मॉल मध्ये असताना अचानक समोर दिसत असलेल्या शशिकांत ला आवाज द्यावा की नको या द्विधा मनस्थितीत राकेश अडकला होता. राकेश त्याच्या बायको आणि मुलीसोबत मॉल मध्ये आलेला…शशिकांत एकटाच…कसा आणणार तो बायको अन मुलाला? ते दोघे तर कधीच घर सोडून निघून गेली होती.
राकेश मागे वळला..इतक्यात शशिकांतनेच त्याला पाहिलं आणि आवाज दिला. राकेश ने त्याला हात केला, एकदा मागे वळून पाहिलं, बायको अन मुलगी चेंजिंग रुम बाहेर उभे होते. त्यांचं लक्ष नाही हे एक बरं झालं असं राकेश ला वाटलं..
“राकेश…कसा आहेस?”
“मी मजेत…तू बोल…किमया कशी…ओहहह..सॉरी…ओघात बोललं गेलं..” ज्याची भीती होती नेमकं तेच तोंडात आलं.
“तू तरी काय करणार…तुझी चूक नाही…”
“बाकी काय म्हणतोस..”
“काय असणार आता माझ्या आयुष्यात..एकटेपणा शिवाय..”
राकेश अधूनमधून मागे बघतो, चुकून आशा ने जर त्याला शशिकांत सोबत बोलताना पाहिलं तर काय होईल याचा अंदाज नव्हता..
शशिकांत च्या ते लक्षात आलं..
“काश मेघना सुद्धा आशा सारखी असती तर..दोघी सख्ख्या बहिणी..पण स्वभाव एकदम दोन टोकाचे..”
“आशाचा स्वभाव मेघना पेक्षा शांत होता असं मला वाटतं..”
“होता…नीरज च्या जन्माआधी ती शांतच होती…कसलीही तक्रार नव्हती..सगळं कसं अगदी सुरळीत चालू होतं…पण नीरज झाला आणि तिला अचानक असं काय झालं काय माहीत…काहीबाही बोलू लागली, सतत आवाज चढवायची, सतत कुरबुर…परिणाम माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि तिच्यावर हात उगारला मी…चांगली वागली असती ती तर आता माझ्यासोबत असती..”
“उलट तू जर तिच्यावर हात उगारला नसता तर ती आज तुझ्या सोबत असती असं म्हण की..”
“म्हणजे? तिची चूक नव्हती? ही माझीच चूक??”
“ते जाऊदे… आमच्या परीच्या जन्मानंतर काय झालेलं माहितीये? मेघना भयंकर चिडचिड करू लागलेली…साध्या साध्या गोष्टीत भांडण…कुठलीही कुरापत काढायची…अगदी माझ्या घरच्यांना काहीबाही बोलायची…आणि एकदा तर माझ्या अंगावर धावून आलेली..”
“काय??? दोघी बहिणी सारख्याच म्हणायच्या की मग..”
“हो..पण तू सोडलं असशील तुझ्या बायकोला…मी नाही सोडलं..”
“तुझ्यात असेल सहनशक्ती…माझ्यात नाहीये..”
“याला सहनशक्ती नाही मित्रा..समजूतदारपणा म्हणतात..”
“या बायकांचं असं वागणं सहन केलं असतं तर डोक्यावर चढल्या असत्या ना त्या??”
“तुझ्या माहितीसाठी सांगतो…याला postpartum depression म्हणतात…बाळंतपणानंतर महिलांच्या हार्मोन्स मध्ये खूप चढउतार होतात… कमालीचे बदल होतात.. आणि या हार्मोन्स चा संबंध सरळसरळ मानसिक अवस्थेशी असतो..”
“पण मग त्यांनि भावना कंट्रोल नको करायला?”
“मित्रा…बाई ही सुद्धा माणूस आहे..जादूगार नाही आणि देवही नाही जी सगळं कंट्रोल करू शकेल..शरीराच्या मर्यादा असतात प्रत्येकाच्या…शरीर जसा संदेश देतो तसं आपण वागवलो जातो…”
“म्हणजे…आशा चं ते वागणं म्हणजे याचाच एक भाग होता??”
“हो…ती त्याच आजारातून जात होती..आणि त्यात तू तिला सांभाळायचं सोडून तिच्यावरच अत्याचार करत गेलास..थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर आज ती तुझ्या सोबत असती…आपण माणसं.. बायकोने अमुक असंच वागावं, तमुक असंच करावं अश्या अपेक्षा तिच्यावर लादत असतो…आणि तसं झालं नाही तर आपण कुठल्याही थराला जातो…स्त्रीच्या मानसिकतेमागे, भावनेमागे, तिच्या वागण्यामागे काही शारीरिक बदलही कारणीभूत असू शकतात इतका विचार करण्याइतपत आपल्याला कदाचित शिकवलं गेलं नसेल…”
इतक्यात मेघनाचा आवाज येतो आणि राकेश पटकन त्या दिशेला जातो..
इकडे शशिकांत डोळ्यात पाणी आणून एकच वाक्य घोळवत असतो..
“मी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर??”
मी पण असाच अनुभवातून जाते आहे.. माझा नवरा नाही समजून घेत..