“काही काही एक उरलं नाहीये आता..सगळं संपलय…माझ्यातली मीच हरवलीये, माझ्यातलं चैतन्य गायब झालंय… काय करू…कुठे जाऊ…”
मानसी चा मानसिक तोल बिघडला होता, रस्त्याने ती सरळ सरळ चालायलाच लागलेली, पूर्ण भान विसरून…तोंडाने काहीतरी बरळत आणि जीवाची तडफड करत…
मानसी एक गायिका, गाण्याशिवाय तिचं जगणं अशक्य होतं… अगदी शाळेपासून ते लग्न होईपर्यंत विविध कार्यक्रमात, ऑर्केस्ट्रा मध्ये तिचं गायन सुरू असे. शिक्षणानंतर गायनातच तिने आपलं करियर करायचं ठरवलं. चांगलं शिक्षण असल्याने आणि चांगली नोकरी मिळत असतानाही तिने तिकडे पाठ फिरवून गायन कलेला जोपासायचं ठरवलं. तासनतास रियाझ…नवनवीन सुरांची मांडणी…तालबद्धता.. याचा रोज सराव चाले..स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू करायचं होतं… गाण्याचे व्हिडीओज बनवायचे होते…मोठ्या चित्रपटासाठी गायिका म्हणून गाण्याचं स्वप्न ती बघत होती. खूप मोठा पल्ला तिला गाठायचा होता, आणि तशी तिने तयारीही केली.
पण घरच्यांना मात्र तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली…बघता बघता एक स्थळ आलं…मुलगा खूप चांगला होता, मानसी ला तो आवडला…म्हणून लग्नाला तिने आढेवेढे घेतले नाही. या गुलाबी काळात तिची स्वप्न कुठेतरी मागे राहिली, गायनकडे दुर्लक्ष झालं..प्रेमाच्या रंगात ती रंगत होती, केतन ला भेटणं, त्याच्याशी बोलणं… यातच तिचा वेळ जाऊ लागला…
आणि ती भानावर आली ती आज…लग्नाला 2 महिने झाल्यानंतर… आपली स्वप्न, आपली महत्वाकांक्षा कशी विसरलो आपण? इतकं वाहवत गेलो या लग्नाच्या निर्णयात? कारण लग्नानंतर घरात सततचे पाहुणे, घरातल्या जबाबदाऱ्या… सासू सासऱ्यांनी सेवा…यात ती बंदिस्त झाली…जेव्हा ती खडबडून जागी झाली तेव्हा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. या लग्नाच्या निर्णयानंतर तिची स्वप्न पूर्ण करणं जवळ जवळ अशक्य वाटू लागलं.
का आपण इतके वाहवत गेलो? का लग्न केलं? का हा निर्णय घेतला? लग्न केलं आणि आता सगळे मार्ग बंद झालेत माझे…गायन माझा आत्मा आहे, कसा जोपासू?
विचार करत करत ती सिग्नल वर पोहोचली, आसपासच्या गाड्या…रहदारी…काहीच पाहत नव्हती ती…
ट्राफिक पोलीस ने झटकन तिचा हात पकडून तिला मागे केले…
“मॅडम शुद्धीवर आहात ना?”
मानसी अजूनही विचारातच होती…”काय करून बसले..कसं सोडू मी गाणं… घर कोण पाहील? मागे फिरणंही अशक्य आहे…” तोंडाला येईल तर बरळत होती…
ट्रॅफिक पोलीस ला एकंदरीत परिस्थिती लक्षात आली…त्याने तिला समजवायचं ठरवलं…
तिचा हात पोलिसाने धरूनच ठेवलेला, कारण ती शुद्धीत नव्हती…आणि गाडीला जाऊन आदळली असती…
पोलिसाने तिला बळजबरी बाजूला घेऊन एका ठिकाणी बसवलं…तिच्या तोंडावर पाणी मारलं तशी ती भानावर आली…
“पोलीस? तुम्ही? मी इथे..???”
“ताई शांत हो…तुला तुझी स्वप्न मागे राहिल्याचं दुःख आहे ना?”
मानसी आश्चर्याने पोलिसांकडे बघते, 2 मिनिट त्यांच्याकडे पाहून तिला रडू फुटतं…
“ताई…रडू नकोस…तुला माहितीये का? तुला रेड सिग्नल लागलाय…”
“रेड सिग्नल??”
“हो…तुझ्या कपाळावर जो लाल कुंकू आहे ना..त्याचा..लग्न झालंय तुझं..जबाबदाऱ्या वाढल्या, आपल्या आशा आकांक्षा बाजूला ठेवल्यास तू…सासरच्या लोकांना वाहून दिलंस…”
“म्हणजे…आता थांबायचं का? थिजून जायचं का?”
“कुणी सांगितलं? अगं वेडे, हा सिग्नल असतो…तात्पुरता.. लाल सिग्नल लागला की थोडा वेळ थांबायचं…वाट पहायची, कानोसा घ्यायचा गर्दीचा..परिस्थिती समजून घ्यायची…मग काही वेळाने हिरवा सिग्नल मिळाला की सुसाट आपली गाडी सोडायची….”
“याचा आयुष्याशी काय संबंध??”
“खूप मोठा संबंध आहे…आता समोर बघ…चारही बाजूंनी प्रवाह येत आहेत माणसांचे…. पण प्रत्येकाला सिग्नल आला की थांबावं लागतं… वाट पाहावी लागते…कुणाला परिस्थितीचा रेड सिग्नल लागतो, कुणाला माणसांचा तर कुणाला पैशांचा..
प्रवाह येतच असतात, आणि निघूनही जातात..आपण मात्र आपला रस्ता सोडायचा नसतो…आता हे बघ ना…कुणी सिग्नल तोडायचा प्रयत्न केला तर काय होईल? त्याचंच नुकसान होईल…नाही का? मग परिस्थिती प्रतिकूल असेल तर बंड पुकारून मोकळं व्हायचं का? नाही…थांबायचं…वाट पहायची… ग्रीन सिग्नल लागतोच कधी ना कधी…
आता तो बघ माणूस, रेड सिग्नल लागल्यावर माणसं थांबली आहेत ना त्यांना गजरे विकतोय…शिकायला हवं त्याच्याकडून…जिथे थांबावं लागतं तिथेही काहीतरी संधी असतेच की…आपण फक्त डोळे उघडून पाहायला हवं… रेड सिग्नल लागला की भरधाव आणि आपल्या मग्रूरीत असलेल्या प्रवाहालाही थांबावं लागतं.. कुणाचीही गाडी न थांबता पूढे जाऊ शकत नाही…प्रत्येकाला हा रेड सिग्नल लागतोच…तो कुणालाही चुकत नाही…
आता जास्त विचार करू नकोस, नुकतंच लग्न झालंय तुझं..रेड सिग्नल लागलाय…थोडं थांब इथे, वाट बघ, माणसं समजून घे, त्यांना जीव लाव…इथे कुढत न राहता संधी समजून माणसांना आपलंसं कर आणि मग हळूहळू आगेकूच कर आपल्या स्वप्नांकडे, बघ हीच माणसं तुला कसा ग्रीन सिग्नल देतील ते…तुझ्या रेड सिग्नल वर थांबल्याचा काळात तू जेवढं माणसांना आपलंसं करशील तीच माणसं तुला भरधाव धावायला इंधन देण्याचं काम करतील…”
मानसी ला एक पोलीस आयुष्याचं सार शिकवून जातो.
इतक्यात ग्रीन सिग्नल पडतो आणि थांबलेली सर्वजण पून्हा धावायला लागतात…पण गाड्यांच्या त्या कर्णकर्कश आवाजात मानसीला आयुष्याचा नवीन सूर सापडतो.
©संजना इंगळे
This comment has been removed by the author.
खरेच खूपच सुंदर शब्दात आयुष्यात कसे पुढे जावे हे अप्रतिम मांडले आहे