ऑफिसर (भाग 1)

बाहेर पावसाने थैमान घातलं होतं… अगदी गॅलरीमध्येही पाणी येऊ लागल्याने प्रेरणाने लगबगीने वाळत घातलेले कपडे आत घेतले…तोच तिचं बाळ उठलं… हातातले कपडे खुर्चीवर ठेऊन ती बाळाकडे धावली…बाळासाठी पेज आधीच तयार होती, तिने त्याला हॉल मध्ये आणलं आणि पेज भरवायला सुरवात केली. एवढ्यात ताईचा फोन आला..

“हॅलो ताई…कशी आहेस..”

“मी मजेत गं… तू बोल..”

“काही नाही, वीर ला भरवतेय..”

“बसायला लागला का गं तो??”

“हो मागच्या आठवड्यातच…आधी तोल जायचा पण आता छानपैकी बसतो..तू बोल, जीजू कसे आहेत..”

“तुला तर महितीये ना, यांचं सरकारी काम..एक तर मोठा हुद्दा त्यात जबाबदारीची कामं… उसंत मिळतच नाही..”

“काही का असेना…आपल्या माहेरी आजही चर्चा होते, की सुशीला ला इतकं चांगलं स्थळ मिळालं म्हणून, नाहीतर आपल्यासारख्या छोट्या गावातल्या मुलींसाठी अशी स्थळ कधी येत नसतात..”

“हं…तुझंही चांगलंच झालं की, सॉफ्टवेअर इंजिनिअर मिळाला तुला…काहीही म्हण, पण सरकारी अधिकाऱ्यापेक्षा जिजूंना जास्त पगार आहे बरं का..”

“पगार काय करते, माणसं चांगली हवी…नशिबाने आपल्या दोघांना मनानेही चांगला असा नवरा मिळाला..”

“बरं तू कधी येतेय माझ्याकडे??”

“अगं हो, सांगायचंच राहिलं, पुढच्या आठवड्यात तुझ्या शहरात यांच्या एका नातेवाईकांचं लग्न आहे…तेव्हा येऊ की..”

“काय सांगतेस, खरंच ये गं, मी कंटाळून जाते घरी अगदी…आणि वीर सोबतही चांगला वेळ जाईल माझा..”

बराच वेळ गप्पा मारून प्रेरणा फोन ठेवते, बोलता बोलता वीर ने पेज कधी संपवली कळलंच नाही. त्याने ढेकर दिली अन तो खुदकन हसला…त्याचं ते हसणं बघून प्रेरणा सगळं विसरून जाई, तिने त्याचे पटापट मुके घेतले..वीर खेळण्यात मग्न झाला आणि प्रेरणा मोबाईल वर बोटं फिरवू लागली…

फेसबुक फीड मध्ये तिला तिच्या मैत्रिणींचे फोटो दिसत होते, काहींची नुकतीच लग्न झालेली..काहींनी आपल्या मुलांसोबत फोटो टाकलेले…मनात विचारचक्र चालूच होतं..

“आपण खरंच नशीबवान आहोत…लग्नानंतर आयुष्यच बदलून गेलं माझं..लग्नाआधी चाळीत राहायचे…कमी जागेत काटकसर करून आयुष्य घालवलं…परिस्थिती बघता करियर वगैरे चा विचार करण्याआधीच घरच्यांनी स्थळ पाहायला सुरवात केली…नशिब चांगलं म्हणून आदित्य सारखा नवरा मिळाला…माझ्यात काय पाहिलं त्याने काय माहीत…एवढ्याश्या चाळीत राहणारी मी, एकदम या मोठ्या बंगल्यात आले, चारचाकी, घरात कामाला मदतनीस, भारीतले कपडे….सगळं सुख पायाशी लोळण घेऊ लागलं… अजून काय हवं ??”

वीर रांगत रांगत दुसऱ्या खोलीत जाऊ लागला, प्रेरणा त्याला उचलून आणणार तोच कमळीने त्याला उचलून प्रेरणा कडे आणून दिलं…

“माझ्या दादूल्या, रांगायला लागलास व्हय..बरं ताई, भांडी आणि कपडे झालेत, आता पुढचे 2 घर करून आली की झाडू फरशीला येते..”

कमळी कित्येक वर्षांपासून त्याच घरी कामाला होती, तिचा नवरा तिला कधीच टाकून सोडून गेला होता…तरी बरं तिला मुलबाळ नव्हतं, नाहीतर वाईट दिवस काढले असते तिने…काहीही म्हणा, पण कमळी मोठ्या उत्साहाने सगळी कामं करे…संध्याकाळी भाजीपाला विकायला बसे, कधी लोडगाडीवर नाना वस्तू विकायला गल्लीबोळात फिरे…तिचं पोट भरेल एवढं कमवत होती ती आणि त्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसायचं…का कुणास ठाऊक पण प्रेरणा ला तिचं आज जास्तच कौतुक वाटलं….ती निघून गेली…काही वेळाने तिच्या लक्षात आलं, की काल टीव्ही चालू असताना एक गुलाबी साडी घेतलेल्या महिलेकडे ती टक लावून पाहत होती, कालच तिचा पगार झालेला आणि आज अगदी तशी नाही, पण बऱ्यापैकी मिळतीजुळती साडी घालून ती आलेली…स्वतःचं छोटसं स्वप्न मनात बाळगून तिने तात्काळ पूर्णही केलं..

आदित्य घरी यायची वेळ झाली, प्रेरणा छान तयारी करून बसली आणि वीरलाही छान तयार केलं…
आदित्य घरी आला, प्रेरणा ने दार उघडलं…आदित्य ने छानशी स्माईल दिली अन वीर ला कडेवर घेतलं…

“अरे माझ्या विरुल्या…ममा ने त्रास दिला?? कुणी त्रास दिला माझ्या बाबूला??”

“मला विचारा की, कुणी कुणाला त्रास दिला..”

“बरं ते जाऊदे, तू घरात बसून बोर झाली असशील, जाऊया का आज बाहेर फिरायला??”

“आज नको, उद्या जाऊ…कमळी येईल आता…”

“As you wish my queen..”

प्रेरणा लाजली, आदित्य आत गेला अन इतक्यात कमळी आली…येताच झाडू हातात घेऊन झाडायला सुरवात केली…आदित्य बाहेर आला आणि त्याच्या पायात झाडू आला..

“ओ कमळी ताई…पाडायचा विचार आहे का..”

“मी कशाला पाडू…पडला तर मलाच काम पडेल जास्तीचं…चार फरश्या फुटतील…”

आदित्य आणि कमळी समोरासमोर आले की एकमेकांची चेष्टा करणं सोडत नसत…आदित्य ला तिने आपलं भाऊ मानलं होतं.. तिच्या कठीण काळात भावाप्रमाणे तिच्या पाठीशी उभं राहून तिला मदत केली होती…

“बरं ताई, शेजारच्या जोशी मावशींनी तुम्हाला बोलावलं आहे..त्या कालच गावावरून आल्या, काहीतरी वानोळा द्यायचाय म्हणे..”

“बरं मी जाऊन येते..”

“थांबा… माझं काम झालं अन मी गेली की मग जा..”

कमळी तशी स्वाभिमानी होती, तिच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक पण तिच्या या बोलण्याने प्रेरणाला हसू आलं…

कमळी गेली आणि प्रेरणा वीर ला घेऊन जोशी मावशींकडे गेली, त्यांची मोठी मुलगी कसल्यातरी प्रश्नपत्रिका घेऊन बसलेली, प्रेरणा ने सहज हातात घेऊन पाहिलं…त्यात काही प्रश्न होते आणि खाली चार पर्याय…

तिने पहिला प्रश्न पाहिला ..

“एव्हरेस्ट शिखर करणारी पहिली महिला कोण?”

“बाचेंद्रिपाल..” तिने पर्याय न बघता उत्तर दिलं..

“अमिताभ बच्चन चा पहिला चित्रपट कोणता??”

“सात हिंदुस्थानी..”

नंतर बऱ्याच ऐतिहासिक आणि भौगोलिक प्रश्नांची तिने बरोबर उत्तरं दिली होती…त्या मुलीला विशेष वाटलं..

“ताई तुला तर बरंच काही येतंय… तू स्पर्धा परीक्षा का नाही देत??”

“आता कुठे गं..आणि चाळीत असताना मी पहिली ते दहावी चे क्लासेस घ्यायची घरगुती, त्यामुळे ते सगळे विषय चांगले येतात मला, बरेच प्रश्न त्यातलेच आहे..”

“अगं अजून काही वयही नाही तुझं..विचार कर..”

इतक्यात जोशी काकूंनी तिच्या हातात पिशवी दिली, काही गप्पा झाल्या आणि तिथून ती परत गेली..

“श्रेया काहीही सांगते, स्पर्धा परीक्षा आणि मी?? काय गरज आहे मला तसं पाहिलं तर..”

क्रमशः

भाग 2
https://www.irablogging.in/2020/08/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/08/3.html

भाग 4
https://www.irablogging.in/2020/09/4.html

भाग 5

https://www.irablogging.in/2021/04/5_24.html

भाग 6

https://www.irablogging.in/2021/04/6_25.html

भाग 7

https://www.irablogging.in/2021/04/7_26.html

भाग 8

https://www.irablogging.in/2021/04/8_28.html?m=1

भाग 9

https://www.irablogging.in/2021/04/9_30.html

भाग 10
भाग 11
भाग 12 अंतिम

Leave a Comment