लहान सासूबाईंच्या वागण्याने शिखा जरा धास्तावली, पण त्या असं का वागल्या? त्यांना माहीत होतं का मी जे करतेय ते??
एक ना अनेक प्रश्न शिखा च्या मनात उठले, पण नंतर सासूबाईंनीही तिला काही विचारलं नाही आणि तिनेही काही सांगितलं नाही, दोघींनीही मौन बाळगणं पसंद केलं..
शिखा च्या सासऱ्यांनी आता जमिनीचे व्यवहार हाती घेतले होते…त्यांनी बरीच मोठी शेती पाहिली अन माणसं लावून मार्गाला लावली, शेतातून चांगलं उत्पन्न येत होतं, त्यांना काही काम शिल्लक नव्हतं… जमीन बरीच असल्याने त्यांच्याकडे ग्राहक येत असत, सासरे तसं जमीन विकायच्या विचारात नव्हते पण काही दिवसांपासून त्यांना अनेक आमिष दाखवण्यात येत होती…सासऱ्यांच्या त्याच बैठका चालू असायच्या…
शिखाची आता किचन मध्ये एन्ट्री झाली होती…सुरवातीला कणिक मळणं, भाजी चिरून देणं अशी कामं ती करत असे…
काम करता करता सासूबाई विचारतात…
“काय गं… तुला तर सगळंच येत असणार…”
“हो …म्हणजे येतं बऱ्यापैकी..”
“म्हणूनच आम्ही अशिक्षित मुलगी बघतो नेहमी..”
“असं का?”
“अगं ज्या मुली शिकलेल्या असतात ना त्यांना काही येत नाही बघ…त्यांना फक्त नोकरी, पैसा दिसतो…घर, संसार, मूल यांकडे त्या अजिबात लक्ष देत नाही…आता हेच बघ ना, तू जर शिकलेली असतीस तर अशी खाली बसून डोक्यावर पदर घेऊन भाजी चिरली असतीस का?”
शिखाला हसू आलं, ती म्हणाली,
“अहो असं काही नाही, शिकलेल्या मुलींनाही येतं सगळं..”
“अनुभवाचे बोल आहेत बाई…अरुण ने अशीच बायको आणली होती…महिन्याभरात ती घर सोडून गेली..”
“अरुण?”
“तुझ्या दोन नंबरच्या सासूचा मुलगा…माझा पुतण्या..त्याने वकील मुलगी केली…आम्ही म्हटलं होतं, लग्नानंतर वकिली सोडून द्यायची…पण तिला मात्र नवऱ्यापेक्षा वकिली प्रिय…सोडलं तिने घर..”
शिखाला तिचं फार वाईट वाटलं..आपलंही तसच तर नाही ना होणार? जाऊद्या, थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे…
“बरं ऐक, संध्याकाळी तुझ्या सासऱ्यांची एक बैठक आहे…10 माणसं असतील, जेवण करूनच जाणार आहेत…आणि स्वयंपाक आपल्या दोघींनाच बनवायचा आहे…बाकीच्या बायका सगळ्या एका सोहळ्याला जाणार आहेत…तेव्हा आपण घरात असू…”
“बरं.. काय काय बनवायचं आहे?”
“खीर, पुऱ्या, उसळ, भात, शिरा, कोशिंबीर, सुकी भाजी…अजून जे आठवेल ते..”
“चालेल, मी बनवेंन..”
“एकटी कशी करशील, संध्याकाळी लवकर कामाला लागू…म्हणजे वेळेत सगळं होईल..बरं आता मी जरा पडते, तू इथलं जरा आवरून तुही पडून घे..”
“चालेल..”
शिखा संध्याकाळी पुन्हा किचन मध्ये येते..घडाळ्यात साडे 6 वाजलेले असतात..सासूबाईं म्हणतात…
“मी लसूण सोलून ठेवते, बाकीचं करूया एकेक…होऊन जाईल साडेआठ पर्यन्त..”
इतक्यात सासरे येतात..
“झालं का तयार सगळं? पाहुणे आलेत…अर्ध्या तासात बसतील जेवायला..”
“अर्ध्या तासात??”
“हो..त्यांना परत जायचं आहे लवकर..आटपा लवकर..”
सासूबाईंना घाम फुटला, अर्ध्या तासात कसं होणार सगळं?? त्यांना आधीच bp चा त्रास होता…त्यांची धडधड वाढली आणि चक्कर येऊन त्यांनी बसून घेतलं…
“सासूबाई तुम्ही खोलीत जा…मी बघते सगळं..”
“वेडी आहेस का, अर्ध्या तासात सगळं..”
“माझ्यावर विश्वास ठेवा…तुम्ही जा..”
सासूबाईंना ती ढकलतच खोलीत नेते…सासूबाई जरा पडतात, अर्ध्या तासाने पुन्हा त्या किचन मध्ये येतात अन पाहते तर काय, शिखा तिथे नसते…
सासूबाईं सासऱ्यांना कळवायला जातात अन तिकडे दिसतं… शिखा दहा पाहुण्यांच्या पंगती उठवत असते…शेजारी मोठ्या कढायांमध्ये भात, उसळ, शिरा, कोशिंबीर, बटाट्याची सुकी भाजी, पुऱ्या, खीर तयार असते…खमंग वास दरवळत असतो…”
“स्वयंपाक छान झालाय हो सुनबाई..आज एकदम भावना ची आठवण झाली” सासरे तृप्त होऊन बोलतात…
“तिचं नाव कशाला घेताय भरल्या ताटावर..”
भावना कोण हा प्रश्न तिला पडतो…पण शिखा कौतुक ऐकून सुखावते…सगळ्यांचं आटोपून झालं अन सासूबाईं तिला बाजूला नेतात आणि विचारतात…कसं केलं सगळं अर्ध्या तासात..?
“सासूबाईं…दुपारी तुम्ही झोपायला गेलात तेव्हा मी सासऱ्यांना विचारून घेतलं, की पाहुणे कधी येणार…त्यांनी सांगितलं की पाहुणे 6 वाजताच येतील कोल्हापुरहुन…मला माहित होतं की कोल्हापूर ला परत जाणारी बस संध्याकाळी आठ वाजता असते, मग त्या आधी त्यांना जेवण घालून पोचतं करावं लागेल..मी तुम्हाला त्रास न देता दुपारीच सगळी तयारी केली…खिरीसाठी तांदूळ धुवून शिजवून ठेवले… वेलदोडे आणि सुका मेवा बारीक करून ठेवला, कणकेचं पीठ मळून ठेवलं, कोशिंबीर करून फ्रीज मध्ये ठेवली, बटाटे उकडून ठेवले, उसळ शिजवून ठेवली, मसाला तयार करून ठेवला… आणि मग पाहुणे आल्यावर फक्त गरमा गरम फोडणी दिली..”
सासूबाईं आ वासून बघतच राहिल्या…घरात सोहळा पार पाडून बाकीच्या बायका घरी आल्या अन सासूबाईंनी तासभर सूनेचं कौतुक केलं..
“शिकलेल्या मुलीची दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य वाया जात नाही..” लहान सासूबाईं म्हणाल्या..
“शिकलेल्या??” सर्वजणी त्यांच्याकडे बघू लागल्या…
“म्हणजे…संसारपाणी शिकलेल्या…घरकाम शिकलेल्या..”
सासूबाईंनी सारवासारव केली…
शिखा खुश होती, तिचं आज तोंडभरून कौतुक चाललेलं… पण तिला अचानक त्या अरुण च्या बायकोची आठवण आली… केवळ शिकलेली असल्याने तिच्यावर असा शिक्का बसलेला…तीच ती भावना…साहिलने तिला सांगितलं…
“ती फक्त शिकलेली होती म्हणून तिला बाहेर काढलं का रे?”
“घरात काय झालेलं मलाही ठाऊक नाही, मी नव्हतोच इथे..फक्त एवढं माहितीये की दादा ने दुसऱ्या लग्नाला नकार दिला…आता एकटं जगतोय..नशेच्या आहारी गेला तो..”
शिखाला ते ऐकून वाईट वाटतं..
शिखाने काही महिन्यांची रजा घेतली होती पण तिला अचानक फोन सुरू झाले..
“मॅडम, सुधीर प्रकरणावर बातमी द्यायची आहे…तुम्ही कधी येणार?? मॅडम सुधीर यांना जमीन मिळेल का? ते दोषी आहेत का?? काय लिहायचं??”
शिखाने त्या प्रकरणातुन हात काढून घेतला, कारण तिला काही केल्या ते जमणार नव्हतं..तिने दुसऱ्या पत्रकाराला ते काम द्यायला सांगितलं..पण शिखा मधली पत्रकार तिला काही केल्या शांत बसू देईना..
“साहिल…तुझ्याकडे लॅपटॉप आहे ना??”
“हो..वापरत नाहीये सध्या..का गं?”
“मला हवाय, इथून काम करू म्हटलं..”
“वेडी आहेस का, कुणाला समजलं तर?”
“कुणाला समजणार आहे..मी बंद खोलीत सगळं काम पाहीन..”
“बघ बाई, तुझ्या जबाबदारी वर..”
क्रमशः
Khup Chan Ahe shikha
Khup interesting aahe…… waiting for next part