मवाली सून (भाग 1)

सकाळी १० ची वेळ. मुंबईतील शिंदे चाळ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती.

“मी पहिले नंबर लावलेला… तू कुठून आली गं सटवी …”

“ए भवाने.. सटवी कोणाला म्हणतेस गं ?? तू सटवी तुझं खानदान सटवं … “

“सासूबाई .. या बर झालं आलात… ही तुम्हाला सटवी म्हणतेय… “

रोजच्या प्रमाणे पाणी भरायला भांडणं चालू होती… सर्वांना सवयच झालेली एव्हाना…

इतक्यात एक रिक्षा चाळीच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबते आणि आबा मामा खाली उतरतात… डोळ्यावरचा चष्मा अजून डोळ्यांवर ढकलून चाळीकडे असं पाहतात जणू आयफेल टॉवरच बघताय …



“साहेब… ७० रुपये …”

“सत्तर रुपये?? अरे वेड लागलाय का ? २ पावलावर रिक्षा चालवत आलास फक्त .. “

“एक काम करतो , तुम्हाला परत तिथे सोडतो.. मग या दोन पावलं टाकत… “

“हे घे बाबा तुझे सत्तर रुपये… कलियुग रे बाबा घोर कलियुग… “

“नवीनच दिसतंय येडं … ” रिक्षावाला खिशात पैसे ठेवत म्हणतो आणि गर्रकन रिक्षा वळवतो…

“ए थांब.. काय म्हणालास ?? ए थांब … “

रिक्षावाला केव्हाच निघून गेलेला असतो…

आबा मामा आपली बॅग सावरत चाळी कडे चालू लागतो… शेजारून काही मुलं पळत जातात आणि मामा ला धक्का लागतो .. बॅग खाली पडते..

” ए ए ए पोरांनो … अरे मोठी माणसं चालत असतात जरा बघून चालावं … जाऊद्या .. या निरागस मुलांना काय बोलायच..”

“कोण निरागस ?” शेजारून चाललेला एक माणूस पुढे जाऊन मागे येतो अन विचारतो…

“हि मुलं .. किती गोड आणि निष्पाप… “

तो माणूस ओठ आवळत हसतो अन निघून जातो …

“ए भाड्या… माझी बॅटिंग आहे … “

“ए निघ ***च्या … काल दिलेली तुला … “

“धर घे बॉल अन घाल तुझ्या **कात “

मामा वळून बघतात.. हीच ती चाळीतली “निरागस” मुलं …

“शिव शिव शिव … आता पुन्हा नवीन काही पाहायला नको.. चला ताईकडे पटकन … “

मामा झपाझप चालत त्यांच्या बहिणीकडे जातात..

दार उघडताच ताई …

“दादा… तू??? कळवलं नाहीस … “

“तो कळवायचा प्रोग्रॅम तुमच्या शहरात …आम्ही गावाकडची माणसं ..आम्हाला नाही लागत अशी औपचारिकता … “

“तसं नाही रे दादा.. १ वर्षाने येतोयस तू … “

“काय करणार.. गावी व्याप केवढा …आणि काय गं ? सुनबाई कुठेय?”

“दादा तू ये तर खरं आत .. हातपाय धु बघू आधी… “

शोभा अक्का विषय बदलते …

मामा फ्रेश होऊन येतात … आणि रस्त्यात ठेवलेल्या झाडूला त्यांचा पाय अडखळतो …

“अरे रे रे … काय हे … घर सुरु होत नाही तोच संपूनही जातं … तरी म्हणत होतो ..गावी रहा म्हणून ..पण नाही ना.. तुम्हाला आपली मुंबई प्यारी … “

“दादा हे घे चहा … “

“हे काय ? तू ठेवलास? सुनबाई ?? लग्नाला येणं झालं नाहीच माझं … पण ऐकलं आहे बरं का खुप सुनबाई बद्दल … फार संस्कारी आणि सोजवळ आहे म्हणे …डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही .. अंगभर साडी नेसून दिवसभर वावरत असते म्हणे .. वा वा वा …मी सुनबाईचा चेहराही पाहिलेला नाही पण डोळ्यासमोर अगदी लक्ष्मी उभी राहिली बघ वर्णन सांगून ….. “


मामा दरवाजाबाहेर बघून सुनबाई चं रूप डोळ्यासमोर आणतात… आणि त्याच दृष्टीक्षेपात एक आकृती येताना दिसते…

जीन्स मध्ये अर्धवट खोचलेला ती शर्ट… डोक्यावर उलटी कॅप..गळ्याला रुमालाचा वेढा घातलेला … हातात विचित्र प्रकारचे कडे.. पायात शूज…टिपिकल गुंडासारखा पोशाख…

“अरे अरे अरे..काय आजकालच्या मुलांचे कपडे…काय तो अवतार…मी सूनबाईची छबी डोळ्यासमोर आणत होतो अन कोण हे ध्यान दिसलं…”

मामा चष्मा लावतात…अन डोळे मोठे करून….”शिव शिव शिव…अरे ही बाई आहे…”

“ए चल हवा आन दे….ए पंटर लोग चल निकल….ए माया भाभी, अपुन को भी भेज देना…मस्त वास आ रेला है तेरे घर से…”

शोभा अक्का धावत बाहेर येते अन घामेघुम..

मामा म्हणतात..?

“काय एकेक नमुने आहेत तुमच्या चाळीत..”

शोभा अक्का तोंडाला पदर लावून रडायला लागते..

“काय गं काय झालं?”

“सुनबाई…”

“काय??”

क्रमशः

___________
part 2
part 3
part 4
part 5
part 6
part 7
part 8
part 9

1 thought on “मवाली सून (भाग 1)”

  1. I am really inspired with your writing skills and
    also with the layout to your blog. Is this a paid subject or did you customize it your self?
    Either way keep up the nice quality writing, it is rare to peer a great
    weblog like this one nowadays. Blaze ai!

    Reply

Leave a Comment