“सुशांत सिंग राजपूत ची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या”
ही बातमी ऐकल्यावर कुणाचं डोकं सुन्न झाले नसेल?
पैसा, प्रसिद्धी सर्वकाही पायाशी लोळण घेत असूनही आयुष्य संपवण्याचा असा टोकाचा विचार कुणी कसं करू शकतं???खरं तर त्याचं दुःखं त्यालाच माहीत, तो गेला पण जाताना हजारो प्रश्न मागे सोडून गेला. आजही त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. कुणी म्हणताय की त्याची हत्या केली गेली, कुणाचं म्हणणं आहे की त्याला नैराश्याने ग्रासलं होतं आणि त्यातून त्याने स्वतःला संपवलं.
त्याची हत्याच केली गेली यावर कित्येक लोकं ठाम आहेत, youtube फेसबुक वर लोकांनी अक्षरशः CID बनून त्याच्या मृत्यूचं भांडवल बनवून प्रसिद्धी मिळवली आहे.
पण मूळ मुद्दा असा की कुणाच्याही आत्महत्येला कारणीभूत कोण असतो? तो ज्या परिघात वावरतो ती व्यवस्था? त्याचा आजूबाजूची माणसं? पैसा? की एकटेपणा?
जो कुणी आत्महत्या करतो त्याच्यामागे कुणी ना कुणी व्यक्ती नक्कीच असतो…प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या मृत्यूला हाच कारणीभूत असतो…
एखाद्या व्यक्तीला त्या त्या क्षेत्रातील व्यवस्था मारते. पण ही व्यवस्था चालवते कोण? या व्यवस्थेमागेही एक गलिच्छ मानवी डोकं असतच…
एखाद्या व्यक्तीला पैशांची चणचण मारते…पण पैसा हे कारण नसतं..”कमवायची अक्कल नाही…आयतं खाणारा..” असे टोमणे देणारी माणसं असतातच…
एखाद्याला एकटेपणा मारतो…पण त्याला एकटं पाडणारेही माणसंच असतात…
थोडक्यात पाहिलं तर व्यक्तीला आत्महत्येस कारणीभूत ही आसपासची व्यक्तीच असतात…अप्रत्यक्षपणे माणसं ही दुसऱ्या माणसाला शब्दांनी अथवा वागणुकीने दूर करत असतात, त्याचं मानसिक खच्चीकरण करत असतात…
म्हणूनच आपल्याला एक आत्मपरीक्षण करायचे आहे, आपल्या बोलण्याने, वागण्याने दुसऱ्याला काही त्रास तर होत नाहीये ना? आपल्यामुळे कुणाचं मानसिक खच्चीकरण तर होत नाहीये ना? असं असेल तर ताबडतोब ते थांबवा…
लक्षात असुद्या, कुठलीही आत्महत्या ही एक हत्याच असते….