आयुष्याचा धडा

सासरच्या जाचाला कंटाळलेल्या विशाखा ने शेवटी सरिता मॅडम कडे आपलं मन मोकळं केलं. सरिता मॅडम विशाखाच्या शाळेतील शिक्षिका. शिक्षिका म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक..ज्यांनी विशाखा च्या सुप्त कलागुणांना जोपासण्यापासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडीअडचणींना सामोरं जाण्याची शिकवण दिली होती. केवळ पाठयपुस्तकातील धडे न गिरवता आयुष्याचे धडे त्यांनी विशाखा ला दिले होते. विशाखा एक गुणी आणि हुशार मुलगी होती, सरिता मॅडम ची आवडती विद्यार्थिनी. मुलाप्रमाणे त्यांनी विशाखा वर प्रेम केलं होतं..ती सासरी जाताना मॅडम च्या गळ्यात पडून खूप रडली होती…
बिदाई च्या वेळी मॅडमनी विशाखा ला एकच सल्ला दिला…”सूर्योपासना” करत जा…सुखी राहशील. विशाखा ने तो आदेश तंतोतंत पाळला…सकाळी लवकर उठून ती सूर्याला नमस्कार कारायची, सुर्यमंत्र म्हणायची. तिने नियमितपणे हे केलेलं. हळूहळू संसाराची झळ तिला बसू लागली, नवऱ्याचा स्वभाव, सासुचे टोमणे, घरात वेगळी वागणूक देणे या सगळ्यात ती गुरफटून जात होती..ती जशी हुशार होती तितकीच मनाने चांगली होती, कष्टाळू होती..आपलं शिक्षण बाजूला ठेऊन तिने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या..मॅडम ला अधूनमधून फोन करायची, त्या सांगायच्या दुःखी हाऊ नकोस, ‘सूर्योपासना’ करत जा.. पण म्हणतात ना, नावडतीचे मीठही अळणी.. तसं व्हायचं, तिने कितीही केलं तरी शेवटी पदरात अवहेलनाच यायची. ती कंटाळली, रडकुंडीला आली आणि सरतेशेवटी मॅडम ला भेटायला गेली.
मॅडम भेटल्या आणि त्यांच्या गळ्यात पडून ती रडत होती..मॅडम ने पुन्हा विचारलं, सूर्योपासना करतेस ना?
“हो मॅडम, न चुकता करते, रोज सूर्याला अर्घ्य देते, सुर्यमंत्र म्हणते, सूर्याला नमस्कार करते..”
“चुकलं मग तुझं..”
“का? अजून काही करायचं असतं का?”
“तू सुर्योपासनेचा शब्दशः अर्थ घेतलास..”
“मग कशी करावी सूर्योपासना?”
“सूर्योपासना करायची म्हणजे त्या सूर्याचे गुण आत्मसात करायचे”
“कुठले गुण?”
“आता हेच बघ ना, कोणी सन्मान करो अथवा ना करो, कुणी नमस्कार करो वा ना करो…सूर्य आपलं कर्तव्य करत असतो…सगळी लोकं झोपेत असतात, अंधारात असतात…पण म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही”
“पण त्या कर्तव्याची जाणीव नसेल कुणाला तर..”
“तरीही करायचं, कारण तू सूर्य आहेस…तुझ्यात तेज आहे..तुझ्यात आग आहे…कष्टाची प्रखरता आहे…तुला आज ओळखते का मी?..कितीही अडथळे आले तरी सूर्याची किरणं त्याला भेदून आरपार जातच असतात…हेच गुण अंगीकारायचे.. म्हणजेच सूर्योपासना करायची….मग आता तूच ठरव, तुला सातत्याता, निरपेक्षता आणि तेजस्विता ठेवत सूर्य बनायचे आहे की अंधारात चाचपडत राहणारा काजवा….”
शिक्षिका या नावाला खरा अर्थ देत सुर्योपासनेचे मर्म समजवणाऱ्या सरिता मॅडम नी आज आपल्या विद्यार्थिनीला आयुष्याचाही धडा दिला होता..

Leave a Comment