लग्नाच्या पहिल्याच दिवशी शिखा आणि साहिल मध्ये जोरदार भांडण झालं…साहिल रोमँटिक मूड मध्ये खोलीत घुसताच शिखा हातात येईल ती वस्तू साहिलवर फेकून मारू लागली…
“फसवलं मला…तुला लाज कशी वाटली नाही…मी चौथी पास काय….”
शिखा चे डोळे लाल झालेले असतात, अंगात राक्षस संचारलेला असतो…अश्या अवस्थेत ती काय करेल काही सांगता येत नव्हतं..
साहिलला लक्षात आलं की हिला सत्य समजलं…तो घाबरला…पण आता विचारपूर्वक पुढचा निर्णय घ्यायचा होता…त्याने जे केलं होतं ते चुकीचंच होतं पण शिखा वरच्या आत्यंतिक प्रेमामुळे त्याला खोटं बोलावं लागलं होतं…
“तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे…तुला वाटत असेल तर मी आत्ताच्या आत्ता घरी सगळं सांगतो…तुला नसेल संसार करायचा तर घटस्फोट घेऊ आपण…बोल, काय करायचं??”
त्याच्या बोलण्यात कबुली होतीच पण काहीतरी उदात्त तिला दिसत होतं…ती थोडी शांत झाली..
“अरे साहिल का असं वागलास तू? तुझ्या घरी शिकलेली मुलगी नको होती तर का माझ्याशी लग्न केलंस तू?? आता मी कायम असंच राहायचं का त्यांच्यासमोर??”
“शिखा…तू माझ्यासाठी जीव की प्राण आहेस, तुझ्याशिवाय जगणं मला शक्य नाही…तुला सत्य समजलं असतं तर तू मला कधीच मिळाली नसती…आणि फक्त माझ्या स्वार्थामुळे मी तुला फसवलं असं नाही…मी तुला फक्त काही महिने इथे ठेवेन…नंतर आपण मुंबईला परत जाऊन आपापलं काम सुरू करणार आहोत…मी तुला आधीही सांगितलं होतं..”
शिखा विचार करू लागली, पण पुन्हा तिचा संताप उफाळून आला..
“म्हणून मी काय चौथी पास म्हणून शिक्का मिरवायचा का??”
“नाही..”
“नाही काय नाही..”
“चौथी…. ना पास…”
“चौथी तर चौथी… वर तीही नापास??”
थोडा वेळ दोघेही एकमेकांकडे पाहून मौन ठेवतात आणि अचानक दोघांना एकदम हसू फुटतं…
शिखा मान्य तर करते, पण जेवढे दिवस तिला सासरी राहावं लागणार होतं तेवढे दिवस मी काय करू इथे असा प्रश्न तिला पडला..
सासरी तिचा दुसरा दिवस…सकाळी लवकर उठून तिने आवरलं… सर्वजण साड्या नेसतात म्हणून आवडत नसतानाही तिने साडीच नेसली… साहिल अजून लोळत पडला होता….एकंदरीत त्या वातावरणातही तिच्यातली पत्रकार तिला शांत बसू देत नव्हती…
“लग्न…बदल फक्त एका व्यक्तीचा??”
असा अग्रलेख तिच्या मनात घोळू लागला. इतक्यात लहान सासूबाई तिला बोलवायला आल्या..
“शिखा…बाहेर पाहुणे आलेत…नवीन सुनेला पाहायला… ये बरं..”
शिखा खाली गेली, लहान सासूबाई तिच्या मागेच होत्या…तिचा पदर उचलून त्यांनी मागूनच डोक्यावर टाकला..
“या सुनबाई… हे बघा, हे आपल्या गावचे सरपंच..”
शिखाला समजत नव्हतं कशी प्रतिक्रिया द्यावी, मागून लहान सासूबाईंनी तिला धक्का दिला तसा तिच्या हातातला मोबाईल खाली पडला…ती खाली वाकली ती पाहुण्यांच्या पायजवळच..
“अखंड सौभाग्यवती भव..”
वरून आवाज आला…
“आईंग…यांना काय झालं..” शिखा मनाशीच..
“अय्यो… यांना वाटलं पाय पडल्या…असुदेत…पायालाही हात लावून घेऊ..”
कुणी पाहुणे आले की असं पाय पडून घ्यायचं, म्हणजे लवकर सुटका होते हे तिला समजलं…
साहिलला जाग येते…शेजारी शिखा नाही हे बघताच त्याच्या मनात काहूर उठतं… काल झालेल्या गोष्टीने शिखाने काही टोकाचं पाऊल तर उचललं नसेल ना??
तो उठतो आणि खाली धावत जातो…त्याला जिन्यातूनच शिखा चं साडीतलं सुंदर रूप दिसतं… आपलं प्रेम आपल्याच जिवाभावाच्या लोकांमध्ये, त्यांच्या घोळक्यात मिळून मिसळून वावरत असताना पुरुषी मनात काय आनंदाच्या लहरी उठतात हे स्त्रीमन कधीच समजू शकणार नाही…
साहिल ला बरं वाटतं, तोही आवरून तयार होतो…
शिखा च्या अवती भवती तिच्या चार सासवा, दोन नणंदबाई असतात…सगळे पाहुणे गेल्यावर लहाण्या सासूबाई तिला नीट समजावतात…
“हे बघ, आपला गोतावळा खूप मोठा आहे…सतत पाहुणे येत जात असतात..आता त्यांच्या चहा पाण्याचं तुलाच पाहावं लागेल…ते झालं की स्वयंपाक… तसं आम्ही राहूच तुला मदतीला…आपल्या घरात सगळ्या सोयी आहेत…तुझ्या खोलीत स्वतंत्र वॉशिंग मशीन पासून tv आहे….फक्त विचारल्याशिवाय हॉल मध्ये जायचं नाही…”
“का??”
“इथे स्त्रियांना हॉल मध्ये जायची परवानगी नाही…तुझे सासरे मोठे व्यापारी आहेत…त्यांच्या बैठका होत असतात तिथे..”
हे सगळं ऐकून शिखा ला गरगरायला लागलं…पण जाऊद्या, काही महिन्यांचा प्रश्न आहे…अशी समजूत ती सतत स्वतःला घालत होती..
दुपारी तिने मशीन मध्ये कपडे धुतले… बाहेर ढगाळ वातावरण होतं… बंगल्याच्या टेरेस मध्ये सर्वत्र दोऱ्या बांधल्या होत्या…इतक्या साऱ्या माणसांचे कपडे त्यावर वाळत होते…तिने तिचे कपडे वाळत घातले आणि ती खोलीत आली…
मोबाईलवर तिला एक नोटिफिकेशन आलं..
“Expecting rain around 3 pm today..”
घड्याळात 1 वाजलेला… तिने अडीच वाजताच आपले कपडे दोरीवरून काढून घेतले…नंतर तिला वाटलं हे बाकीचेही कपडे ओले होतील… म्हणून तिने सगळेच कपडे काढले आणि खोलीत आणून घड्या घालत बसली…
3 च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला आणि सगळ्या स्त्रियां दोरीवरून कपडे काढायला धावत वर आल्या…पाहिलं तर सगळे कपडे गायब??
एकच गोंधळ उडाला असताना शिखा हातात कपड्यांचे घडी घातलेले ढीग घेऊन समोर आली…
घरात शिखा च्या “संसारी” वृत्ती चं एकच कौतुक झालं…
“काय हुशार आहे हो पोरगी, नुसतं आभाळ पाहून तिला लक्षात आलं पाऊस येणार आहे ते…याला म्हणतात खरी संसारी बाई…नाहीतर तुम्ही, कपडे अर्धे ओले होऊन जातात अन मग धावतात..” आजेसासु बाकीच्या सुनांना दरडावत सांगतात…
शिखाला आयतं कौतुक मिळालं, तिला हसू आवरेना..
तिच्या मनात विचार आला, की संसार करताना शिक्षण कसं उपयोगी येतं याची जाणीव घरच्यांना करून दिली तर???
क्रमशः