शिखा मागच्या दाराने आत जाते, घरात जेवण बनवण्याची रेलचेल चालू असते. एकीकडे सासूबाई शाल, टोपी काढून ठेवतात, आणि लहान सासूबाई जेवणाचं बघत असतात..
“आलीस? ये…”
“बाहेर कोण आलं आहे सासूबाई??”
“अगं माझा धाकटा भाऊ, सुधीर..तुमचं लग्न थोडक्यात उरकलं, तुझी ओळखच नाही झाली बघ कुणाशी…” लहान सासूबाईं सांगतात…
बिल्डर सुधीर हा सासूबाईंचा भाऊ?? हा तोच ज्याला आपण एक्सपोज केलं होतं…ज्याच्यावर खटला सुरू आहे…पण सासूबाईंचा भाऊ आहे म्हटल्यावर शिखाला गप राहणं भाग होतं…
बाहेर सासरे आणि सुधीर मध्ये बोलणं सुरू होतं,
“तुमच्या अर्ध्या जमिनीवर तुम्ही जी शेती करताय त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नाच्या चारपट जास्त उत्पन्न हा कारखाना उभा केल्यावर मिळेल..”
“आम्हाला जास्त हव्यास नाही सुधीर…जे आहे त्यात ठीक चाललंय..”
“पैशासाठी नाही हो, पण गावातल्या कितीतरी लोकांना यातून रोजगार मिळेल, आणि आपल्याला जो फायदा होईल त्याचा तुम्हाला राजकारणात उपयोग होईलच की…”
“तरी मी एकदा विचार करतो आणि सांगतो..”
“जशी आपली ईच्छा..”
सासूबाईं सासऱ्यांना आत बोलावून त्यांच्याकडे शाल टोपी देतात, यथोचित आदरसत्कार करतात…
“बरं एकदा ताईला भेटून घेतो..”
“हो, जा तिच्या खोलीत..”
सुधीर लहान सासूबाईंच्या खोलीत जातात..
“काय गं, बाहेर यायचं ना..”
“दादा तुला तर माहीत आहे ना, स्त्रियांना हॉल मध्ये यायची परवानगी नाही ते..”
“बरं बरं… मी काय सांगतो नीट ऐक… तुमची अर्धी जमीन मला हवी आहे…माझ्या नव्या प्रोजेक्ट साठी हीच जागा योग्य आहे..”
“दादा, माझं जेवढं नुकसान केलं तेवढं पुरे नाही का? का माझ्या घरावर उठला आहेस??”
“गपगुमान मी सांगतो त्यासाठी तुझ्या नवऱ्याला आणि सासऱ्याला तयार कर…नाहीतर मी सांगून देईन की तू डॉक्टर आहेस..मग तुझा संसार गेला पाण्यात..”
असं म्हणत सुधीर निघून जातो..सासूबाई खोलीत चिंता करत बसतात…शिखाने सर्व ऐकलेलं असतं… ती आत जाते..
“माफ करा पण मी सगळं ऐकलं..आई, तुमचा भाऊ असं कसं बोलू शकतो तुम्हाला??”
“लालच आणि पैसा सगळी नाती आंधळी बनवतो बघ…याच माणसामुळे मला बळजबरी लग्न करावं लागलं..”
“म्हणजे??”
“एकदा हॉस्पिटलमधून परत येत असताना आई बाबांचा अपघात झाला, ते गेले…मग भावानेच माझा सांभाळ केला…एकदा एका व्यवहारासाठी माझे जेठ, म्हणजे रावसाहेब सुधीरला भेटले..त्यांनी मला पाहिलं आणि आपल्या भावासाठी मला मागणी घातली…त्यांची अटही सांगितली की मुलीचं शिक्षण नसेल तर आम्ही मागणी घालू शकतो..दादाला हे नातं जोडून रावसाहेबांच्या शहरातल्या जमिनीवर कब्जा करायचा होता…नातेवाईक म्हणून रावसाहेबांनी विश्वासाने ती जमीन त्याला दिली…त्यांना वाटतंय की जमिनीवर सुधीर काहीतरी व्यवसाय करतोय, त्यांनी कधी भाडंही मागितलं नाही, म्हणाले की जमीन अशीच पडून राहण्यापेक्षा वापरली गेलेली बरी…पण त्याने रावसाहेबांना फसवून ती जमीन त्याच्या नावे केली.. रावसाहेबांना याची अजून कल्पनाही नाही…आणि आता तर इकडची जमीनही बळकावू पाहतोय…माझं लग्न फक्त सौदयासाठी लावलं दादाने…माझा विचारही केला नाही…”
“तुम्ही लग्नाला नाही म्हणायचं होतं..”
“मी तर अगदी नकारच दिलेला..पण त्याकाळात इतका विरोध करणं बाईच्या जातीला मान्य नव्हतं.. त्यात भावाने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याची धमकी दिली…मग शेवटी माझं शिक्षण न कळू देता सासरी नांदण्याची अट मला मान्यच करावी लागली..”
“खूप वाईट वाटलं सगळं ऐकून..”
“पण मला वाईट वाटत नाहीये, मी आज समाधानी आहे…कारण तुझे सासरे, माझे मिस्टर खूप समजूतदार निघाले…त्यांना माहितीये माझं शिक्षण..आणि मीही आहे त्या परिस्थितीत मन मारून न बसता मार्ग काढला… गावातल्या लोकांना मी “आजीबाईचा बटवा” बनून औषधं दिली…गोळ्यांचं चूर्ण करून ती देवाची भुकटी म्हणून देत गेले..माझी डॉक्टरकी वाया नाही गेली..फक्त एवढंच की शिक्षण लपवावं लागलं…”
“आई तुमच्याकडे पाहून खरच मला बळ आलं..नाहीतर मी अगदी नैराश्यात गेले असते बघा..”
“हेच तर सुख आहे मोठ्या कुटुंबाचं..आजूबाजूची माणसंच आपली प्रेरणा बनतात, आपल्याला एकटं वाटू देत नाही, आपल्यात त्याग करण्याची आणि संघर्ष करण्याची जिद्द वाढीस लागते….”
____
शिखाला सासूबाईंच्या बोलण्याने बरं वाटतं, पण सोबतच भीती वाटते, की सुधीर पुन्हा इथल्या अर्ध्या जमिनीवर कब्जा करतो की काय…सुधीर च्या प्रत्येक हालचालीवर ती नजर ठेवायची असं ठरवते…
शिखा रात्री लॅपटॉप वर काम करत असते, तिला सोशल मीडियावर एक जाहिरात दिसते…की रविवारी पोलिओ ची लस दिली जाणार आहे..
“आपल्या गावात मुलांना लस दिली जात असेल का?”
दुसऱ्या दिवशी ती गावात चौकशी करते..गावात लसीकरणाचा मागमूसही नव्हता..गाव बरंच लांब असल्याने सरकारी दवाखान्यात नेऊनच लस द्यावी लागे.. सरकारी डॉक्टरांनी तिथे येऊन लस देण्याचा प्रयत्न करत होते पण गावातली लोकं “आमच्या मुलांना काहीही होत नाही” म्हणत त्यांना सहकार्य करत नसत..मग डॉक्टरांनीही येणं थांबवलं..
शिखाने लहान सासूबाईंना मेसेज केला..
“जाग्या आहात का??”
“होय, काय म्हणते..”
“गच्चीत या, बोलायचं आहे..”
दोघींमध्ये दीर्घकाळ चर्चा होते…
दुसऱ्या दिवशी लहान सासूबाई एक मोठी पूजा रचतात..घरात सर्वजण विचारतात..
“ही एक महापूजा आहे…सासूबाईंनी गावातल्या लहान मुलांना भगवान शंकराचं कवच मिळावं आणि गावाला सुरक्षा मिळावी म्हणून ही पूजा मांडली आहे..”
घरात तर कौतुक झालंच पण गावात एकच बातमी पसरली…
“रावसाहेबांची सून मांत्रिक आहे आणि तिच्याकडे देवाचं कवच आहे…मुलांना तीर्थ आणि त्रिशूलाचं टोचन त्या देणार आहेत…”
घराबाहेर एकच गर्दी झाली, महिला आपल्या मुलांना घेऊन हजर झाल्या..
शिखा आणि सासूबाईंनी आधीच सगळी तयारी केली होती…देवांचे फोटो, मध्यभागी मोठा यज्ञ, मोठमोठ्या समया, फुलं… पूजेचं वातावरण निर्माण झालेलं…
सासूबाई आलेल्या महिलांना एकेक कागद देत होत्या…वर लिहिलं होतं..
“महामृत्युंजय यज्ञ…दिव्य कवच..”
आणि खाली
“1 ते 12 महिने”
“12 ते 36 महिने..”
“36 ते 56 महिने..”
“हे बघा…हे एक दिव्य कवच आहे…आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचं, आणि दिलेल्या तारखेला तीर्थ घ्यायला यायचं…सोबत हे दिव्य पत्र घेऊन यायचं..”
महिला मुलांना तीर्थ घ्यायला यायला लागल्या..इंजेक्शन ला शिखाने असं काही सजवलं होतं की बाहेरून त्रिशूलाच्या आकाराच्या कव्हरने ते झाकून टाकलं होतं…
“ह्या त्रिशूलात भगवान शंकराने प्राशन केलेल्या अमृताचा अंश आहे..मुलांना याचं टोचन द्यावं लागेल, थोडी रडतील पण कवच प्राप्त होईल..”
महिला एका पायावर तयार झाल्या…मुलांना वेळोवेळी घेऊन यायला लागक्या..
क्रमशः
अप्रतिम आहे
७ व्या भागाची लिंक ओपन च होत नाहीये
This comment has been removed by the author.