एक ट्रिप-मोबाईल विना

 फिरायला जाऊयात म्हणून बायकोने सतत तगादा लावलेला, नवऱ्याने होकार देताच ती खुश झाली. 

आपल्या बेडरूममध्ये गेली, छानपैकी कपडे अंगावर चढवले, तासभर मेकप केला, चांगली दिसतेय याची खात्री झाल्यावर बाहेर आली, 

“अहो आवरलं नाही अजून? आवरा पटकन..”

नवऱ्याने तिच्यासमोरच दोरीवरची वाळत घातलेली जीन्स आणि शर्ट काढला आणि जागीच बदलला, खिशातून छोटा कंगवा काढत केस विंचरले आणि म्हणाला, 

“चल निघुया”

“ती बघतच राहिली..”

अचानक त्याचे पाय थबकले, 

“आपण फिरायला जाऊयात पण एका अटीवर”

नवऱ्याने पहिल्यांदाच असं बाहेर फिरण्यासाठी अट घातली,

“कोणती अट?”

“दोघांचा मोबाईल घरी ठेऊन जायचा”

“का? कशासाठी? अहो मग फोटो कसे काढणार?”

“आज आपण फक्त निसर्गसौंदर्य बघायला जाऊयात, फोटो नकोत आणि स्टोऱ्या टाकत चार लोकांना दाखवणं नको. आपण दुर्गम भागात जात नाही आहोत, त्यामुळे सुरक्षित असू, सोबतच असू..अगदीच गरज लागली तर आजूबाजूला माणसं असतील, मदत मागू शकतो,आजवर अशी वेळ आलेली नाही म्हणा..”

“अहो पण..”

“मान्य असेल तरच जाऊ”

“बरं म्हणत ती निघाली, पर्स मध्ये गपचूप काहीतरी ठेवलं ..पण त्याच्या लक्षात आलं..”

“मॅडम, कॅमेरा पण नाही न्यायचा”

तिने नाक मुरडत कॅमेरा परत जागेवर ठेवला आणि दोघेही निघाले.

शहरापासून जरा दूर एका निसर्गरम्य ठिकाणच्या मंदिरात ते गेले. मंदिरात तुरळक गर्दी होती. शांत, पवित्र वातावरण होतं. बायकोचा हात सतत पर्स कडे जायचा, पण मोबाईल घरी ठेवलाय आठवताच ती हात मागे घ्यायची. 

दोघेही गाभाऱ्यात गेले,मूर्तीसमोर हात जोडून उभे राहिले. मूर्तीकडे एकटक बघत एकरूप होत गेले. मूर्तीचं सौंदर्य मनापासून टिपलं.

“अहो भगवान रामचंद्रांची ही मूर्ती, किती सुंदर आहे ना? आणि त्यांचा पोशाख, अलंकार…पुराणात वर्णन केलं तसेच आहेत”

नवरा हसला,

“या आधी कितीतरी वेळा आलो आपण, पण हे तू आज पहिल्यांदा न्याहाळलंस”

दोघेही बाहेर आले, मंदिराशेजारी नदी होती. दोघेही पाय बुडवून बसले. नदीचा शांतपणा, पवित्रता खुप वेळ डोळ्यात साठवलं. 

“ही भीमा नदी ना?”

“हो..”

“याची एक कथा आहे…सांगू?”

नवऱ्याने नदी बद्दलची आख्यायिका ऐकवली, बायको मनापासून ऐकत होती. ऐकता ऐकता डोळ्यासमोर नदीत ते सगळं जिवंत करून बघू लागली. आज बायकोचं नदीवर विशेष प्रेम जडलं. निसर्ग मनापासून स्वतः मध्ये ती साठवत होती. एरवी सगळा वेळ या ना त्या एंगल ने सेल्फी काढण्यात जायचा. नवरा बायकोचा हा संवाद म्हणजे एक दैवी अनुभव होता. नवरा नदीची आख्यायिका ऐकवतोय आणि बायको तल्लीन होऊन ऐकतेय. 

बराच वेळ संभाषण झालं आणि दोघेही घरी जायला निघाले. वाटेतला निसर्ग डोळ्यात मनापासून साठवला. आजूबाजूला असलेल्या माणसांचं निरीक्षण केलं. फुलं विकणाऱ्या बायकांची मुलं अर्ध्या कपड्यात खेळत होती पण आनंदी होती, झोपड्यात वृद्ध माणसं निपचित झोपू होती पण आपला मुलगा सोबत आहे या आधाराने समाधानी होती. नदीच्या काठावर नाना प्रकारची झाडे वेली होती, फुले होती..प्रत्येक फुल आणि रोप ती बारकाईने न्याहाळू लागली, काही फुलं तर तिने प्रथमच पाहिलेली..मंदिराच्या कोरीव कामाचे बारकाईने निरीक्षण केले, त्या नक्षीतील एकसंधता, कोरीवता अचाट होती. मंदिराच्या भिंतींना स्पर्श करत होती..विचार करत होती, “किती जुनं मंदिर आहे, याला कितीतरी संत महात्म्यांचा स्पर्श झाला असावा, कितीतरी पिढ्या इथे आल्या आणि गेल्या..पण मंदिर तसंच आहे, अगदी तटस्थ.. येणाऱ्या जाणाऱ्या पिढ्यांना बघणारं, त्यांच्यातला बदल अनुभवणारं…

त्यांनी आज मनापासून निसर्ग अनुभवला, माणसं अनुभवली ,मूर्ती अनुभवली, जीवनं अनुभवली. ते एक अकस्मिक समाधान होतं. इतके फिरूनही मोबाईलची गरज भासली नाही. 

त्यांनी अनुभवला होता एक आगळावेगळा प्रवास, एक आगळावेगळा अनुभव…

बायकोच्या डोळ्यात एक मनस्वी आनंद होता. स्वतः छान तयार होऊन स्वतःचेच सौंदर्य अनुभवणाऱ्या तिने, आज स्वतःला हरवून निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती घेतली होती. तिचं समाधान बघून नवराही सुखावला, 

“माझ्या अटीने नाराज तर नाही झालीस ना?”

ती स्मितहास्य करून फक्त एवढंच म्हणाली,

“Thanks.”

***

आपणही कधीतरी अशी अनुभूती घ्यायला काय हरकत आहे? बरोबर ना?

©संजना सरोजकुमार इंगळे

4 thoughts on “एक ट्रिप-मोबाईल विना”

  1. Agdi barobar aajkal फोटोच्या नादात खर आजूबाजूचे सौंदर्य बघतच येत नाहीये विशेष करून स्री वर्गाला खूप छान होती story मूर्तीचे सत्व, निसर्गाची सुंदरता असे दख्वळे पाहिजे कुणी तरी अशी अट घालणारे पाहिजे आणि तिच्यासारखं aiknarehi एक प्रयोग तर नक्की करणार असा मी स्वतःच स्वतः साठी 👍👍👍👌👌👌👌👌👌💐

    Reply
  2. तुम्ही म्हणता तसं हिंडलो तरच निसर्ग कळतो. अट आवडली.

    Reply

Leave a Comment