ऑफिसर (भाग 3)


भाग 1
https://www.irablogging.in/2020/08/1_20.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/08/2.html

सुशीला प्रेरणाला स्पर्धा परीक्षा देण्याबद्दल प्रोत्साहन देत होती, तोच तिला तिच्या मिस्टरांचा, म्हणजेच रोशन चा फोन आला…

“आज घरी आमच्या ऑफिस मधली काही मंडळी येणार आहेत घरी जेवायला…छान बेत बनव..”

“अगं बाई हो का, मी लगेच तयारीला लागते, प्रेरणाही आहे सोबत..”

“आले का ते, बरं झालं..त्यांनाही कंपनी मिळेल अजून..”

असं म्हणत सुशीलाने फोन ठेवला…

“काय गं कोण येणारे??”

“यांच्या ऑफिस मधली माणसं येणारेत, छान बेत करावा लागेल आज..”

“मी आहे की सोबत, काळजी करू नकोस…वीर पण झोपेलच आता..”

“इतक्या लवकर कुठे, अजून वेळ आहे..”

“अगं तयारी तर करून ठेऊ..”

प्रेरणा वीरला झोपवते…त्याच खोलीत सुशीला लसूण वगैरे सोलायला आणते…

“प्रेरणा तुला झोपायचं तर झोप हा…”

“नाही ताई, दुपारच्या झोपेची सवय नाही मला..आपण गप्पा मारू…आणि आदित्यही वरच्या खोलीत झोपला आहे…जीजू आले की मग कंपनी मिळेल त्याला..”

लसूण सोलता सोलता दोघी बहिणी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागल्या…

“तुला माहितीये ती जान्हवी राहायची बघ आपल्या चाळीसमोर..”

“हा…खूप हुशार होती तीच ना? बोर्डात आलेली..”

“हो तीच..अगं तिचं लग्न झालं अन फारकतही झाली..”

“काय?? का?”

“लग्नानंतर तिला नोकरी करायची होती, पण घरच्यांनी काहीच करू दिलं नाही, घराबाहेर सुद्धा जायला तिला परवानगी नव्हती..”

“काय उपयोग गं मग इतकं हुशार असून…आपलं एक बरं, आपण काही शिक्षण नोकरीच्या फंद्यात पडलो नाही…नाहीतर होतीच आपलीही तारांबळ..”

“अगं पुढे तर ऐक…. तिने फारकत घेऊन स्वतःची फर्म काढली, आणि ती इतकी पूढे नेली की लाखोंमध्ये उलाढाल करते ती…स्वतःचं घर घेतलं, गाडी घेतली….कुणापुढेही हात पसरवावे लागले नाही तिला..”

प्रेरणा विचारात पडली…ताईला म्हणाली…

“आपल्यावर अशी वेळ येणार तर नाहीच…पण…तरीही समजा….”

“मीही तेच म्हणतेय, माझं काय गं, मी 2 वर्ष शाळेत नोकरी केली होती, त्या अनुभवावर मला अजूनही मिळेल नोकरी…पण यांची सारखी बदली होत असल्याने मी कुठे प्रयत्न करत नाही..पण तुझी काळजी वाटते..”

“अगं ताई अजिबात काळजी करू नकोस, आदित्य खूप चांगला आहे..”

“प्रेरणा वेळ कधीच सांगून येत नसते…आणि कितीही म्हटलं तरी तू पूर्ण तुझ्या नवऱ्यावर अवलंबून आहेस, एक त्याला आयुष्यातून बाजूला काढून बघ, काय शिल्लक राहतं?? तुझं अस्तित्व काय उरतं??”

प्रेरणा विचारात पडते… गप्पा मारत मारत संध्याकाळचे साडेपाच वाजतात, वीर उठतो…प्रेरणा त्याची तयारी करून त्याला किचन मध्ये सोबत नेते…सुशीला खाली सतरंजी टाकून त्या दोघांना बसवते….प्रेरणा वीर सोबत बसलेली तोवर सुशीलाने 2 भाज्या टाकल्या…

“ताई तू बस आता, बाकी वरण भात आणि कोशिंबीर मी करते..”

सुशीला वीर जवळ बसली…तोच दाराची बेल वाजते, नेत्रा शाळेची ट्रिप करून आलेली असते….

“विरु, माझ्या गोंडू… कधी आलास??” आल्या आल्या ती वीर जवळ गेली आणि त्याचे पटापट मुके घेतले…नंतर मावशी जवळ जाऊन तिला मिठी मारली..

“मग..कशी झाली ट्रिप??” प्रेरणा ने विचारलं…”

“एकदम छान, पण रस्त्यात ना पोलिसांनी आम्हाला अडवलं, आमच्या बसवाल्या काकांकडे काही कागदपत्रे नव्हती…”

“अगं बाई, मग काय केलं??”

“मग मी आमच्या टीचर चा फोन घेऊन पप्पांना फोन लावला…आणि त्या पोलिसांकडे दिला.. त्यांनी लगेच आम्हाला सोडलं..”

सुशीला ला हसू आलं.

“सोडलं म्हणजे? असे काय म्हणाले तुझे पप्पा??”

“अगं नुसतं नाव ऐकलं तरी काम होतं, सरकारी अधिकारी म्हणजे वजन असतं सगळीकडे…एका फोनवर सगळी कामं होत असतात यांची..”

प्रेरणाला भारी कौतुक वाटलं…

सगळा स्वयंपाक तयार होतो… संध्याकाळी रोशन घरी येतात ते रुबाबतच….आदित्य एव्हाना हॉल मध्ये बसून tv बघत असतो…रोशन येताच ते आदित्य ला हँडशेक करतात..

“काय मग IT इंजिनिअर… कसं चाललंय सगळं..”

“चाललंय देवाच्या कृपेने सगळं..”

“बरं तुम्ही बसा, मी आलोच फ्रेश होऊन…”

“हो हो, सावकाश या..”

रोशन फ्रेश होऊन आधी किचन मध्ये येतो…

“काय म्हणतेस प्रेरणा, कशी आहेस, खूप दिवसांनी आलीस..”

“मी मजेत जीजू, तुम्ही कसे आहात..”

“मीपण मजेत…बरं सुशीला..झाली का तयारी, एखाद्या तासात येतील पाहुणे..”

“हो सगळी तयारी झालीये..तुम्ही निश्चिन्त रहा..”

रोशन तेवढं बोलून आदित्यशी गप्पा मारायला हॉल मध्ये निघून जातो..काही वेळाने पाहुणे येतात..साधारण 6 व्यक्ती असतात,त्यात 4 माणसं आणि 2 चाळिशीतल्या स्त्रिया असतात… सर्वांच्या गप्पा होतात…त्या दोन्ही स्त्रिया हॉल मध्येच माणसांशी गप्पा मारत असतात, कारण त्यांना अनेक चर्चांमध्ये सहभागी होता येत होतं… राजकीय, सामाजिक प्रश्नांवर त्या सखोल बोलत होत्या…

“त्या बायकांनी आत यायचं ना आपल्यासोबत… बाहेरच बसल्या..” प्रेरणा म्हणाली…

“अगं त्या शिकलेल्या आणि चांगल्या पदावर नोकरीला आहेत…त्या काय करतील इकडे येऊन? उलट आपलीच फजिती..”

“का? आपली का फजिती?”

“आपलं ज्ञान असं तोकडं…आपण काय बोलणार त्यांच्याशी..”

मग एका मोठ्या डायनिंग टेबल वर सगळी तयारी केली जाते…

“ताई, माणसांना म्हणावं बसा तुम्ही, आम्ही वाढतो…त्यांचं झालं की मग आपण सगळ्या बायका बसू..”

“अगं वेडे, त्या मॅडम पण त्यांच्यासोबतच बसतील…हा काही नातेवाईकांचा कार्यक्रम नाही बायका नंतर बसायला..”

प्रेरणाच्या डोक्यात एकच तिडीक गेली…केवळ शिक्षणामुळे आणि पदामुळे इतका मोठा फरक??

क्रमशः

6 thoughts on “ऑफिसर (भाग 3)”

Leave a Comment