“आमच्या वेळी नव्हतं असं…”

 

“आमच्या वेळी नव्हतं बाई असं..” हे ऐकून ऐकून स्मिता चे कान विटले होते..पण सासूबाईंच्या या वाक्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी ती भोळी नव्हतीच…काहीतरी केलंच पाहिजे ज्याने ही टेप बंद होईल…पण काय करावं तिला काही सुचेना…

घरात पाहुणे आले तसं सासूबाईंनी स्मिता ला आवाज दिला. गावाकडची मंडळी होती, सासूबाईंच्या मते हिने साडी घालून समोर यायला हवं. पण स्मिता ऐकेल तर शप्पथ… आणि मग स्मिता जरा नजरेआड झाली, अन सासूबाईंचा आवाज कानावर पडला..

“आमच्या वेळी नव्हतं बाई असं..”


दुसऱ्या दिवशी स्मिता आणि तिचा नवरा मुव्ही साठी गेले.येताना दोघांत काहीतरी चेष्टामस्करी झाली..नेमकं तेव्हाच सासूबाईंनी दार उघडलं..सतीश चा हात अजूनही स्मिता च्या खांद्यावरच होता…आईने पाहिलं तसा त्याने तो मागे घेतला…

“आमच्या वेळी फार शिस्त होती…असं नव्हतं बाई…”

असं म्हणत पुन्हा एक टेप सुरू झाली…

आता स्मिता ला यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा होता…नाहीतर हे आयुष्यभर ऐकावं लागणार होतं..

स्मिता आपल्या खोलीत गेली, दार लावून फोनवर कुणाशीतरी बोलली आणि तोडगा घेऊनच बाहेर आली…

संध्याकाळी सगळे जेवायला बसल्यावर स्मिता ने एक घोषणा केली..

“सर्वांसाठी एक आनंदाची बातमी…मी सर्वांना एका ट्रिप ला नेणार आहे..माझ्या खर्चातून…सरप्राईस आहे…”

स्मिता कुठे जायचं सांगतच नव्हती…
सासूबाईंना ट्रिप ची भारी आवड…त्या लगेच तयार झाल्या…सुनबाई कुठे नेणार नक्की? सरप्राईज आहे…मॉरिशस की स्वित्झर्लंड?? चला…काहीतरी भारी असणार..

सर्वांची तयारी होते…मोठ्या मुश्किलीने तिने बाकीच्यांना तयार केलं..ठिकाण माहीत नसताना जायला सासरे अन सतीश कचरत होते पण कसेबसे झाले तयार..

स्मिता ने साडी नेसली..सासूबाईंना नवल वाटलं..
देवस्थानी तर नसेल नेणार??

स्मिता ने गाडी बुक केली, अन सामान घेऊन सर्वजण निघाले…

गाडीत बसून गाडी कुठे जातेय याचा सर्वजण अंदाज घेत होते…कुठे जायचंय हे अजूनही सरप्राईज होतं..

मात्र जसजसा रस्ता जवळ येऊ लागतो तसतशी सासूबाईंनी धडधड वाढू लागते…


गाडी गावात शिरते तेव्हा सर्वांच्या लक्षात येतं..स्मिता ने तिच्या सासरच्या गावी, जिथे सासूबाईंचे सासू सासरे राहत होते तिथे ट्रिप काढली होती. सासऱ्यांना आणि सतिष ला आनंद झाला..सासऱ्यांना सुनेचं कौतुक वाटलं..सतीश आपल्या गावी रमला..सासरेबुवा आपल्या माणसात रमले…पण सासूबाई? हे घर पाहताच त्यांचा अंगावर काटा आलेला…कारण त्या आता सासू नव्हत्या, सून होत्या.

गेल्यावर आजेसासू दारात उभ्या, स्मिता ने जवळ जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला..सासूबाईंना काही सुचेच ना..मग आजेसासू म्हणाल्या..

“काय बाई आजच्या पोरी…पाया सुद्धा पडत नाही…आमच्या वेळी नव्हतं असं..”

सासूबाई रागातच जवळ गेल्या आणि त्यांच्या पाया पडल्या….

“सुनबाई, जा आत..सर्वांना चहा टाक..”

“आं??”

“ऐकलं नाही का?”

“स्मिता करेल ना..”

“ती नातसून आहे माझी..बोलू दे मला तिच्याशी…तू कामं कर..”

सासूबाई पदर खोचत आदळआपट करत चहा टाकतात आणि सर्वांना देतात…

“आमच्या वेळी नव्हतं बाई असं..डोक्यावर पदर घेतल्याशिवाय कुणी असं समोर जायचं नाही..”

सासूबाई अजून चिडल्या..पण काही बोलता येईना..

त्या सासरेबुवांकडे गेल्या…अहो, संध्याकाळी परत जाऊया आपण .. मला बरं वाटत नाहीये..

तोच आजेसासू मागून आल्या..

“काय बाई..आमच्या वेळी नवऱ्याशी बोलू सुद्धा द्यायचे नाही…असं नव्हतं..”

“हो माहितीये…तुमच्या वेळी असं नव्हतं..अहो काळ बदलला..तशी पद्धत बदलते…सगळं काही सारखं राहत नाही…आणि नाही जमणार मला ‘तुमच्यावेळी’ जसं होतं तसं राहायला आणि करायला…”

“होना?? मग माझ्या नातसुनेला कशाला बोलतीस?”

सासूबाईंचे डोळे खाडकन उघडले..आणि त्यांची टेप आता बंद होणार होती हे काही वेगळं सांगायला नको..

निरोप देताना स्मिता अजेसासुला म्हणते, त्या दिवशी तुमचा फोन आला नसता ना, तर आयुष्यभर हेच ऐकावं लागलं असतं मला…

“आता पून्हा काही झालं ना, तर सरळ मला सांग…आणि इकडे दौरा काढ..”

आजेसासू प्रेमाने सर्वांना निरोप देत होते.आणि स्मिता च्या सासूबाई एक फार मोठा धडा घेऊनच परतल्या..

Leave a Comment