आलो जरा जाऊन

 

मनीष गाडी काढून बाहेर गेला आणि छोट्या बहिणीने विचारलं..

“आई दादा कुठे गेलाय?”

“काय माहीत? काम असेल काही..”

“आई तू म्हणते ना सांगून जात जायचं..मग दादा का नाही सांगत?”

“दादा मोठा झालाय आता…विचारलं तर राग येतो त्याला..”

संध्याकाळ झाली तरी मनीष परतला नाही…आईची काळजी वाढू लागली. फोन लावला तर बंद येत होता…सांगून गेला असता तर तिथे शोधलं असतं… पण सांगितलंही नाही याने.

रात्र झाली तरीही मनीष चा पत्ता नाही..अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली..

अखेर मनीष त्याच्या मामा च्या गोडाऊन मध्ये बेशुद्धावस्थेत आढळला…त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं…धोका टळला…पण मनीष अडकला कसा?


मनीष मामा ला भेटायला गोडाऊन मध्ये गेला होता, काहीही खबर न देता…गोडाऊन मध्ये कुणीही नव्हतं… मामा ची वाट बघत मनीष हेडफोन लावून एका ठिकाणी बसून राहिला…मामाची माणसं आली, त्यांनी गोडाऊन बंद केलं…हेडफोन लावलेले असल्याने मनीष ला आवाज ऐकू आला नाही… तो उठला तेव्हा समजलं की शटर बंद आहे…त्याने आरडाओरड केला…मोबाईल ची बॅटरी सम्पली अन फोन बंद पडला… गुदमरून अखेर तो तिथेच कोसळला…

जर त्याने घरी सांगितलं असतं की कुठे जातोय, तर ही वेळ आली असती?

कथेचं तात्पर्य इतकंच…की आपल्याकडे बऱ्याच पुरूषांना सवय असते घरात काहीही न सांगता बाहेर पडण्याची…

“आलो जरा जाऊन…”

एवढं सांगून ती बाहेर पडतात… काहीजण तर तेवढंही सांगत नाही…आम्ही काही लहान नाही, किंवा आमच्यावर विश्वास नाही असा अविर्भाव असल्याने त्यांना या गोष्टी क्षुल्लक वाटतात…पण खरं तर सुरक्षितता म्हणून घरातल्या प्रत्येकाने आपण कुठे जातोय, का जातोय, केव्हा येणार याची माहिती घरी देणं महत्वाचं आहे. आपल्याही घरात असे पुरुष असतील तर त्यांना आवर्जून हे सांगा.

Leave a Comment