”

चित्रा ला मनातल्या मनात हसू आलं, तिला वाटलं ही खोटं बोलत असणार, हिचा नवरा हिला पैसे देत नसणार…

“ये मी तुला माझी शॉपिंग दाखवते..ही बघ साडी, हा नेकलेस… हे सोन्याचे कानातले..माझ्या शिवनकामाच्या पैशातून आलेले आहेत बर का…बरेच पैसे साठवले होते की..एक दिवस एकटी गेले आणि घेऊन आले…नवऱ्यालाही कौतुक वाटलं गं…”

चित्रा ने नकली स्माईल दिली…दोघींच्या गप्पा झाल्या आणि चित्रा घरी जायला निघाली…वाटेत विचार करू लागली…उगाच ही असली कामं करून अपमान करून घेते ही रुचिता..माझं बरं आहे बुआ, नवऱ्याला फक्त सांगायचं आणि वस्तू हातात आयती मिळणार…

एक दिवस चित्रा खरेदी ला निघाली..नावऱ्याकडे लाडाने पैसे मागितले..

“अहो, मला जरा 10000 रुपये द्या ना…खरेदी करून यावी म्हटलं..”

“10000? इतके कशाला लागताय??”

“अहो दिवाळी आली, कपडे, फराळाचा बाजार, दिवे, कंदील लागतील ना? पूर्ण 10000 नाही लागणार पण हाताशी असू द्यावे..”

“म्हणजे वायफळ खर्च करायला तू मोकळी..हो ना??”

चित्रा च्या नवऱ्याला भरघोस पगार, पण तोही आता मंदीच्या सावटाखाली आलेला..चंगळ करायची त्याला सवय, पण आता पगारात कपात झाली आणि तोही चिडचिड करू लागलेला..

“मी येतो सोबत चल…किती लागतील ते मी काढून देतो..”

“बरं चला…”

सर्वात आधी ते साडीच्या दुकानात जातात..

“अय्या सेम साडी रुचिता ने घेतली होती, फारच छान आहे, मीही हीच घेते..”

नवऱ्याने साडी वरचं लेबल पाहिलं आणि किंमत बघून तो म्हणाला.

“दुसरी बघ…”

“का? ही चांगली नाही का?”

“अगं किती महाग आहे..किमतीच्या मनाने शोभते तरी का?? आणि आत्ता तर साडी घेतली होती, परत कशाला? कपाट साड्यांनी खचाखच भरलंय, त्या वापर आधी…”

चित्रा चा हिरमोड झाला…तिला आठवलं, रुचिता ने स्वकमाई ने हीच साडी घेतलेली…

पुढे ते एका दिव्यांच्या स्टॉल वर थांबतात..त्या रंगेबेरंगी पणत्या बघून चित्रा त्या हातात घेते,

“या नको, त्या साध्याच घे…4 दिवस तर वापरायच्या असतात…”

पूढे तिला एका दुकानात राणी हार दिसतो,तिला आठवतं, तिची आई खूप दिवसांपासून सेम हार शोधत होती…

“अहो तो हार घ्यायचा आहे माझ्या आई ला”

“कशाला? तुझा भाऊ घेईल की ..”

“अहो असं काय करताय…आई पैसे देऊन टाकेल ना…”

“आणि नाही दिले तर?? जाऊदे पुढे जाऊ…”

चित्रा ने डोक्यातील पाणी लपवत वाट काढली…

चित्रा ला या दिवाळीत नवीन सोन्याचा दागिना करायचा होता, पण नवऱ्याचा एकंदरीत अवतार पाहून तिने मन मारलं… आधी अर्धवट आणि मन मारून वस्तू खरेदी करून ती परत आली…

बाजारात प्रत्येक ठिकाणी वस्तु घेतली की नवरा पाकिटातुन पैसे द्यायचा…आधी तिला कौतुक वाटायचं…पण आता वाटायला लागलं की इतके परावलंबी आहोत का आपण? कमवत नाही म्हणुन मनासारखं काहीही करू शकत नाही का??

घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की फोनचा बॅलन्स संपलाय..

“अहो एवढा रिचार्ज करून द्या ना…”

“नंतर करतो, आता जरा पडतो मी..”

“असं काय करता…मला फराळाची कृती वगैरे पहायची आहे नेट वर…बरं एक काम करा, तुमचं atm कार्ड द्या मला, मी करून घेईन…तुमचाच फोन वापरला असता पण तुमचा फोन फार स्लो चालतो..”

“नाही, माझं कार्ड मी देणार नाही…”

“का?”

“आईला हार घ्यायचं म्हणत होतीस..परस्पर पैसे काढून घेऊनही येशील काय भरोसा…”

आता मात्र चित्रा चा संयम सुटला..खोलीत जाऊन तीने रडून घेतलं…

आपण इतके दिवस मजेने आणि परावलंबी असण्यात खुश होतो…पण रुचिता चं म्हणणं आज तिला पटलं..रुचिता शिवणकामात का मग्न असायची याचं उत्तर तिला मिळालं…कुणापुढेही हात पसरवावे लागू नये, आपल्याला काही घेऊन दिलं म्हणून कोनामध्ये उपकाराची भावना असू नये आणि स्वतःचा खर्च स्वतः उचलणे यात खरा स्वावलंबीपणा आहे हे तिला कळून चुकलं…

Leave a Comment