आरसा

 “आमच्या घरी चला अर्धे पाहुणे, इथे अडचण होत असेल तर..”

धाकटा गंगाराम आपल्या पुतणीच्या लग्नासाठी जमलेल्या माणसांना विणवत होता. गंगाराम चा मोठा भाऊ गणपत याच्या मुलीचे लग्न जमले होते. गावाकडे असा कार्यक्रम म्हणजे आठवडाभर आधी लगबग असे. पुऱ्या, सांजोऱ्या, कुरडया, बुंदी असे अनेक प्रकार बनवण्यात गावातल्या बायका जमत. लग्नघरी नातेवाईक अन शेजारच्यांची प्रचंड गर्दी जमे.

 गंगारामने म्हणावी तशी प्रगती केली नव्हती, त्याचं छोटसं घर गणपतच्या बाजूलाच होतं. दोन्ही भावांचा एकमेकांवर प्रचंड जीव. गंगाराम स्वाभिमानी होता, मोठ्या भावाकडून कधीही त्याने मदत घेतली नाही. गणपत ने कष्टाने शेतीत प्रगती करून मोठं घर, ट्रॅक्टर, जमिनी विकत घेतलेल्या. मोठ्या भावाचं घर प्रशस्त, सर्व सुखसोयींन्नी समृद्ध होतं. याउलट गंगाराम अजूनही 3 खोल्यांच्या लहानश्या घरात राहत होता. लग्न ठरलं तसं गंगाराम आणि गणपत दोघांनी सोबतच धावपळ केली. लग्नाला काही दिवस शिल्लक असताना पाहुणे यायला सुरुवात झाली…

मोठ्या डौलाने आत्याबाई आल्या, मग हळूहळू मामा, मामी, मावश्या, मावस चुलत भावंडं आपापली बिऱ्हाडं घेऊन आली. गंगारामच्या घरासमोरून सर्वजण जात, पण एकालाही असं वाटलं नाही की आधी गंगाराम कडे जावं. कारण मोठ्या घरात प्रत्येकाला आपली खोली आधीच पक्की करायची होती. आत्याबाईंनी गणपतच्या खोलीतच बस्तान मांडलं. शेवटी कितीही झालं तरी माहेरच, सर्व जागेवर अत्याबाईंचा हक्क..मावश्यांनी संकोचत मागची खोली व्यापली, सर्व भावंडं अंजलीच्या खोलीतच राहणार होते. माम्यांनी गपगुमान स्वयंपाकघरातच आपली पिशवी ठेवली अन तिथेच बस्तान मांडलं. दिवाणखाना पूर्णपणे माणसांसाठी राखीव होता. पुरुष मंडळी अश्यावेळी कुठे घरात थांबतात..एक तर दिवाणखान्यात, ओसरीवर, शेतात..नाहीतर गावातल्या त्यांच्या अड्ड्यावर. रात्री व्ही आय पी पाहुण्यांना झोपायला खास खोली, मध्यम व्ही आय पी वाल्यांना बाहेर खाट टाकून दिली जायची आणि बिनबुलाये लोकांना स्वतःची सोय स्वतःच करावी लागायची.

मेहेंदीचा दिवस..गंगाराम आणि गणपत दिवसभर धावपळ करून थकून गेलेले. मेंदीच्या दिवशी माणसांचं तसं काही काम नव्हतं. या दोघांना शैलेश दाजी गावातल्या अड्ड्यावर घेऊन गेले. असंही 

दोघांना जरा निवांततेची गरज होती. दाजींनी दोघांसमोर एकेक ग्लास ठेवला. दोघांनी घोट घोट पीत थकवा झटकून टाकला. गंगाराम बरळू लागला..

“पैसेवाला झालास तू..पाहुणे तुझ्याकडेच थांबतात..माझ्याकडे कुणी ढुकुनही पाहत..माझी बी पोर हाय अंजली..”

गंगाराम च्या मनात असलेली खदखद त्याने आज बोलून दाखवली. गणपतला वाईट वाटलं. त्याने मनाशी काहीतरी ठरवलं अन आपला कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी परतले.

हळदीचा दिवस उजाडला. संध्याकाळी सर्वजण तयार होऊ लागले, बायकांनी आपापल्या नवीन साड्या काढल्या, दागिने वर काढले..चहा होताच सर्वजण तयारीला लागणार होते.

चहा झाला अन एकेक मंडळी गंगाराम च्या घरी जाऊ लागली. गंगाराम ला आनंद झाला. आत्याबाई आल्या, मग तिची मुलं, मग सगळी भावंडं.. एकेक करत सगळी मंडळी गंगाराम च्या घरी घुसली अन शेवटी गंगारामला उभं राहायलाही जागा उरली नाही. गंगारामला कळेना हे असं का झालं. आलेल्या पाहुण्यांना तो मनापासून सगळी मदत करू लागला. भरलेलं घर पाहून तो समाधानी पावला. लग्नाच्या दिवशीही तेच, गंगारामचं घर सोडायला कुणीही तयार नव्हतं. गणपत म्हणाला,

“बघ..तू म्हणत होतास ना माझ्याकडे कुणी येत नाही म्हणून? आता महत्वाच्या दिवशी बघ कशी गर्दी झालीय तुझ्याकडे..”

“हो रे आबा..पण असं कसं झालं तेच समजत नाहीये..”

गणपत फक्त हसला..

लग्न उरकलं, अंजलीला सर्वांनी निरोप दिला अन सर्वजण घरी परतले. सर्वजण आपापलं सामान बांधून आता परतीच्या मार्गाला लागणार होते. गंगारामला काही माणसं त्याच्या घरातून काही सामान उचलून गणपत च्या घरात जातांना दिसले. जवळ जाऊन पाहिलं तर मोठमोठे आरसे पूर्ण घरात लावले होते. प्रत्येक भिंतीवर 2-2 भलेमोठे आरसे. गंगाराम ने बायकोला विचारलं..

“काय प्रकार आहे हा??”

बायको हसत सांगू लागली, 

“कुणाला बोलू नका, पण आबांनी आपल्या घरात गोतावळा वाढावा म्हणून त्यांच्या घरातली सगळी आरशी आपल्या घरात लावून दिली..सर्वांना नटून थटून मिरवायचं होतं, पण त्या घरात केवळ दोनच आरसे शिल्लक..मग काय..एकेक करून आले सगळे इकडे..”

गंगारामला मोठ्या भावाच्या या विलक्षण युक्तीचं हसू आलं..आणि गणपतला आपला भाऊ खुश झाला याचं समाधान लाभलं..

1 thought on “आरसा”

Leave a Comment