अनंतातली भेट

 “हो इथेच, याच नदीकिनारी एकमेकाच्या प्रेमाची कबुली दिली होती आम्ही…तिकडे त्या बाकावर बसून कितीतरी वेळ भविष्याची स्वप्न रंगवत असायचो…त्या कोपऱ्याला एका झोपडीत मुन्ना राहत होता..आमच्या प्रेमाचा तो एकमेव साक्षीदार होता…”

त्याची पाऊलं आज आपोआप त्या ठिकाणी वळली होती… आयुष्याचा सोनेरी आणि मोहरलेला काळ होता तो…6 वर्ष सरले…या सहा वर्षात आयुष्याने खूप मोठा पल्ला गाठला होता..पण मन मात्र तिथेच थिजलं होतं.. ज्या वळणावर मी आणि रश्मी वेगळे झालो होतो, आयुष्य तिथेच थांबलं होतं… पुढे गेलं होतं फक्त शरीर आणि हे भौतिक जग…मन मात्र अजूनही त्याच वळणावर घुटमळत होतं…. या सहा वर्षात एकही दिवस गेला नाही की तिची आठवण झाली नाही… आज जेव्हा परिजातकाची फुलं दिसली तेव्हा सगळं सोडून मन इथे धावलं…

तो न्याहाळत होता..प्रत्येक जागा…नदीकिनारची प्रत्येक वस्तू…प्रत्येक झाड…सगळं अगदीं तसंच होतं… पण तेव्हा हे सगळं आनंदावर आरूढ होऊन नाचत असायचं…आज मात्र ती प्रत्येक गोष्ट मला अनोळखी नजरेने पाहत होती…पण काहीतरी सांगत होती, एक गूढ संदेश…एक दबलेलं सत्य….त्यातली काही विचारत होती…”आत्ता आलास? सगळं संपल्यावर?” तेव्हा मात्र त्यांचा नजरेला नजर मिळवता आली नाही…

इतक्यात मागून आवाज आला..

“अविनाश..”

मागे वळून बघितलं…ती रश्मी होती…

त्या वळणावर थिजलेल्या मनात पुन्हा एक चैतन्य आलं…नदीकिनारच्या प्रत्येक गोष्टीने मला पुन्हा एकदा दत्तक घेतलं…झाडांची पानं सळसळू लागली, नदीचा प्रवाह एक गाणे गाऊ लागला…आणि रश्मी? ती अगदी तशीच होती…पांढऱ्या पंजाबी सूट मध्ये, तिचे मोकळे सोडलेले रेशमी केस वाऱ्यावर उडत होते…नजरेत आजही तेच प्रेम… तीच उत्कटता… 

“रश्मी…कुठे होतीस..” त्याचा डोळ्यातला धारांनी नदीचा किनारही थरथरला…

“मी इथेच होते, आणि इथेच असते…कायमची…त्या दिवसापासून मन इथेच घुटमळतंय…तुझी वाट बघत असते..अगदी रोज…रोज इथे येते…या वृक्षवल्लींना विचारते, या नदीला विचारते…तू आला होतास का म्हणून…”

“मला एक फोन तरी करायचास…का हे इतकं सगळं?”

“या भौतिक जगात काही मर्यादा आल्या आहेत मला…माझा वावर आता फक्त या दुनियेत..जिथे तुझ्या आणि माझ्या प्रीतीला बहर आला होता…जिथे आयुष्याची रंगीत स्वप्न बघितली होती आणि जिथे….जिथे आपण वेगळे झालो…”

“का हे इतकं सगळं? रश्मी अगं आजही माझ्यावर प्रेम करतेस…मग का त्या दिवशी अचानक नाकारलंस मला? तूच तोडलं होतं ना आपलं नातं? माझा विचारही केला नव्हतास… मग का हे सगळं?”

“आपलं एकत्र येणं, प्रीत निभावणं आणि विरहाशी संग करणं गरजेचं होतं..तुझ्यासाठी माझं तुझ्यापासून दूर जाणं गरजेचं होतं…मला कुठेतरी थांबायचं होतं, पण तुला मात्र पुढे जायला भाग पाडणं गरजेचं होतं..”

“का गरजेचं होतं? आजही आपण एकमेकांवर प्रेम करतो…मग पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगुया ना…पुन्हा एकदा या काळावर आपल्या प्रेमाची साक्ष नोंदवूया…या सहा वर्षात माझ्यातला मी हरवलो होतो, जगाला दिसत होतं ते फक्त अविनाश चं शरीर, मन मात्र रश्मी च्या हृदयात अडकलं होतं…”

रश्मी हसली, हसताना डोळे चिंब भिजलेले होते…

“रश्मी बोल काहीतरी…हे बघ तुला प्राजक्ताची फुलं आवडतात ना?

हे बघ तिथून आणतो मी, आणि पुन्हा एकदा प्रेमाची कबुली देतो, अगदी सहा वर्षांपूर्वी दिली होती तशीच…” अविनाश धावत पारिजातकाच्या झाडाजवळ जातो, ओंजळभर फुलं हातात घेतो आणि जागेवर येतो…,पण….रश्मी??

“रश्मी…रश्मी?? कुठे आहेस? चेष्टा करू नकोस हा माझी…आता पुन्हा तुला गमवायला मी समर्थ नाही..समोर ये…”

“अविनाश?? तू??” मागून एका मुलाचा आवाज येतो…

“मुन्ना?” त्यांच्या प्रेमाची एकमेव साक्ष असणारा मुन्ना तिथे आला…वयानुसार अंगापिंडाने भरला होता..त्याचा आवाजही भरला होता…पण त्याला पुन्हा एकदा पाहून मन भरून आलं होतं…

“दादा, कुठे होतास? किती मोठा झालास रे…या मुन्ना ला विसरलास?”

“मुन्ना तुला कसा विसरेल रे…या एकांतात आमच्या दोघांत तूच एक साक्षीदार होतास…तुझ्या घरासमोरुनच आमची पावलं इथे यायची, आणि तू आमच्या प्रत्येक भेटी मोजायचास…”

“दादा, सगळं अगदी डोळ्यासमोर आहे अजूनही, रश्मी ताई ला वाट पहायला लावायचास, आणि मग ती देईल ती शिक्षा स्वीकारायचास…मी गमतीने तुझा कोंबडा झालेला पहायचो….पण…खूप वाईट झालं…तू कसा सावरशील याची रुखरुख मला लागून होती…”

“पण आज ती परत आलीये, आत्ता बोलत होती माझ्याशी…अचानक कुठे गेली काय माहीत…”

“रश्मी कशी येईल दादा परत?? ती तर 6 वर्षांपूर्वीच अनंतात विलीन झाली ना?” 

“काहीही बोलू नकोस…”

“दादा, सावर स्वतःला…. तिच्या असाध्य रोगाची माहिती तिला जेव्हा झाली तेव्हा तिने हे सगळं थांबवायचा निर्णय घेतला, तिने तुला नाकारलं…तू रागावून किती दिवस इथे येत नव्हतास, मग शेवटी मी ताईला भेटलो तेव्हा तिने सगळं सांगितलं..तू तिच्या आजारापायी तुझं आयुष्य बरबाद व्हायला नको म्हणून तुला नाकारणं तिला भाग होतं…कितीतरी दिवस ती इथे यायची, एकटीच…तुमचे ते मंतरलेले क्षण पुन्हा अनुभवायची, जणू काही तिला तेवढेच काय ते क्षण सोबत न्यायचे होते…वेळ कमी होता तिच्याकडे…तेव्हा या झाडांशी आणि या नदीशीच बोलायची….म्हणायची…”मी नश्वर आहे, पण तुम्ही तर शाश्वत आहात ना?” तुझ्या पर्यन्त द्यायचा एकेक संदेश तिने या नदीकिनारी नोंदवून ठेवला… जेव्हाही तू परत येशील तेव्हा ते तुझ्या पर्यंत ते पोहोचावे म्हणून…कदाचित तेच तू आता ऐकले असशील, रश्मी च्या रुपात…कारण ती इथल्या कणाकणात भरून राहिली आहे, तिचं मन इथल्या प्रत्येक गोष्टीत भरून राहीलं आहे…” भरल्या डोळ्यांनी मुन्ना प्रत्येक सत्य उघडकीस आणतो…

“तू चल इथून, माझ्या झोपडीत चल…चहा घेऊ दोघे…”

“तू पुढे हो मी आलोच….”

मुन्ना वाफाळता चहा घेऊन आला, पण अविनाश अजूनही आला नव्हता…मुन्ना ने तडक नदीपाशी धाव घेतली…अविनाश ने स्वतःला झोकून दिले होते, त्या नदीच्या गर्भात…आता दोघेही पून्हा एकदा भेटणार होते, त्या अनंतात….

Leave a Comment