अचानक शरीरात हालचाली होऊ लागल्या अन त्याने डोळे उघडले, आजूबाजूला सगळं हिरवं दिसत होतं… हिरवा पडदा, हिरवं बेडशीट… बेडच्या शेजारी असलेल्या काही मशिन्स आणि सलाईन कडे बघून त्याच्या लक्षात आलं की तो हॉस्पिटलमध्ये आहे.. त्याला आठवलं, कालच त्याची काही मित्रांसोबत पैशावरून मारामारी झाली होती… डोक्याला जबरदस्त मार लागला अन पुढचं त्याला काहीही आठवलं नाही…तो आजूबाजूला बघत होता..नर्स, डॉकटर धावपळ करत होते… तो उठला अन बाहेर चालू लागला….हॉस्पिटलमध्ये फार गर्दी दिसतेय…तो त्याच्या कुटुंबियांना शोधू लागला…इतक्यात एका नर्स चं लक्ष त्याच्याकडे गेलं..
“तुम्ही इथे? तुम्हाला शुद्ध आली??”
“हो..म्हणजे…आत्ताच मी डोळे उघडले अन…”
शुद्ध आल्यावर नर्स ला इतका का आनंद झाला याचा त्याला प्रश्न पडला…
“तुमच्या घरचे आत्ताच घरी गेलेत, मी बोलावते त्यांना.तुम्ही प्लिज बेडवर जा..मी डॉक्टरांना कळवते.”
असं म्हणत नर्स निघून गेली..तो आजूबाजूला पाहू लागला…सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क होते…काही लोकं रेनकोट सारखा पोशाख करून तोंड पूर्ण काचेसारख्या हेल्मेट ने झाकून ये जा करत होते..
“हॉस्पिटल फारच strict दिसतंय…” तो स्वतःशीच म्हणाला..
तो त्याचा वॉर्ड मध्ये गेला आणि आई वडिलांची वाट पाहू लागला..
थोड्या वेळात आई बाबा आले आणि त्याला मिठी मारली, आईचं रडणं थांबत नव्हतं…
“आई मी बरा झालोय ना..कशाला रडतेस आता..आणि माझा फोन कुठेय? मित्राला त्याचे documents द्यायला निघालो होतो अन रस्त्यात हे…त्याला द्यायचं आहे बिचारा वाट बघत असेल कालपासून.”
आई वडील त्याच्याकडे शून्य अवस्थेत बघत राहिले..बाबा धीर करून म्हणाले,
“तुझा फोन घरी आहे..”
“तुमचा द्या..”
बाबांनी त्याला फोन दिला…
त्याने स्क्रिन चालू केली आणि तो जरासा गोंधळला..
“बाबा हे काय, किती चुकीची सेटिंग करून ठेवलीये..एप्रिल चा महिना दाखवतोय…फेब्रुवारी चालू आहे…थांबा मी आधी सेट करतो ते…”
तो टाइम सेट करायला गेला, त्याने पाहिलं की auto time झोन सिलेक्ट केलाय…तो गोंधळला…..असं कसं होऊ शकतं? काल मी ऍडमिट झालो, अन आज 3 महिने??
“बाळा तू 3 महिने कोमात होतास, तुझी शुद्धीवर यायची वाट बघत होतो..”
“काय??” तो हादरलाच…
त्याचं विचारचक्र एकदम मंदावलं… काय करावं, काय बोलावं काही समजेना….
डॉक्टर येऊन तपासणी करून गेले आणि घरी जाण्याची मुभा देण्यात आली…
जाताना तो हॉस्पिटलमध्ये पाहतच राहिला…एकदम विचित्र वातावरण होतं… जाता जाता त्याने मनाशी पक्कं केलं…की ज्या मित्राने त्याला डोक्यात मारलं त्याचा आता बदला घेणार…सापडू दे फक्त, त्याला जागीच ठार करतो….
संतापाच्या भावनेने तो हॉस्पिटलमधून निघाला…इतक्यात काही पोलिसांच्या आणि नर्सच्या घोळक्यात त्याला तो मित्र येताना दिसला…तोंडावर मास्क होतं… आजारी दिसत होता…
याचा ताबा सुटला…आता याला इथेच झोडपतो म्हणत त्याच्याकडे याने धाव घेतली…त्याने याला समोरून येताना बघताच तो थांबला आणि जोराने ओरडला..
“थांब…तिथेच थांब…मला हात लावू नकोस..”
“का? घाबरला का? मला मारताना लाज नाही वाटली?”
“तुला फक्त मारलं रे…मारून तर नव्हतं टाकलं ना? तू मला हात लावलास तर मरशील…. माझं काही खरं नाही, निदान तू तरी जीव धोक्यात घालू नकोस…”
पोलिसांनी दोघांना हटकलं आणि त्या मित्राला घेऊन ते मध्ये गेले, एका कोपऱ्यातल्या खोलीत त्याला एकटं टाकलं…
याला कळेना…नेमकं काय झालं असं? काय सुरू आहे बाहेर??
वडिलांनी त्याला बाजूला ओढलं..
“तू 3 महिने कोमा मध्ये होतास, पण या महिन्यात संपूर्ण जगात काय उलथापालथ झालीये माहितीये? कोरोना नावाच्या विषाणूने जगाला विळखा घातलाय, रोज हजारो लोकं मरताय, संसर्ग वाढतोच आहे…एकापासून चार लोकं, चारपासून 20 लोकं… यावर अजून कुठलेही उपचार सापडलेले नाही…जगात lockdown घोषित केलंय… शाळा, कॉलेज, कंपन्या, दुकानं… सगळं बंद आहे…लोकं घरी बसलेत…कोरोना झालेल्या माणसाची कॉलनी सुद्धा सील केली जातेय…त्या माणसापासून लोकं दूर पळताय…कहर माजलाय…आणि हा तुझा मित्र, आजच कोरोना पोसिटीव्ह निघालाय, म्हणून तो म्हणत होता…की लांब हो म्हणून…”
हे ऐकून तो मटकन खाली बसला…हॉस्पिटलमध्ये मास्क घालून फिरणारी लोकं, रेनकोट सारखा पोशाख केलेली माणसं… एकमेकांपासून चार हात लांब उभी राहणारी माणसं…सगळं त्याला आता उमजत होतं..
दुसऱ्या दिवशी तो रुटीन चेकप साठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला…सहज त्याच्या मित्राकडे एकदा बघून जावं म्हणून तो हळूच त्याच्या वॉर्ड बाहेर गेला…लांबूनच तो त्याच्याकडे पाहू लागला…त्याचा मित्र आजारी, हतबल एकटाच बसून होता….त्याला फोन आला आणि तो अजून रडायला लागला..
“अगं माझ्याकडे पैसे नाहीत, इथे किरकोळ रक्कम भरायची आहे…तुम्ही येऊ नका इकडे पण मला मोबाईल वर पाठवा पैसे…येत नाही?? असं काय करतेस आई, कुणाची तरी मदत घे ना..”
एवढं बोलून त्याने फोन ठेवला अन अजून रडायला लागला…रडता रडता त्याचं लक्ष बाहेर उभ्या असलेल्या मित्राकडे गेलं…हा चिडला…”लांब हो…कुणी येऊ दिलं तुला इथे?”
“मी तुझे पैसे भरतोय…आणि बाहेरून काहीतरी खायला आणतो, काळजी नको, बाहेरच ठेवेन तू घेऊन जा…”
याचं असं अवसान पाहून आजारी मित्राला समजेनासे झाले…ज्याला आपण वेड्यासारखं तुडवलं… डोक्यात काठी घातली…तो हाच का??
त्याने बाहेरून खाण्याच्या वस्तू आणून खोली बाहेर ठेवल्या आणि निघून गेला…जाता जाता त्याच्या मनात आलं…तसं पाहिलं तर मी त्याचा शत्रू, त्याने स्वतःहून स्पर्शून मला बाधित केलं असतं… पण ….
त्याला एक गोष्ट समजली…बाकी काहीही असो, या कोरोना ने मात्र जगातली माणुसकी पुन्हा जिवंत केली…आणि जगण्यासाठी पैसा नाही, तर “श्वास चालू असणं” महत्वाचं हे तो सांगून गेला…