काजळी

 #काजळी

रेखा दबक्या पावलांनी जिना चढत होती. तिला भीती होती की बिल्डिंग मधलं कुणी समोर आलं ते काय बोलणार? कसं बोलणार? हळूहळू पावलं टाकत तिने तिचा मजला गाठला आणि सुस्कारा टाकला. घरात आली, घरातले सगळे बाहेर गेले होते. नवरा ऑफिसला, मुलं शाळेत आणि सासरे मंदिरात.

तिचं घर तेवढं तिला एक सुरक्षित वाटत होतं. बाहेर पडली की मनावर प्रचंड दडपण येई. एकच कारण, तिच्या बिल्डिंग मध्ये सर्व उच्चभ्रू वस्ती. बायका उंची कपडे वापरत, माणसं सूट टाय मध्ये फिरत. बायका बोलतानाही इंग्रजी वापरत आणि त्यांची मुलं एकाहून एक अशी बोल्ड.रेखा साधी स्त्री होती, अत्यंत साधी. शिकलेली होती पण आत्मविश्वास नावाचा प्रकारच माहीत नव्हता. मनात प्रचंड न्यूनगंड..त्यामुळे या बिल्डिंग मधल्या लोकांमध्ये मिसळून स्वतःचं हसं होईल की काय या भीतीने ती अजिबात कुणात मिसळत नव्हती. रेखा शास्त्रीय संगीतात पारंगत होती, पण तिचं गाणं तिने केवळ बाळाला अंगाई गाण्यापुरता आणि देवघरात भावगीतं म्हणण्यापुरता मर्यादित ठेवलं होतं. 

सासरे मंदिरातून परत आले. त्यांनी आज नवीन फर्मान काढलं, घरात 2 दिवसांनी एक पूजा ठेवली आणि बिल्डिंग मधल्या सर्वांना आमंत्रण देण्याचं काम रेखाला दिलं. रेखाला धस्स झालं, स्वतःहून बिल्डिंग मध्ये सर्वांच्या घरात जायचं? 

रेखाचा स्वभाव सासरेबुवांना चांगलाच माहीत होता. तिच्या चेहऱ्यावर बदललेले हावभाव त्यांनी चांगलेच ओळखले होते. त्यांनी आग्रह केला नाही. रेखा द्विधा मनस्थितीत सापडली, एक तर बाबांची आज्ञा मोडता येणार नव्हती आणि आमंत्रण द्यायला जाणंही कठीण वाटत होतं.

संध्याकाळी घरात अचानक लाईट गेली.

सासरेबुवा 2 जुने कंदील घेऊन आले, दोन्ही कंदील लावले. घरी कुणाला समजेना असं का करताय..टॉर्च, मोबाईल बॅटरी असताना यांनी जुने कंदील का आणले असतील? 

एक कंदील खूप प्रकाश देत होता, त्याची काच लख्ख केली होती. पण दुसऱ्या कंदीलाची काच मात्र पूर्ण काळपट झालेली, पूर्ण काजळी त्यावर चढली असताना त्यातून येणारा प्रकाश मंदावला होता. 

सासरेबुवांनी विचारलं, आता एकच कंदील चालू ठेवायचा आहे..कुठला ठेवायचा? 

सर्वांनी लख्ख प्रकाश देणारा कंदील सुरू ठेवा असं सांगितलं. बाबा म्हणाले, दुसराही कंदिलच आहे की, त्याचंही काम प्रकाश देणं आहे.. मग तो का नाही?

“बाबा त्यावर किती काजळी चढलीये बघा, आत कितीही प्रकाश असला तरी जोवर काजळी निघत नाही तोवर त्याचा प्रकाश बाहेर नाही पडणार..”

“मला हेच सांगायचं आहे…पोरी, इतकं सगळं करतेस घरासाठी पण आतून कायम घाबरलेली असतेस..कुणाला घाबरतेस? समाजाला? तू स्वतःला कमी का समजतेस? तुझ्यात खूप कौशल्य आहे, ती काजळी एकदा पुसून काढली तर बघ तुझं तेज कसं चहुबाजूंनी पसरेल..”

रेखाचे डोळे उघडले, खरंच आपण स्वतःला का कमी समजतो? आपल्यालाही जे येतं ते बाहेर काढायला हवं.

दुसऱ्या दिवसापासून पहाटे पहाटे ती रियाजाला लागली..गॅलरीत बसून सुंदर भावगीत गाऊ लागली..हा आवाज पहाटे पहाटे बिल्डिंग मध्ये घुमू लागला. इतकं सुंदर कोण गाणं म्हणतं हा सर्वांना प्रश्न पडला..आणि एक दिवस तिचा दरवाजा ठोठावला गेला.. बिल्डिंग मधले काही पालक त्यांच्या मुलांना गाणं शिकवण्यासाठी आग्रह करू लागले. रेखाला वेगळी ओळख मिळाली..सर्वजण तिला ओळखू लागले, घरातील वृध्द मंडळी सकाळी तिचा रियाज ऐकायला गॅलरीत येऊन बसत..सर्वांनाच याची आता सवय झाली. वेगवेगळे अभंग, भजनं याची फर्माईश होऊ लागली..रेखाने तिच्यावरची काजळी पुसली आणि तिचं तेज आता आसमंतात पसरू लागलं..

मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकात एक तेज असतं, पण जोवर आपण स्वतःवरची भीतीची काजळी पुसून टाकत नाही तोवर ते चहुबाजूला प्रकाश देणार नाही…

2 thoughts on “काजळी”

Leave a Comment