कपाट

  “तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला हिरव्या रंगाच्या ट्रॉलीज सांगितल्या होत्या, गुलाबी का दिल्यास?”

सुतार गप्पच..

तेवढ्यात मालकीणबाई सुतारासाठी ताट घेऊन आल्या, सुताराने हात धुतले अन ताट घेऊन तो बाजूला जेवायला बसला. सुधीरराव बायकोला बाजूला घेऊन गेले अन सगळा राग ओकू लागले. 

“बापूसाहेबांना काही काम नव्हतं का? कशाला हे असले कारागीर आणून दिलेत? एक तर म्हणे एकटाच काम करेन, जोडीला कुणी नको. म्हणजे एका कामाला महिना लावेल, वर याला जेवायलाही आयतं द्या, डबा नाही आणता येत का याला?”

“अहो हळू बोला..वय झालंय त्यांचं, कदाचित लक्षात राहिलं नसेल तुम्ही सांगितलेलं..”

“लक्षात वगैरे काही नाही, तू हे असले लाड पुरवते ना म्हणून तुझं ऐकतो तो फक्त..काल त्याच्यासमोर आपले वाद झाले होते, तू गुलाबी रंग म्हणत होतीस अन मी हिरवा, त्याला दटावून हिरवा रंग सांगितला, तरी त्याने गुलाबी रंगाच्या ट्रॉलीज केल्या..”

“जाऊद्या आता..”

सुधीरराव पहिल्यापासून आपलंच खरं करणारे, घराचं काम काढलं तेव्हा बायकोने बऱ्याच नवीन कल्पना दिलेल्या, पण सुधीरराव मुद्दाम ते न ऐकता त्यांच्या मनाचंच करत. मी सांगेन तीच पूर्व दिशा अश्या स्वभावाच्या सुधीररावांना सुताराच्या या गोष्टीमुळे प्रचंड संताप झालेला.

ट्रॉलीज चं काम झालं अन सुताराने आता नवीन कॉट बनवायला घेतला होता. 

“अहो मी काय म्हणते, आता नवीन प्रकारचे डिजाईन आलेत, कॉट मधेच बॉक्स असतात, वस्तू ठेवायला बरीच जागा मिळते..”

“कशाला हवीय जागा, एवढं मोठं घर पुरत नाही का? कॉट मध्ये जागा पाहिजे यांना..”

सुतार गपगुमान ऐकत होता. सुशीलाला वाईट वाटलं नाही, कारण यांचं हेच उत्तर तिला अपेक्षित होतं. 

कॉट चं काम झालं, सुधीररावांना एकदा तपासून घ्यायला बोलावलं, भक्कमता आणि रेखीवपणा बघून सुधीरराव समाधानी झाले, पण दुसऱ्याच क्षणी त्यांचा पारा चढला..

“तुला अक्कल नाही का रे? बॉक्स बनवायला नाही म्हटलेलं ना मी? हा कॉट आहे की टेबल? कॉट ला असे ड्रॉवर बरे दिसतात का??”

मालकीणबाईंनाही प्रश्न पडला, इतकं सांगूनही हा सुतार असं का करतोय? 

“आता पुढचं कुठलंच काम करायचं नाहीस, झालेल्याचे पैसे देतो तेवढे घे अन चालता हो..”

सुताराने टीपं गाळली तसे सुधीरराव जरा शांत झाले, वडिलांच्या वयाच्या असलेल्या माणसाशी असं बोलणं त्यांनाही पटलं नव्हतं पण रागापुढे ते काय बोलत त्यांनाच समजत नसे.

सुताराने आज मात्र तोंड उघडलं. त्याने डोळे पुसले, हात जोडून तो सुधीररावांना सांगू लागला..

“साहेब, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी डबा का नाही आणत? डबा द्यायला घरात बायको कुठाय मला, सकाळी चहा बिस्किटवर भागवतो, मालकीणबाई जेवण देतात तेवढंच घरच्यासारखं जेवायला भेटतं. संध्याकाळी घरी जाऊन काही बनवायला अंगात त्राण नसतो, मग कुणी शेजाऱ्याने दया दाखवली तर घेतो जेऊन, नाहीतर रोजच आपला कोरडा भात असतो..”

“म्हणजे? तुझी बायको कुठे गेली??”

“6 वर्षांपूर्वी गेली ती देवाघरी. मीही असाच होतो, अगदी तुमच्यासारखा, माझंच खरं करणारा..ती दुखणी अंगावर काढायची, मला दवाखान्यात न्या म्हणायची, पण मी मात्र काही होत नाही, कामं केली की सगळी दुखणी पळतात असं म्हणत मेडिकल मधून काही गोळ्या आणून द्यायचो. ती म्हणायची, अहो कधीतरी माझं ऐकत जा, लोकांसाठी करतात तसं आपल्या घरासाठी एखादं कपाट बनवून द्या. मी म्हणायचो की ही सगळी श्रीमंतांची थेरं. दोर आहे कपडे अडकवायला तोच वापर. एके दिवशी ती रात्री झोपली ती झोपलीच, सकाळी डब्यासाठी तिला उठवायला गेलो..पण तिने कायमचा माझा डबा बंद केला होता..ती गेली अन आयुष्यातल्या पोकळीचा अनुभव आला, घर खायला उठायचं, तिच्या आठवणीत तिच्यासाठी एक राजेशाही कपाट बनवलं मी, पण ते बघायला ती नव्हती. एक दिवस डॉक्टरला घरी घेऊन आलेलो, माझ्या बायकोला तपासा म्हणून, डॉक्टर रिकामं घर बघून गोंधळला, मलाच वेड लागलं होतं, त्याने मलाच औषधं देऊन आराम करायला लावला. साहेब, तिचं ऐकलं असतं तर तिला दवाखान्यात नेलं असतं, ती जगली असती..ती गेली ते तिच्या सगळ्या अपेक्षा अर्धवट टाकूनच..मीच कारणीभूत होतो त्याला. मी इथे कामाला आलो अन तुमच्यात मला मी दिसलो… असाच होतो, कुणाचंही ऐकून न घेणारा..मालकीण बाईंच्या आवडीचं तुम्ही काहीही करू देत नव्हता, पण माझ्या मनाने मात्र पूर्वानुभवाने ते मला करू दिलं नाही. माफ करा मला, मी जातो..”

तो सांगत असताना सुधीरराव केव्हाच गळून पडले होते, त्याची दुखभरी कहाणी ऐकून त्यांना स्वतःवरच राग येऊ लागला. स्वतःला सावरत ते म्हणाले,

“कुठे चाललास, कपाट बनवायचं बाकिये अजून..आणि हो, कपाट मालकीनबाई जसं सांगतील तसंच व्हायला हवं..”

5 thoughts on “कपाट”

  1. खुप छान. म्हणून माणसांच्या जिवंतपणी त्यांचे मन जपा. मेल्यावर त्यांच्या आवडीच्या गोष्टी करून, फोटोला जेवण दाखवून काही उपयोग नाही.

    Reply
  2. वाह वाह अप्रतिम. मला तुमची ही कथा खूप आवडली माझ्या यूट्यूब चैनल अनाहिता' वर त वाचायची इच्छा आहे तुमच्या नावानिशी परवानगी असल्यास जरूर कळवावे

    Reply

Leave a Comment