काळी बाजू-3

 क्षणभर समजेना,

त्याचंच घर आहे की नाही,

रेखाने एवढ्याश्या खोलीतही नंदनवन फुलवलं होतं,

कमालीची स्वच्छता, पवित्रता आणि निर्मळता भासत होती,

सुनेने हसतमुखाने पाया पडल्या,

आईला बरं वाटलं,

आईला गोडधोड काहीतरी करावं म्हणून रेखा बाहेर दुकानातून रवा आणायला गेली,

आईने मुलाला विचारलं,

“ही बरी वागते ना? हिचा राग..”

मुलगा हसला,

“परिस्थिती बदलली की स्वभाव बदलतो, सुरवातीला दाखवला तिने तिचा राग..मीही समजून घेतलं, पण हळूहळू स्वभाव बदलत गेला तिचा..”

“लेकरा, मला फार काळजी होती रे तुझी, त्या मुलीचा स्वभाव असा आहे ऐकून तर रात्रीची झोप येईना मला..”

“आई, आपण प्रत्येकाची काळी बाजूच का पाहतो? प्रत्येकाची जशी काळी बाजू असते तशी एक सकारात्मक बाजूही असतेच की..आपण माणसं ती सकारात्मक बाजू पाहत नाही…तिचा राग सर्वांना दिसला पण तिची ती बाजू कुणीच बघत नाही..तिला पाहायला गेलेलो तेव्हा दारात सुंदरशी रांगोळी पाहिलेली का तू? आत गेल्यावर पापुद्रे पडलेल्या भिंतींवर तिने काढलेली छान छान चित्र दिसली का तुला? बाजूला शिवणकाम करून पडलेल्या चिंध्या, घरोघरी वाटण्यासाठी आणलेली कंपन्यांची पत्रकं..हे सगळं काय दर्शवत होते? ती एक कलाकार होती, होतकरू, कष्टाळू मुलगी होती… तिची ही बाजू कुणीही पाहिली नाही…आपल्या मनात काळी बाजू दुसऱ्या बाजूवर भारी पडते, पण जेव्हा दुसरी बाजू काळ्या बाजूवर मात करते तेव्हा त्या माणसाच्या अंतरंगात डोकावून आपण त्याच्यावर खरं प्रेम करतो..समोरच्याची काळी बाजू आपल्या प्रेमाने झाकोळून टाकता येत असेल तर तो खरा संसार..”

आपल्या कमी शिकलेल्या गरीब लेकराकडे असं एखाद्या तत्वज्ञानी माणसाप्रमाणे समजूतदारपणा कुठून आला याचं आईला कौतुक लागून राहिलं..

संध्याकाळची वेळ होती ती…

रेखा रवा घेऊन आली,

तेवढ्यात लाईट गेली..

अंधार पसरला,

रेखा चाचपडत होती..

लेकराने पटकन मेणबत्ती लावली, 

त्याने लावलेल्या प्रकाशात तिला दिशा सापडली, 

अंधारात चाचपडत असलेल्या तिचा मार्ग लेकराच्या प्रकाशाने उजळून निघाला..

समाप्त

13 thoughts on “काळी बाजू-3”

Leave a Comment