एकाच रांगेत…

“आबा…काय टक लावून पाहताय त्याच्याकडे इतकं?”

“याला कुठेतरी पाहिलंय मी…भेटलो आहे कधीतरी..”

हे ऐकताच इतर मंडळी हसायला लागली,

“आबा वय झालंय तुमचं, तुम्हाला सगळेच भेटलेले असतात..”

“नाही रे पण हा चेहरा..”

“असुद्या…समोर बघा..आता आपल्या गावाला पुरस्कार जाहीर झाला की सरपंच घ्यायला जाईल, तेव्हा मोठ्याने टाळ्या वाजवा बरं..”

मंत्रीसाहेबांकडे आबा निरखून पाहत होते,

उत्कृष्ट गावाचा पुरस्कार आंबेवाडी ला जाहीर झाला होता, त्यासाठी एक मोठ्या सभेचे आयोजन केले गेले होते…मोठमोठे राजकिय पुढारी, नावाजलेले व्यावसायिक सर्वांना आमंत्रण होते… सर्वजण मोठ्या तयारीने सोहळ्याला आले, पण तिथली व्यवस्था पाहून पुढाऱ्यांना अपमान वाटू लागला…कारण जिथे VIP लोकांना स्पेशल जागा असते तिथे काहीही व्यवस्था नव्हती, सर्वांना सारख्याच जागेवर सारख्याच खुर्च्या रांगेत ठेवल्या होत्या…

आंबेवाडीतून आलेल्या त्या खेडेगावातील लोकांना राजकीय पुढारी आणि VIP लोकांच्या रांगेत बसायला जरा अवघडल्यासारखं झालं होतं. आणि त्या VIP लोकांना जबरदस्त अपमान वाटत होता. पण काय करणार, मंत्री साहेबांचा शब्द कोण टाळणार??

अखेर पुरस्कार सोहळा संपन्न झाला, आंबेवाडीतून आलेल्या लोकांनी मोठा जल्लोष केला, स्टेजवर कुणीही नव्हतं, केवळ पुरस्कार देण्यासाठी जे पुढारी होते ते येऊन पुरस्कार देऊन पुन्हा खालच्या रांगेत येऊन बसत…एकमेव सुत्रसंचालक तेवढा स्टेजवर होता…त्याने मंत्री साहेबांना स्टेजवर येऊन बोलायला सांगितलं, मंत्री साहेब कुठे बसलेत हे सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले, आणि अचानक त्यांच्याच खुर्च्यातून ते उठले…मंत्री स्वतः सुद्धा त्याच रांगेत बसलेले जिथे ग्रामस्थ बसले होते…ते समोर आले आणि बोलायला सुरुवात केली…

“विविध पुरस्कार मिळालेल्या सर्व ग्रामस्थांचं सर्वप्रथम अभिनंदन…आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला एक विषेश गोष्ट जाणवली असेल…सर्वजण एकाच रांगेत एकाच उंचीवर बसले आहेत…कुणीही लहान नाही कुणी मोठा नाही…ही गोष्ट फार लहानपणी माझ्या मनावर रुजली गेली होती…आणि याचं श्रेय जातं ते आंबेवाडीतील लोकांना…”

आंबेवाडीतील लोकं अचंबित झाले…मंत्री साहेब गावी कधी आले होते? आम्हाला कसं माहीत नाही??

“मी खूप लहान होतो, वडील सोडून गेलेले, आई अन मी एका छोट्याश्या झोपडीत राहायचो, एकदा पुरामुळे झोपडी गेली अन सगळंच गेलं…आम्ही थोडंफार समान घेऊन वाट शोधत शोधत आंबेगावात पोचलो..गावाच्या वेशीपाशी उभे होतो…आमच्या शेजारूनच एक चारचाकी गेली…ग्रामस्थांनी त्यांना तिथेच थांबवलं, त्यांचा आदर सत्कार केला, त्यांची विशेष सोय करून पूर्ण सहकार्य केलं… आम्हाला असं कळलं की या गावात वेशीतून जो नवीन माणूस येईल त्याचा यथोचित सत्कार झाल्याशिवाय त्याला आत ही माणसं सोडत नसत… मग काही वेळाने आम्ही गेलो…आमच्या अंगावरचे फटके कपडे बघत आम्हाला भिकारी समजून नक्कीच घालवून देणार असं आम्हाला वाटलं…पण आम्ही मध्ये जाताच एक आबासाहेब नावाच्या गृहस्थांनी आम्हाला पाहिलं… आमच्यावरून एक नजर फिरवली अन इतर लोकांनाही जमा केलं… काही लोकं म्हणत होती, की ही लोकं एकदम खालच्या स्तरातील आहेत, यांचा काय सत्कार करायचा? पण आबासाहेबांनी त्याला गप केलं…आपल्या गावची प्रथा सर्वांसाठी सारखीच असेल असं बजावून सांगितलं…त्या चारचाकीतील माणसाचा जसा सत्कार केला तसाच आमचाही करण्यात आला…आम्ही भारावून गेलो, आम्हाला राहण्याच्या व्यवस्थेपासून ते पोट भरण्याची सोय त्यांनी केली. आम्ही कर तिथे गेलो नसतो तर कदाचित आज मी एखाद्या रस्त्यावर भीक मागत फिरताना दिसलो असतो…आणि तेव्हा मला समजलं, की आदर ही खूप मोठी गोष्ट आहे….आणि त्याचे सर्वजण समान हकदार आहेत…त्या गोष्टीवरूनच मी आज तुम्हाला सर्वांना समान खुर्च्यांवर एकाच ठिकाणी बसवलं…आणि मीही तुमच्याच रांगेत एका कोपऱ्याला बसलो…आबासाहेब… तुम्ही जिथे कुठे असाल..मी कायम तुमचा ऋणी असेल..”

आंबेवाडीतील जी माणसं आबासाहेबांना हसत होती, तीच आता मोठ्या आश्चर्याने आबांकडे पाहू लागली, त्यांच्या डोळ्यातील मोती दूरपर्यंत चमकत होते…

Leave a Comment