अस्सं सासर सुरेख बाई

 “सुधा परत एकदा विचार कर, जॉईन फॅमिली आहे ती..दिसायला सगळं छान दिसतं बाहेरून पण एकदा त्यात अडकलीस की बाहेर पडता येणार नाही..तू एकुलती एक, लाडात वाढलेली..तुला ना कामाची सवय ना जबाबदारीची…फक्त प्रेम आहे तेवढं असून चालत नाही..”

सुधा आणि अमित एकाच कॉलेजमध्ये, कॉलेज पासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. रुसवे फुगवे दुरावा करत करत शेवटी त्यांना समजलं की आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे दोघांनीही घरी सांगितलं आणि होकार मिळाला..

पण सुधाच्या आईला सुधा ची काळजी होती, सुधा आणि तिचे आई बाबा एवढ्याच कुटुंबात ती लहानाची मोठी झालेली..स्वयंपाकघरात पाऊल ठेवायची कधी गरज पडली नाही..सगळं आयतं मिळत होतं.. लग्न होणार म्हणून आई तिला बळजबरीने स्वैपाकघरात आणून एकेक गोष्ट शिकवत होती..

“आई काय गं, शिकेल ना मी नंतर…पप्पा बघा ना..”

“काय गं माझ्या लेकीला कामाला लावतेस?”

“तुम्हाला काय जातंय बोलायला, तुम्ही माणसं मस्त सोफ्यावर पाय पसरून पडलेले असतात संध्याकाळी.. बायकांची या वेळेला काय धावपळ असते काय माहीत तुम्हाला…जेवण मशीन मधून बनत नाही, त्यासाठी तास दोन तास मेहनत लागते…”

आईची काळजी अजून वाढली, सुधाही आईचं बोलणं मनावर घेऊ लागली..

“आम्ही तिघे असूनही इथे आईची किती धावपळ होते…तिकडे तर घरात 8-10 माणसं..”

तिच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं..

“सुनबाई..चहा टाक पटकन, थोड्या वेळाने तुझे सासरे येतील, त्यांना आल्याचा कर…अर्ध्या तासात अमीत उठेल त्याला खोलीत नेऊन दे..सुनबाई, आज नैवेद्य आहे, पुरणपोळी कर बरं..!!! सुनबाई, गावी लोणचं नेऊ म्हणते, यावेळी तुझ्या हातचं कर बघू..”

सुधाच्या डोक्याला मुंग्या येऊ लागतात.. 

“अरे देवा..हे काय, याचा तर मी विचारच केला नाही…असं खरंच झालं तर? “

याविषयी अमित सोबत आपलं मन मोकळं करावं असं तिला वाटू लागलं. भेटून सांगण्याइतपत तिच्यात धीर नव्हता..तिने पटकन त्याला मेसेज केला.

“मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे..”

“हो, पण नंतर, आता जरा आवरतोय..”

सुधा ने घड्याळात पाहिलं, सकाळचे 9 वाजले होते..आता अमित काही 11:30 पर्यंत रिप्लाय देणार नाही..त्यांचं रोजचं असायचं..सकाळी उठल्यापासून मेसेज सुरू व्हायचे, 9 पर्यन्त गप्पा सुरूच..मग अमित बरोबर 9 वाजता तिला निरोप द्यायचा तो डायरेक्ट साडे अकरालाच रिप्लाय द्यायचा..या वेळात तो इतकं काय आवरतो हा सुधाला नेहमी प्रश्न पडायचा…

सुधाला धीर नव्हता, ती सतत मेसेज करत होती पण रिप्लाय येईना…तिने खूप विचार केला. हे लग्न करून आपलं काही निभावणार नाही हे तिला पटू लागलं..अमितला लग्नाबद्दल विचार करायला अजून वेळ मागावा असं ती ठरवते आणि साडे अकरा वाजायची वाट बघते..

साडे अकरा होताच अमितचा मेसेज..

“बोल गं, काय सांगायचं होतं?”

सुधा वाट बघून बघून आधीच वैतागली होती..चिडून ती त्याला म्हणाली..

“इतकं काय आवरतो रे तू रोज? आवरण्यासाठी जास्तीत जास्त पाऊण तास लागतो…9 ते 11:30 इतका वेळ तू काय करतो? मला कायम प्रश्न पडतो पण कधी विचारलं नाही मी..”

“अगं हो हो, इतकं चिडायला काय झालं? काय सांगायचं होतं तुला?”

“मला वेळ हवाय..”

“वेळ? कशासाठी?”

“विषय बदलू नकोस, सांग तू 9 ते 11;30 काय करतोस..”

“बरं ऐक, सकाळी अंघोळ वगैरे झाली की बाबा आणि मी स्वैपाकघरात जातो…रोजचं ठरलेलं असतं. आई स्वैपाकाला लागलेली असते मग तिला भाजी चिरून देणं, कणिक मळून देणं, कधी कधी भाजीला फोडणी देणं अशी कामं करतो रोज..”

“तुम्ही रोज ही कामं करता?”

“हो मग, आपण रोज जेवतो ना? जेवायचं आपण आणि काम मात्र आई करणार, असं कसं? त्यामुळे आमच्या घरात तसा नियमच आहे…स्वैपाकघरात जाऊन काही ना काही काम करून मगच बाकीचं आटोपायचं.. आज शिरा बनवायचा होता…मग रवा भाजून दिला आईला आणि काजू बदाम सोलून दिले..बाबांनी शिरा बनवला आणि आईने थालीपीठ टाकले..”

सुधा मौन..

“काय गं? बोल ना, तुला कशासाठी हवाय वेळ?”

“आं? काही नाही , ते आपलं..लग्नासाठी लेहेंगा ठरवायला वेळ लागतोय…त्यासाठी वेळ हवाय..”

Leave a Comment