मस्ती की पाठशाला- भाग 1 ©संजना इंगळे

“सॉरी…इतर कॅन्डीडेट्स च्या मानाने तुमचा अनुभव कमी आहे… आम्ही तुम्हाला प्रोफेसर म्हणून घेऊ शकत नाही..”

“अहो सर पण…अनुभवापेक्षा मला किती चांगलं शिकवता येईल हे बघा ना…विद्यार्थ्यांना कसं हँडल करायचं याचं चांगलं ज्ञान आहे मला..”

“सॉरी मॅडम…या तुम्ही…”

DK कॉलेज ला मुलाखतीसाठी आलेल्या विद्या ला कमी अनुभवामुळे हाकलण्यात आलं…अकरावी बारावीचं कॉलेज…DK कॉलेज.. शहरात प्रसिद्ध…उंच इमारती, प्रशस्त परिसर, मोठमोठे मैदान, जिमखाना आणि अनुभवी शिक्षक या कॉलेज ची वैशिष्ट्य… पण या सगळ्यामुळे कॉलेज लोकप्रिय होतं? अजिबात नाही…इथली मुलं फक्त अन फक्त धमाल मस्ती करत.प्रोफेसर लोकं आपल्या पगाराशी मतलब ठेऊन आपलं काम करून निघून जात…विद्यार्थी कितीही उद्धट वागली तरी तेव्हढ्यापुरता दम देऊन निघून जात.त्यांना काही घेणंच नव्हतं…


विद्या कॉलेजच्या आवारातून परत जात असताना कॉलेजच्या आवारात एकदा बघते…कॉलेजचे ट्रस्टी लोकं नुकतेच आलेले असतात अन प्रिन्सिपल च्या ऑफिस कडे निघत असतात…लेक्चर चा टाइम असून मुलं बंक मारून बाहेत फिरत होती..काही जण क्रिकेट खेळत होती..काही मुलं मुली एकत्र घोळका करून हातावर टाळ्या देऊन एकमेकांची खेचत होती…काही प्रेमपक्षी आपापली जागा सांभाळून गुलूगलू करत होते…येणाऱ्या जाणाऱ्या प्रोफेसर वर काहीतरी taunt मारून खिदळत होती…तर काही मुलं एकटीच बसलेली…एकांतात… विश्वाची चिंता करत…

विद्या ते सगळं बघून भांबावली…किती बदललंय ना सगळं? एक माही होतो, जे शिक्षक समोर आले की अदबीने नतमस्तक व्हायचो…आणि हे आजचे मुलं…

इतक्यात एक प्रोफेसर…सावंत सर मागून धावत येतात…

“मॅडम…ओळखलंत का?”

“नाही..”

“मी आकाश सावंत… तुमचा सिनियर होतो…”

“ओह..”

“Interview का?”

“हो..rejected..”

“ओह…मला माहित असतं… काहीतरी केलं असतं..”

“नाही नाही..वशील्याने नकोच मला…”

हडकूळा… चेहऱ्यावर मोठा भिंगाचा चष्मा घातलेला…उंच असा आकाश सावंत विद्या ला खरंच ओळखू आला नव्हता…

इतक्यात एका ठिकाणी गर्दी जमते…सगळी मुलं त्या दिशेने पाळायला लागतात….

सावंत सर आणि विद्याही बघतात…

“काय झालं तिकडे?? चला बघून येऊ..”

दोघेही तिकडे जातात…

“शलाका…जर आज तू मला हो म्हटली नाहीस तर…मी जीव देईन..”

कॉलेजच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीत उभा राहून मानव ओरडत होता…खाली शलाका घाबरून उभी…तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता…मानव ने वरच्या क्लासरूम मध्ये जाऊन दरवाजा बंद केलेला त्यामुळे त्याला अडवायला जाता येत नव्हतं..”

“शलाका…बोल..बोल पटकन..”

“मानव..खाली ये..वेडेपणा करू नकोस…”

“मान्या उतर… चू**गिरी करू नको..”

“ए भे** हा खरंच भिडला बे…”

मानव खाली यायला तयार नाही…शिक्षक लोकं सांगून दमले…मानव ऐकायला तयार नाही..

“तुझी आई ICU मध्ये आहे…”

गर्दीतून एक आवाज येतो अन गर्दी बाजूला सरते….तो विद्या चा आवाज असतो…

मानव चे हावभाव एकदम बदलतात…

“काय?? कुठे?? काय झालं??”

“तुझंच नाव घेतेय ती सारखी..”

मानव पटकन सगळं सोडून जिन्याने खाली उतरून येतो अन विद्या ला गाठतो…

“कुठेय आई? तुम्हाला कसं माहीत?”

“काय रे?? आता काय झालं? जीव देणार होतास ना शलाका साठी? दे की मग…आईचं होऊ दे तिकडे काहीही…आधी शलाका चा होकार मिळव..”

“शलाका गेली खड्यात…सांगा आई कुठेय? ICU मध्ये कधी गेली??”

“मी जर आत्ता काही बोलली नसती तर नक्कीच तुझ्या जखमी झाल्याची किंवा तू सोडून गेल्याची बातमी ऐकून ICU मध्ये गेलीच असती…फरक एवढाच असता की तू आईसाठी तेव्हा जिवंत राहिला नसता…”

मानव रडायला लागतो…त्याची चूक त्याला लक्षात येते…

“मानव…रडू नकोस…आता आलं ना लक्षात? तुझ्या आयुष्याची नाळ अनेक व्यक्तींसोबत जोडली गेलीय…आई वडिलांशी, समाजाशी, मित्रांशी…एका व्यक्ती साठी तू आयुष्य पणाला लावू शकत नाहीस…विचार सर्वांचा करायचा असतो…”

मानव ला उपरती होते…शलाका चा जीव भांड्यात पडतो…मानव तिथून निघून जातो…

ट्रस्टी लोकं हे सगळं बघत असतात..वातावरण निवळतं…सर्वजण विद्या ला शाबासकी देतात…ट्रस्टी लोकं चौकशी करतात, ही मुलगी कोण?

“मुलाखतीसाठी आलेली…पण अनुभव नसल्याने घेतलं नाही आम्ही..”

“अशी चूक करू नका…आपल्याला अश्या शिक्षकांची गरज आहे…ताबडतोब रुजू करा त्यांना..”

क्रमशः

2 thoughts on “मस्ती की पाठशाला- भाग 1 ©संजना इंगळे”

Leave a Comment