सांभाळून घ्या

“नकुल, बेटा आज शाळेचा पहिला दिवस आहे….तुझ्या टीचर ला सांभाळून घे हा..”
नकुल ला वर्गापाशी सोडताना टीचर समोर हे वाक्य सुलभा बोलली. टीचर ला हसू आलं…वाक्य बरोबर करण्याचा वेळ त्यांना नव्हता म्हणून नुसतं हसून त्या आत गेल्या…
सोबत नकुल ला सोडायला आलेले सासू, सासरे आणि नवरा हे ऐकून हसायला लागले..”

“अगं उलटं बोललीस….टीचर ला सांगायचं ना, की नकुल ला सांभाळून घ्या म्हणून..”

“नाही, मी एकदम बरोबर बोलली, नकुल ने टीचर ला सांभाळून घ्यायला हवं..”

परत एकदा हशा पिकला…सर्वजण घरी गेले…घरी गेल्यावर सुलभा जरा तणावात दिसत होती, सासूबाई म्हणाल्या,

“अगं इतकं काय टेन्शन घेतेय, आम्ही कधी इतकं टेन्शन घेतलं नव्हतं आमच्या मुलांचं”

“नाही ओ, नकुल सांभाळून घेईल ना त्यांना? त्रास तर नाही ना देणार? आणि त्याची तक्रार आली तर? ,त्याला शाळेतून काढून टाकलं तर?”

“अगं तो त्यांच्या शाळेत जातोय, ते सांभाळून घेतील…आणि लहान आहे तो, मोठे लहानांना सांभाळतात की लहान मोठ्यांना??”

“हेच…हेच मला आजवर समजलं नाही, जर मोठ्यांनी लहानांना सांभाळून घ्यायचं असतं… लहान मोठ्यांकडे जातात तेव्हा त्यांनी आपलंसं करायचं असतं, तर मग लग्न झालेल्या स्त्री कडे उलटा दृष्टिकोन का ठेवला जातो??”

“म्हणजे?”

“म्हणजे लग्न करून एखादी स्त्री दुसऱ्याच्या घरात जाते…तेव्हा ती लहानच असते ना? लहानांना मोठ्यांनी सांभाळून घ्यायचं असतं मग उलट तिलाच असं का सांगितलं जातं की तू सर्वांना सांभाळून घे??? आपल्या निम्म्या वयाच्या असलेल्या सुनेकडून एखाद्या प्रौढ स्त्री सारखा चपखलपणा का अपेक्षित केला जातो??आणि मुळात तिला नवीन घर समजून घेण्याचा, शिकू देण्याचा धीर कोण बाळगतो?? संसारात नवीन गोष्टी आत्मसात करण्या आधीच तिच्यावर नको ते आरोप लावून मानसिक छळ सुरू करतात?? आपण पाहुण्यांकडे जातो तेव्हा आपला पाहुणचार ती लोकं करतात की आपणच त्यांचा पाहुणचार करतो? मग नवीन लग्न झालेली स्त्री ही सुरवातीला पाहुणीच असते, मग तिला सुरक्षित वाटू देण्या ऐवजी असुरक्षित का वाटायला लागतं?? ही जबाबदारी कोणाची??”

सासूबाईंच्या डोळ्यामोमरून पूर्वीचा सगळा काळ गेला, सुलभा ला आपण बोलून बोलून किती त्रास दिला होता, अगदी मानसिक रोग्याची ट्रीटमेंट घेऊन तिला यावं लागलं…पण अजूनही मधून मधून ती असं काहीतरी बरळत असायचीच, तिला बसलेला धक्का हा कायमस्वरूपी होता…पण आज नकुल च्या निमित्ताने तिच्या त्या भावना पुन्हा उचंबळून आल्या…आणि ती हे बरळत सुटली…

पण यावेळी तिच्या बरळण्यात तथ्य होतं हे सासूबाईंना कळून चुकलं…

3 thoughts on “सांभाळून घ्या”

Leave a Comment