अशिक्षित सून हवी (भाग 9)

सुधीरला जमिनीवर मंदिर बांधण्याची गोष्ट समजताच तो बिथरतो..काहीही करून त्याला जमीन बळकवायची असते.

“असं कसं ऐकणार नाही तेच बघतो मी” यावेळी तो गुंड सोबत घेऊन रावसाहेबांच्या घरी जातो.

रावसाहेबांच्या घरी समजतं की ते सकाळीच शहराकडे रवाना झाले आहेत, सुधीर पत्ता घेऊन रावसाहेबांना तिथेच गाठायचं ठरवतो..

शिखा काळजीत असते..पुरस्कार घ्यायला जायचं तर आहे, पण जाणार कसं..घरून परवानगी मिळणं कठीण आहे…

अश्यातच लहान सासूबाई मदतीला धावून येतात..काहीतरी कारण काढून शिखाला शहरात पाठवण्याची व्यवस्था करतात..

शिखा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचते…रावसाहेब एका हॉटेल वर थांबलेले असतात..शिखा स्टेजसमोरील खुर्च्यांवर जाऊन बसते…कार्यक्रमाची वेळ होते, रावसाहेब दिलेल्या वेळेत तिथे पोचतात..

गेटपासून रावसाहेबांचं स्वागत होतं.. माईकवरून सूचना येते..

“आपल्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झालेले आहे..सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा…”

सर्वजण उठून उभे राहतात, शिखाची उभी राहते..कोण आहेत पाहुणे हे बघायला ती मान वळवते…अन समोर..रावसाहेब…

शिखाचे टाळ्या वाजवणारे हात थांबतात…मोठा धक्का तिला बसतो…ती सुन्न होऊन जाते…काय करावं तिला सुचेना…तशीच ती खाली बसून घेते..

पाहुण्यांचे स्वागत, परिचय, स्वागतगीत यात काही वेळ जातो…शिखा विचार करते,

“पुरस्कार काय नंतरही घेता येईल..पण आपलं बिंग फुटलं तर? घरात मिळत असलेला आदर क्षणात नाहीसा होईल…रावसाहेबांना धक्का बसेल…विश्वासघात त्यांना सहन होणार नाही..नाही, मला इथून निघायला हवं..”

शिखा तोंड लपवत खुर्च्यातून उठते…बाहेर जायची वाट पकडते तोच समोर सुधीर आणि त्याची माणसं… त्यांच्यासमोरून गेलं तर तो आपल्याला ओळखणार, आधीच जमीनीवरून तो चिडलेला असेल…त्यात याला माझं सत्य कळलं तर रावसाहेबांचा भर सभेत अपमान करेल हा..

शिखाला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली..अखेर सुधीर ला चुकवत ती परत आत गेली आणि खुर्चीत जाऊन बसली…

अचानक तिचं नाव पुकारलं जातं..

“पत्रकारिता विशेष पुरस्कार.. सौ. शिखा इनामदार.”

रावसाहेब चमकतात..ही आपली शिखा तर नाही??

शिखा डोळे बंद करून खुर्चीतच बसलेली असते..मुद्दाम उठत नाही.. एकजण ओरडतो..

“अहो शिखा मॅडम, तुमचं नाव आलंय… या की स्टेजवर..”

शिखाला आता पर्याय नसतो..ती स्टेजवर जाते..हे सगळं काय चाललंय हे समजायला राबसाहेबांना खूप वेळ लागतो..कारण त्यांची बुद्धी काम करत नसते..

“शिखा तर चौथी नापास, मग पत्रकारिता पुरस्कार?? कसं शक्य आहे??”

स्टेजवर रावसाहेबांना काय करावं सुचत नाही, एक मुलगी त्यांच्या हातात पुरस्कार देते…शिखा त्यांचा नजरेला नजर मिळवू शकत नव्हती..रावसाहेब मात्र प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडेच बघत होते..अपराधी भावनेने ती पुरस्कार घेते…माईकवरून सूचना येते..

“काय हा योगायोग… सासऱ्यांच्या हस्ते सुनेचा सत्कार…”

सभेत टाळ्या वाजतात…राबसाहेब आता चिडतात… त्यांच्या लक्षात येतं की शिखाने आपल्याला फसवलं आहे, ती आपल्याशी खोटं बोलली आहे…त्यांचा राग चेहऱ्यावर दिसू लागतो..

सुधीर समोरून हे सगळं बघत असतो..त्याच्या सगळं लक्षात येतं…तो त्याच्या गुंडांना म्हणतो…

“आता धमकवायची काहीही गरज नाही…रावसाहेब स्वतःच अडकले आता..आणि ही शिखा, मला आठवतंय हिचं सगळं..हिला नंतर बघतो मी..”

कार्यक्रम संपन्न होतो…शिखा रावसाहेबांकडे जाते…ते तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आपल्या हॉटेलकडे रवाना होतात..

हॉटेलकडे जाताच सुधीरही त्यांचा पाठलाग करतो..त्यांना हॉटेल वर गाठतो..

“रावसाहेब…मी तुम्हाला इथे पाहिलं आणि तडक भेटायला आलो..शिखा तुमची सून का? पुरस्कार मिळाला तिला, अभिनंदन तुमचं..”

“कसलं अभिनंदन… माझ्याशी खोटं बोलली ती..मला तोंड पाहायचं नाही तिचं. ”

“रावसाहेब… लहान तोंडी मोठा घास, पण मी तिला ओळखतो…पत्रकार आहे ती…मला माहित असतं की ती तुमची सून होणार आहे तर आधीच तुम्हाला सांगितलं असतं…असो, पण या शिकलेल्या मुली म्हणजे फार राजकारणी असतात बरं का…तुमची जमीन कधी बळकवतील सांगता येत नाही… एक काम करा…मी कागदपत्रे आणली आहेत, सही करून टाका आणि तिला सुरक्षित करा…”

रावसाहेब आधीच चिडलेले असतात, त्यात सुधीर असं बोलला म्हणून कसलाही विचार न करता ते सही करून टाकतात…सुधीरचं काम फत्ते होतं…

____

कित्येक दिवस रावसाहेब घरात शांत असतात..शिखाशी तर ते अजिबात बोलत नाहीत..शिखाला त्यांचं मौन पाहवत नाही, तिला त्याचाच जास्त त्रास होतो…एकदाचं मला बोलून मोकळं झाले तर बरं होईल असं तिला झालं..असेच दिवस जात असतात..

“राबसाहेब..रावसाहेब…सुधीर काही बिल्डर ला घेऊन आलाय…आपल्या जमिनीवर टॉवर बांधायचं म्हणतोय..”

“काय??? तो तर कारखाना उभा करणार होता..शिरप्या तू चल पुढे..मी आलो..”

तिकडे गेल्यावर..

“सुधीर अरे हे काय?? तुला जेवढी जमीन दिलीये तेवढीच वापर ना…आणि टॉवर कसलं बांधतोय…कारखाना उभा करणार होता ना..”

“ही जमीन माझी आहे…मी मालक आहे याचा.. काहीही करीन मी..”

“सुधीर काय बोलतोय??”

“हें बघा…कागदपत्रे.. माझ्या मालकीची आहे जमीन..हो ना वकिलसाहेब??”

“हो, कायद्याने आता ही जमीन सुधीर यांची आहे..”

रावसाहेब चक्कर येऊन खाली कोसळतात…शिरप्या कसाबसा त्यांना घरी आणतो..घरात बातमी समजते…लहान सासूबाई पाय धरून माफी मागतात..

“सुनबाई तुझी चूक नाही, तूच उलट सांगत होतीस..की जमीन देऊ नका म्हणून..”

“पण आता काय करायचं??”

“मी वकिलांशी बोलतो..”

सुधीरने आपल्या पॉवरचा वापर करून सर्व वकिलांना धमकावलं होतं.. कुणीही रावसाहेबांची केस लढणार नाही म्हणून..रावसाहेबांचा स्वतःचा वकील सुद्धा नकार देतो…

रावसाहेबांनी तब्येत आता अजून खालावत जाते…कुणीही वकील तयार होईना..

एक दिवस दारात वकिली पोषाखात एक स्त्री येऊन उभी राहते…

“मी मदत करू शकते…तुमची ईच्छा असेल तर..”

आवाज ऐकून अरुण खोलीतून बाहेर येतो..घरातील सर्वजण डोळे विस्फारून बघत असतात.

क्रमशः

Leave a Comment