इथे फक्त “ज्ञान” केंद्रस्थानी आहे

अभिनेता प्रवीण तरडे आपल्या गणेश आरास प्रकरणी चर्चेत आले आहेत. गणेश ज्याची देवता आहे अश्या ज्ञानाच्या स्रोतात गणेशजींची मूर्ती स्थापन करावी या उद्देशाने त्यांनी आरास केली असता त्यांच्यावर टीकेची झोड उठली. याचं कारण म्हणजे त्या पुस्तकांत आपले पवित्र संविधानही सामील होते. संविधानाच्या पुस्तकावर प्रवीण तरडे यांनी गणेश मूर्तीची स्थापना केली, पण याचमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि अखेर प्रवीण तरडे यांना माफी मागावी लागली.

हिंदू धर्म आणि संविधान, दोन्हीही गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाला पवित्र आहे. विविधतेत एकता या संस्कारांवर आम्ही वाढलो आहे. पण एकाच भूमीतल्या या दोन्ही गोष्टींना आम्ही एकत्र दाखवतो तेव्हा आम्ही “विविधतेतील एकता” का विसरतो??

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात “त्या” काळी मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीला विरोध केला. त्यांच्यावर झालेला अन्याय ऐकून खरंच रक्त खवळते…अश्या परिस्थितीत त्यांनी धर्मांतर करणे साहजिक होते, हिंदू धर्म विरुद्ध दलित समाज हा वाद फार आधीपासूनच सुरू होता, पण आज खरंच परिस्थिती तशी आहे का? जुन्या गोष्टी उकरून काढून आजच्या व्यवस्थेत त्याच गोष्टींचा वाद का पेटवून घ्यायचा??

विविध संस्कृतीचा मेळ घालणे माणसाला आवडते, म्हणूनच आम्ही दिवाळी नंतर नाताळच्याही शुभेच्छा देतो..रमजान च्याही शुभेच्छा देतो…तेव्हा आम्हाला ब्रिटिशांनी आमच्यावर केलेलं राज्य किंवा राम मंदिर आठवत नाही, कारण आम्हाला माहीत आहे, वाद घालायला शंभर गोष्टी आहेत पण मेळ घातला तर गोष्टी सुखावह होतील…

राहिला प्रश्न संविधानावर मूर्ती स्थापन केल्याचा…तर एक गोष्ट लक्षात घ्या, संविधान हे एक सामाजिक पवित्रतेचा भाग आहे आणि गणेश मूर्ती ही अध्यात्मिक पवित्रतेचा भाग आहे…त्यामुळे कोण श्रेष्ठ हा प्रश्नच उद्भवत नाही, दोन्हीही आपापल्या जागेवर श्रेष्ठच आहेत…

या गोष्टीकडे एका व्यापक दृष्टीकोनातून पहिल्यास असे लक्षात येईल की संविधान असो वा गणेशपूजा…दोघांचंही मूळ एकच…ते म्हणजे “ज्ञान..”

ज्ञानाची आराधना गणेशानेही सांगितली आई आणि डॉ. बाबासाहेबांनी सुद्धा सांगीतली आहे…मग अश्यावेळी याच ज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून जर कलेच्या मार्फत गणेश आरास करण्यात दोघांना स्थान दिले असेल तर त्यात काही गैर असं मला वाटत नाही…

बाकी प्रत्येकाचं आपापलं मत आहे, ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं आहे त्यामुळे माझ्या मताला सर्वांनी सहमत असावं असा माझा आग्रह नाही आणि तुमची विरुद्ध मतं असतील तरी त्यांचा मी आदरच करेन..

Leave a Comment