अश्या कित्येक आयेशा अजूनही जगत आहेत?

 Ayesha news

Ayesha husband

Ayesha suicide

एका स्त्रीला आत्महत्या हा शेवटचा पर्याय वाटावा आणि सर्व जोखड सोडवण्यासाठी मरणाचा मार्ग पत्करावा याहून मोठं दुर्दैव ते काय..!!!

सोशल मीडियावर आयेशा नामक एका महिलेने आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामागे कारणीभूत कोण, गुन्हेगार कोण यामागे न लागता अश्या अनेक मूक आयेशांबद्दल आपण बोलूयात. आयेशा ही एकटी स्त्री नाही जी मानसिक अत्याचाराला बळी पडली असेल, समाजात अनेक स्त्रिया तोंडाला कुलूप लावून मूकपणे हा अत्याचार सहन करताय. त्यापैकी काहीजण केवळ स्वतःची सहनशीलता वाढवत अत्याचाराला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात तर काहीजणी धीटपणे त्याला प्रतिकार करतात. 

भाजी मंडईत भाव करणाऱ्या, गाडीला कुणी धक्का लावला तर तोंडाला येईल ते बोलून भांडणाऱ्या महिला घरात अत्याचार का सहन करतात? कारण एकच, “प्रतिकार करणारी आणि बोलणारी स्त्री निर्लज्ज, असंस्कारी ठरते..” मग आपण निर्लज्ज नाही हे दाखवायला आणि आपल्या आई वडिलांचे संस्कार चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून सतत अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त आहे. 

जेव्हा ती तोंड उघडते तेव्हा ती बदनाम होते.

 “तुम्ही तिला का घराबाहेर काढलं?”

“ती आवाज चढवून बोलते..प्रतिउत्तर देते..”

ही उत्तरं खरंच पटण्यासारखी आहेत? कुटुंबात अनेकदा वाद होतात, आवाज चढतो, प्रत्तीउत्तरं दिली जातात, मग हेच जर नवख्या सुनेने अन्यायाला प्रतिकार म्हणून केलं तर ती कुलटा ठरते? 

एक स्त्री नवऱ्याच्या घरी राहते हेच या समाजाला हवं असतं. मग ती कितीही अत्याचार सहन करत असली, कितीही मानसिक त्रास करून घेत असली तरी ते नगण्य. मग एखादी स्त्री नवऱ्याकडे राहत नसेल, माहेरी असेल किंवा घराबाहेर असेल तर नजरा बदलतात. ती नवऱ्यासोबत नाही हे जणू भयंकर पाप म्हणून शिक्का मारतात, आणि इथेच सुरू होते ती स्त्रीची स्वतःला पापी म्हणवून न घेण्याची धडपड. नवऱ्यासोबत राहणं हेच तिला जगण्याचा श्वास वाटतं. 

दुसरी गोष्ट यदाकदाचित माहेरी जायची वेळ आलीच तर जुनाट विचारांची माहेरची मंडळी समजूत घालून पुन्हा पाठवून देतात.

“तुला ऐकून घ्यावं लागेल, उलट उत्तर द्यायचं नाही, गपगुमान राहून संसार करायचा..” असं स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा संभाळण्याकरता स्त्रीला शेवटी पुन्हा त्याच खाईत ढकलून दिलं जातं. काही समजदार माहेरची लोकं खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहतात, पुन्हा तिकडे जायचं नाही म्हणत तिला सुरक्षा देतात, पण हळूच तुझ्या इथे येण्याने लोकं आम्हाला प्रश्न विचारू लागलेत, तुझे बाबा घराबाहेर पडत नाहीयेत, नातेवाईक विचारताय, शेजारी विचारताय…याची हळूच जाणीव करून देत तिला अपराधीपणाची भावना निर्माण करून देतात. स्त्री साठी माहेरचा रस्ता हा शेवटचा असतो, त्या पलीकडे रस्ता असतो तो केवळ मृत्यूचा.माहेरही जेव्हा धुडकावतं तेव्हा स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो. आपली गरज काय आहे? आपण कुणाला हवे आहोत? कुणासाठी आहोत? या प्रश्नांची उत्तरं जेव्हा तिला मिळत नाहीत तेव्हा डिप्रेशनची ती शिकार होते. 

इकडे आड तिकडे विहीर अशी जेव्हा स्त्रीची स्थिती होते तेव्हा तिची आयेशा बनते..

माहेरचा रस्ता हा शेवटचा नसावा, स्त्रीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की सर्वांना दिशा दाखवणारी ती स्वतःच्या अगणित वाटा सहज तयार करू शकते, स्वावलंबी बनून सन्मानाने जगू शकते, कुणाच्याही आधाराशिवाय ती आनंदी राहू शकते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी बनणं ही तिच्या अस्तित्वाला अबाधित ठेवण्यासाठी अपरिहार्यच आहे. 

आयेशाने मरणाचा मार्ग धरायला नको होता, पण आपण काय सांगणार.. ज्याचं दुःख त्यालाच माहीत…कदाचित तो मार्ग जास्त आनंददायी असावा..पण तो मार्ग आनंददायी बनवणाऱ्या समाजाचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. सर्व स्त्रियांनी..अन्याय होत असेल तर प्रतिकार करा, आपण दुसऱ्याच्या नजरेत वाईट बनू हा विचारही करू नका, कारण चांगलं वागूनही आपल्याला तेवढंच वाईट ठरवलं जातं.. मग फरक उरतो काय? प्रतिकार करा, बंड पुकारा, आपल्यासाठी कुणीही नाही म्हणत रडण्यापेक्षा आपल्यासाठी आपणच..असा विचार करत स्वावलंबी बना..निर्भिड बना..म्हणजे उद्या अश्या आयेशांना मरणाचा मार्ग पत्करावा लागणार नाही..

 

2 thoughts on “अश्या कित्येक आयेशा अजूनही जगत आहेत?”

Leave a Comment