सोसायटीच्या आवारात काहीतरी गोंधळ ऐकू आला तसं आम्ही त्या दिशेने गेलो. तिथे एक तरुण मुलगा आणि मुलगी उभे राहून बोलत होते, मुलीने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, एकंदरीत हे प्रेमप्रकरण आहे लक्षात येताच सोसायटीतील काही मंडळी त्यांना तिथून हकलत होती, त्यांना दम देत होती. घाबरून त्या दोघांनी तिथून पळ काढला.
आम्ही सोसायटीत नवीन असल्याने फारशी कुणाशी ओळख नव्हती, पण जाता येता एका वृध्द जोडप्याचं सतत दर्शन होत असे. हा सगळा गोंधळ बघून परतत असतांना त्या वृद्ध जोडप्यातील आजी नुकतीच बागेतून फुलं घेऊन घरी चालली होती, वयोपरत्वे त्यांची चाल मंदावली होती पण चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. तेवढ्यात आजोबा तिथे आले..
“मी आणणार होतो ना फुलं, तू कशाला जात बसलीस..”
“असुदे रे…तू पेपर वाचत होतास, म्हटलं आपणच जावं..”
“हा, म्हणजे चक्कर बिक्कर आली तर आहेच मी धावपळ करायला..”
आजी आजोबांना अरे तुरे करताना बघून मला जाम नवल वाटलं, आजही सुशिक्षित जोडपं..” सर्वांसमोर तरी अहो म्हणत जायचं..” असं दम देऊन सांगत असतांना मागच्या पिढीतील हे जोडपं किती सहजतेने बोलत होते. आजोबांच्या मनात काय आलं कोण जाणे,पण मला बघताच म्हणाले..
“तू तिसऱ्या मजल्यावरचा ना?”
“हो आजोबा..”
“बघत असतो मी तुला नेहमी, चल आज माझ्या हातचा चहा पाजतो..”
“नको आजोबा कशाला उगाच.”
“चल रे…”
आजोबा माझ्या खांद्यावर हात ठेवत मला घेऊनच गेले. घरात जाताच अगरबत्ती चा एक मंद सुगंध दरवळत होता. विलक्षण समाधानाची शांतता भासत होती. घरात मोजक्याच पण नीटनेटक्या ठेवलेल्या वस्तु. आजोबांनी चहा करून आणला, आजीला आणि मला देऊन तेही चहा घेत खुर्चीत बसले.
मला राहवलं नाही, मी म्हणलोच..
“आजी आजोबा, तुमची जोडी खरंच छान आहे हा..”
“हो मग..एकदम जगावेगळं जोडपं आहे आमचं..”
“कधी लग्न झालं तुमचं?”
“माझं…1975 साली..”
मी 1975 आकडा मनात घोळवत चहा घेऊ लागलो,
“आणि हिचं 1971 साली..”
हे ऐकताच मला ठसका लागला, आजोबा काय बोलले समजायचा प्रयत्न करू लागलो..मी आजोबांकडे पाहिलं आणि हसू लागलो..
“अरे मजाक नाही, खरंच..”
मी जाम गोंधळलो, दोघांची लग्न वेगवेगळ्या साली कशी? उतारवयात माणसाला विसरायला होतं आणि तो काहीही बरळतो ..म्हणून कदाचित आजोबा असं बोलत असतील असंही एकदा वाटून गेलं…
“बरं..पण आजोबा तुम्ही फार मिश्किल आहात बरं का..आजी कसं सांभाळतात तुम्हाला देव जाणे..”
या वाक्यावर आजोबा खळखळून हसले. आणि पुढे सांगायला लागले..
“अरे ती मला नाही, मीच तिला संभाळतोय, दिसते तशी नाही बरं का..फार जिद्दी आहे, उगाच नाही हिच्या नवऱ्याने हिच्यापासून लवकर सुटका करून घेतली..”
आता माझा जीव द्यायचाच बाकी होता. एकामागून एक धक्के बसत होते.
“माझं कशाला सांगता, तुमचं सांगा ना..तुम्हाला कंटाळून तुमची बायको अवघ्या 4 वर्षात वर गेली…”
मला आता गरगरल्या सारखं झालं, हे प्रकरण मला काही झेपेना. मी चहा तसाच ठेवला अन काहीही न बोलता निघायला लागलो. तोच आजोबांनी परत बसवून घेतलं,
“बाळा तुझा गोंधळ उडालाय समजलं आम्हाला..”
हुश्श..म्हणजे आजोबांना निदान एवढं तरी समजलं म्हणून जरा बरं वाटलं आणि आपण शहाण्या माणसात बसलोय याची खात्री झाली.
“काय आजोबा तुम्ही पण, मजाक करत होतात ना?”
“बाळा मजाक नाहीये, सत्य आहे. आधी तो चहा सम्पव मग सविस्तर सांगतो..”
मला कुतूहल जागृत झालं, ऐकायच्या हेतूने पटापट चहा संपवला. चहा सम्पला तसे बाबा बोलू लागले..
“ही मृदुला, दोन्ही मुलांची लग्न झाली आणि हिच्या नवऱ्याने लगेच जग सोडलं. एकटी पडली होती ही, मुलांना हिची अडचण वाटू लागलेली..रोज मंदीरात येत असायची, एका कोपऱ्यात बसून रडायची…मीही जायचो तिथे..मी तर कित्येक वर्षे असाच जगत होतो, एकटा…माझी बायको तर पदरात 2 वर्षाचं पोर टाकून सोडून गेली मला, त्या मुलीला वाढवलं, लग्न करून दिलं तिचं आता अमेरिकेला असते..तिच्यासाठी लग्न केलं नव्हतं मी..पण तिचं लग्न झालं आणि मी एकटा पडलो. मंदीरात आम्ही एकमेकांना भेटू लागलो, एकमेकांशी सुख दुःखं वाटून घेऊ लागलो, एके दिवशी हिच्या मुलांनी आम्हाला दोघांना एकत्र पाहिलं आणि खूप तमाशा केला, हिच्यावर नको नको ते आरोप लावले.. माझ्या मुली पर्यंत खबर गेली, तिला बापाची लाज वाटू लागली..आमच्याच लोकांनी आम्हाला बदनाम केलं, आमच्या मैत्रीच्या नात्याला लांच्छन लावलं..मग आम्ही ठरवलं की एकत्र राहायचं, हिच्याकडे पोस्टाचे आणि माझ्याकडे माझ्या रिटायरमेंट चे भरपूर पैसे होते, मग त्यांच्यापासून खूप दूर इथे आम्ही फ्लॅट घेतला…आज मुलांपासून दूर पण प्रतिष्ठित आयुष्य जगतोय..मुलांचा विचार करत बसलो असतो तर मनाला मारून, खोट्या प्रतिष्ठेसाठी अपमान सहन करत बसलो असतो..”
हे सगळं ऐकून डोळ्यात खरोखर पाणी आलं..या दोघांनीही एकमेकांशी लग्न केलं नव्हतं, तरीही एकत्र राहत होते, एकमेकांना आधार द्यायला, उतारवयात मन मारून न जगता स्वाभिमानाने जगत होती.. काही वेळापूर्वी सोसायटीतुन लोकांनी हटकलेलं जोडपं आठवलं, पण विवाहसंस्था, लग्नसंस्था, लिव्ह इन या सर्वांच्या चौकटीबाहेरही एक नातं फुलू शकतं हे आज नव्याने कळलं.
अप्रतिम