अशिक्षित सून हवी (भाग 3)

साहिलने शिखाला विचारलं..

“मग…घरात रुळली आहेस तर..”

“काही पर्यायच नाहीये ना आता…बरं इथून लवकर कसं निघता येईल ते बघ, मी जास्त दिवस अशी नाही राहू शकत..”

“हो हो, मी करतो काहितरी… तू काळजी करू नकोस..”

रात्री शिखाला अचानक थंडी वाजायला लागली, अंगात ताप भरला…लहाण्या सासूबाईंना समजलं तश्या त्या आत आल्या…

“काय गं… जास्त त्रास होतोय का..”

“थंडी वाजतेय खूप..”

सासूबाईंनी अंगाला हात लावून पाहिला, तिच्या हाताची नाडी बघितली..शिखा मनातल्या मनात हसली..

“असं बघताय जसं स्वतः डॉक्टर आहेत..”

“ऐक… मी तुला एक काढा देते, तो घे म्हणजे बरं वाटेल..”

सासूबाईं जरी अडाणी असल्या तरी त्यांची भाषा इतरांपेक्षा चांगली होती, शुद्ध होती…आई सर्वात लहान सासूबाई असल्याने त्यांचं वयही फार नव्हतं.. त्यांचा मुलगा आत्ताशी 12 सुटला होता…आणि मुलगी मामा कडे राहत होती..घरातली बाकीची मंडळीही आली. त्यांनी आपुलकीने विचारपूस केली…

“आराम करून घे, लग्नात फार दगदग झाली ना तुझी, तुझ्या लहाण्या सासूबाईं बघ तुला आत्ता बरं करतील…आजीबाईचा बटवा असतो त्यांच्याकडे..घरात कोणी आजारी पडलं की डॉक्टर ची सुद्धा गरज पडत नाही बघ..”

शिखा ला आश्चर्य वाटलं…

त्यांनी एक काढा आणून दिला…पांढऱ्या रंगाचा.. खूप कडू होता पण शिखाने पिऊन टाकला. रात्री तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी शिखा एकदम ठणठणीत बरी होते…साहिल विचारतो..

“कसं वाटतंय तुला?”

“एकदम छान.. तापही नाही बघ आता..”

“माझी काकू फार हुशार आहे बरं या बाबतीत..तिने काढा दिला की लगेच बरा होतो माणूस.बरं ते जाऊदे, तुझी माझ्या एका आजीशी भेट घालतो..”

“आजी?”

“हो…माझ्या आजीची सख्खी बहीण…तिला आता कुणीच उरलं नाही , इथेच राहते ती…”

“दिसल्या का नाही मग त्या मला?”

“अगं डोळे अधू झालेत त्यांचे..पण सगळा जीव घरात…घरात काय चाललंय याचा सगळा आलेख एकाला जाऊन त्यांना सांगावा लागतो…”

साहिल शिखा ला एका खोलीत घेऊन जातो, तिथे काशी आजी डोळ्यावर काळा गॉगल लावून बसलेली असते आणि स्वतःशीच बरळत असते..

“सूनबाईची पूजा केली का रे…काय चालू आहे तिकडे कुणी सांगेल का..”

साहिलची आईही तिथे येते..

“सासूबाईं, सगळं नीट पार पडलं आहे काळजी करू नका..”

पण तेवढ्यावर आजीचं समाधान कुठे…मग शिखा सांगायला सुरुवात करते…

“आजी, मी तुमची सून, शिखा…”

आजी हातवारे करून तिला जवळ बोलवतात, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात…शिखाला पत्रकारितेचा अनुभव असतो, त्यामुळे तिला घडलेली घटना इथंभूत सांगणं चांगलं जमायचं… आजीला काय हवं आहे हे ओळखून ती सुरवात करते…

“आजी…लग्नाच्या दिवशी, सकाळी सर्वांची गडबड सुरू होती…माझ्या चारही सासवा हिरव्या रंगांची साडी घालून तयार झाल्या होत्या…सासरे पाहुण्यांचे स्वागत करत होते…अगदी दुरून माणसं आलेली, तुमची विचारपूस करत होती…मग मुहूर्ताची वेळ झाली, मी लाल रंगांची साडी नेसून मंडपात आले…तुम्ही घेतलेले सर्व दागिने, मोत्यांची माळ, ठुशी, सोन्याचे कंगण घालून आलेले…मग भटजींनी मंगलाष्टक सुरू केलं, लग्न सुखरूप पार पडलं…सर्वांनी पोटभर जेवण केलं..”

आजीच्या चेहऱ्यावर एक हसू होतं, तिला खुप समाधान मिळालेलं… घरी कुणी इतकं सविस्तर तिला सांगत नसे..

“किती छान सांगितलंस गं तू, सगळं लग्न डोळ्यासमोर उभं राहिलं बघ, मला आता तूच सगळं सांगत जा…बाकीची लोकं काही नीट सांगत नाही..”

शिखाने तिच्या पत्रकारितेच्या अनुभवाने आजीचं मन जिंकलं….

आजी पुढे सांगू लागली,

“आता घरात ग्रामदेवतेची पूजा घालावी लागेल…घरात एखादं कार्य पार पडलं की ही पूजा करावीच लागते आपल्या घरात…”

सासूबाई म्हणाल्या,

“यावेळेस ही पूजा काही होणार नाही असं दिसतंय..”

“का?”

“गावातले आपले जुने भटजी, वयोमानाने अंथरुणाला खिळून आहेत…त्यांच्यानंतर कुणीही नाही पूजा करायला..आणि आपल्या परंपरेनुसार पूजा फक्त त्यांना माहितीये..”

हे ऐकताच आजीचा चेहरा पडला…ग्रामदेवतेची पूजा आजीसाठी खूप महत्त्वाची होती, कारण ग्रामदेवतेला आजी फार मानत असे…त्यांचा चेहरा पाहून शिखाने त्यांना हमी दिली की ही पूजा होणार…मी करेन..

“अगं पण त्याला फार सोपस्कार असतात, तुला नाही माहिती ते..”

शिखा साहिल ला घेऊन भटजींकडे जाते…ते आजारी असतात,

“यावेळी तुमची पूजा मला जमणार नाही याचं वाईट वाटतंय..”

“गुरुजी, ही पूजा मी केली तर चालेल??”

“तू?”

“हो…मी..”

“देवाला भाव महत्वाचा फक्त…पण ही पूजा कडक असते..सगळे सोपस्कार आणि मंत्र योग्य उच्चारले गेले पाहिजे..”

“तुम्ही एक काम करा… जी पूजा आहे त्याचं सगळं मला तोंडी सांगा..मी रेकॉर्ड करून घेईल..”

गुरुजी तयार होतात…शिखा सगळं रेकॉर्डिंग करते..घरात बातमी पसरते..शिखा यावेळी पूजा करणार म्हणून..

“शिखा तुला कशी बरी येईल ही पूजा??”

“अहो शिखा धार्मिक दिसतेय, शिक्षण केलं नाही तिने…पण बाईच्या जातीला माहीत असलेल्या बाकीच्या गोष्टी शिकली ना ती..”

पूजेच्या दिवशी शिखा ने रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये सुरू केलं, हेडफोन कानाला लावले अन ते दिसू नये म्हणून दोन्ही केस कानावर मोकळे सोडले..गुरुजींचं जसं ऐकू येत होतं तसं ती सांगत होती..

“आता कुंकू लावा…अक्षता टाका..मंत्र म्हणा, ओम श्री कार्तविर्यर्जुन राजा…आता फुल वाहा…आता गोमूत्र चारही दिशांना शिंपडा..”

घरातले सगळे बघतच बसले…गुरूजी करायचे तशी तंतोतंत पूजा शिखा करत होती…पूजा आटोपली, काशीआजी भरून पावली, तिने वर बघून देवाला नमस्कार करत सुस्कारा टाकला…आणि घरात शिखा चं नुसतं कौतुक…पूजा करून शिखा उठली, शेवटचे काही सोपस्कार बाकी होते…तिने अनावधानाने कानापुढचे केस मागे केले…लहान सासूबाई पुढे आल्या आणि त्यांनी पटकन शिखाच्या कानामागचे केस काढून कानावर टाकले..

शिखा गोंधळली… सासूबाईंना माहीत होतं सगळं? मला का वाचवलं त्यांनी??

क्रमशः

3 thoughts on “अशिक्षित सून हवी (भाग 3)”

Leave a Comment