ऑफिसर (भाग 2)

भाग 1
https://www.irablogging.in/2020/08/1_20.html

श्रेया जे बोलली त्याचा विचार करतच ती घरी आली..

“मी आणि स्पर्धा परीक्षेत? छे… श्रेया काहीही म्हणते…आता कुठे अभ्यास करू मी…आणि तसंही काय गरज आहे मला.. जाऊदेत..”

प्रेरणाच्या मेंदूत नकारघंटाच वाजत होती, पण मनात मात्र कुठेतरी खळबळ माजली होती…वीर ला झोप आली तसं तिने त्याला खायला घालून झोपवलं…

रात्री ती आदित्य ला म्हणाली,

“श्रेया म्हणत होती की तू स्पर्धा परीक्षा दे..”

“Great idea… तू प्रयत्न करू शकतेस..”

“हो पण…त्याला खूप अभ्यास करावा लागतो, लोकं कितीतरी वर्ष त्यात वाया घालवतात..”

“हे बघ, तुझ्यावर काही बर्डन नाहीये…की तू पास झालीस तरच घर चालेल वगैरे…चांगली संधी आहे..”

“जाऊद्या हो…माझ्या वीर कडे दुर्लक्ष होईल…”

“बरं बाई..”

प्रेरणा विचार करतच, झोपी गेली…

दुसऱ्या दिवशी कमळी घरी आली…

“काय गं आज लवकर?”

“अहो माने काकूंच्या घरी गेली, मोठं भांडण सुरू होतं… ती सोनाली घर सोडून गेली…”

“बापरे… पण सगळं तर चांगलं चालू होतं त्यांचं..”

“बाईच्या मनात काय घालमेल सुरू असते कुणाला ठाव लागत नाही…सोसलं असेल तिने एका लिमिट पर्यन्त..नंतर पाणी डोक्यावरून गेलं असेल अन मग सगळाच स्फोट..”

“ते ठीक आहे पण ती जाणार कुठे? तिला वडील नाही, तिची आई कशीबशी आपलं पोट भरते…”

“तिलाच माहीत…तुम्हाला सांगते ताई, बाईच्या जातीने कधीही आपलं पोट भरू शकेल अशी व्यवस्था करावी…दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं तर अशी अवस्था होते..”

प्रेरणा शांत होते..

“माफ करा ताई..मला तसं नव्हतं म्हणायचं…तुमच्याबद्दल नाही म्हणाले मी, आणि दादा किती चांगले आहेत…उगाच बोलले बघा मी..”

“अगं माफी कसली मागते…बरोबर बोललीस तू…”

“काय करू ताई…मीही त्यातून गेली आहे, म्हणून म्हटलं..”

कमळी कामं आवरून निघून जाते…प्रेरणा कडे आता एकेक अश्या गोष्टी आकर्षित होऊ लागल्या होत्या ज्याचा ती दिवसरात्र विचार करत असे..

“बरं कमळी, उद्यापासून 4 दिवस नको येऊ, मी जातेय बहिणीकडे…”

“बरं बरं…”

प्रेरणा बॅग भरून ठेवते आणि तिघेही ठरल्याप्रमाणे तिच्या बहिणीच्या घरी पोचतात…तिथे बॅग वगैरे ठेऊन तिघे लग्न अटेंड करून परत येतात. सुशीला खूप आनंदित होते…चाळीत असताना एवढ्याश्या घरात दोघी बहिणी एकमेकांच्या खूप जवळच्या होत्या, दोघीजणी आपापली सुखदुःख एकमेकींशी शेयर करायच्या…इतक्या दिवसांनी माहेरचं कुणीतरी आलं हे बघून सुशीलाला काय करू अन काय नको असं झालं..

“प्रेरणा, ही बघ तुमची खोली..खास तुमच्यासाठी आवरून ठेवली आहे, वीर ला इथे पाळणा आहे, खेळायला भरपूर खेळण्या आहेत…”

प्रेरणा ते बघून खुश होते…वीर खेळण्यात रंगतो, आणि त्याच्याकडे लक्ष ठेवत दोन्ही बहिणी तिथेच बसून गप्पा मारतात…

“वीर ला दात आलेत का गं??”

“काही आलेत..फार त्रास दिलेला त्याने तेव्हा..”

“अगं दात येत असले ना की डिकामली पावडर ने दात हिरड्या चोळायच्या.. मी माझ्या नेत्रा साठी तेच वापरलं होतं…”

“अगं हो, नेत्रा कुठेय? ती गेलीये त्यांच्या स्कुल ट्रिप ला…येईल संध्याकाळी..”

“किती दिवसांनी बघेन मी तिला…व्हिडीओ कॉल वर बोलणं होतं पण भेटायची ओढ मात्र वेगळीच..”

“बाकी काय म्हणतेस, घरात सगळं ठीक ना?”

“हो ताई…काही तक्रार करायला जागाच नाही गं, आदित्य खूप चांगला आहे, घरात आर्थिक सुबत्ता आहे, कामाचा ताण नाही, अजून काय हवं??”

“बरोबर आहे…माझंही अगदी तसंच… पण सुखही जास्त झालं की पेलवत नाही गं..”

“किती अवघड असतं ना आयुष्य…जेव्हा काहीच नसतं तेव्हा ते मिळवायची धडपड असते, आणि मिळालं तरी काहीतरी रितं वाटतंच..”

“याचं कारण माहितीये? आपण गरिबीतून एकदम वर आलो, कशामुळे?? केवळ लग्न झालं म्हणून, आपलं तसं कर्तृत्व काय आहे गं??? त्यामुळे सुख मिळालं तरी ते मिळवण्याचा खरा आनंद आपल्याला मिळणारच नाही..”

प्रेरणा च्या मनात जे चाललं होतं ते ताईच्या बोलण्याने पुन्हा वर आलं…

“ताई तुला सांगते, अगं आमच्या शेजारची मुलगी म्हणत होती मला की तू MPSC चा अभ्यास कर म्हणून..”

“अगं खरंच की, तुझं वयही बसेल आणि काय हरकत आहे…आधी कसं नाही सुचलं तुला??”

बोलता बोलता ताई खिडकीपाशी गेली…

“ताई कसं आहे ना, एका रुटीन ची सवय झाली आहे मला..त्या परीक्षा म्हणजे पुन्हा अभ्यास, फॉर्म भरायचा, परीक्षेला जायचं…त्यात वीर चा प्रश्न..”

ताई खिडकीबाहेर बघता बघता एकदम नाकाला हात लावते…

“काय गं काय झालं??”

“इथे पलीकडे एक नदी आहे गं, काम चालू असल्याने पाणी तुंबलं आहे तिथे…वाहतं पाणी असायचं ना तेव्हा इतकी छान गार झुळूक अंगावर यायची ना..”

“अच्छा..”

“तुला समजलं नाही मला काय म्हणायचं आहे ते..”

“नाही ताई, मला नाही समजलं..”

“ही नदी…एकाच ठिकाणी स्थिरावली ना तेव्हा दुर्गंध येऊ लागला तिचा…पण तीच नदी वाहती राहिली तर आजूबाजूचेही झाडं झुडपं फुलत राहतात आणि ती आपल्या सागराकडील अंतिम ध्येयापर्यंत आगेकूच करु शकते..”

“आपला सागर कोण आहे ताई?? आपल्याला कुणाला जाऊन मिळायचं आहे?? आपला संसार हाच आपला समुद्र…ज्याला जाऊन मिळालो की स्वतःचं अस्तित्वच राहत नाही…”

“आपला प्रवाह विरुद्ध आहे आता..आपण समुद्राला आधीच जाऊन मिळलोय… पण त्या प्रवाहाला भेदून, सागरात मिसळूनही आपलं वेगळेपण शोधून त्याला प्रवाहित करायचं आहे…आपली वाट विरुद्ध दिशेला आहे..”

क्रमशः

भाग 3
https://www.irablogging.in/2020/08/3.html

Leave a Comment