सुलेखाची मुलगी लग्नाच्या वयात येत नाही तोच ढीगभर स्थळं येऊन उभी राहिली. कारण एकच, ती सुलेखाची मुलगी होती…सुलेखा म्हणजे गृहिणी नावाचं एक अढळ स्थान. तिच्यासारखी संसारी स्त्री आजवर कुणी बघितली नसेल. स्वयंपाकात सुगरण, घर अगदी चकाचक, कामात चपळाई, कधीही थकत नसे .महत्वाचं म्हणजे कायम दुसऱ्याच्या सेवेसाठी ती हजर..कधीही कुणाला नाही म्हटली नाही..पाहुणे असो वा नातेवाईक. त्यांच्या दिमतीला हजर..आजारपण, दुखणं खूपणं सगळं वेशीला टांगलेलं.. 24 तास घरातलं बघत बघत तिने आयुष्य काढलं होतं. काटकसर करून मुलांना शिकवलं..नवरा असून नसल्यासारखा…नावाला फक्त…तो त्याच्याच विश्वास त मश्गुल असे…एकहाती तिने संसार चालवला होता..अश्या संसारी बाईची मुलगीसुद्धा किती संसारी असेल यासाठीच लोकं तिच्याकडे फुस लावत होते…
असंच एक स्थळ आलं, सुलेखा ला ते योग्य वाटलं आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलं. सर्वात आधी मुलाकडचे मुलीला पाहायला आहे..रीतसर सर्व कार्यक्रम ठरला…पाहुणे आले, दोन्ही कुटुंबात गप्पा झाल्या, सुलेखा ने साग्रसंगीत नाष्टा बनवला होता…
“मुलीला बोलवा..” एकाने फर्मान सोडलं आणि सुलेखा दीक्षा ला बाहेर घेऊन आली…
सर्वांची अपेक्षा होती की छान साडीत नटून मुलगी येईल, पण दीक्षा आली ती स्लीवलेस पंजाबी ड्रेस मध्ये…ती खूप सुंदर दिसत होती..मुलाकडच्यांना जरा धक्का बसला..तिला प्रश्न विचारण्यास सुरवात झाली…
“शिक्षण कुठे केलं, पुढे काय प्लॅन आहे वगैरे..”
मुलाकडच्यांची अशी अपेक्षा होती की मुलगी लग्नानंतर फक्त घर सांभाळेल असं सांगेन, पण दीक्षा पुढे नोकरी करणार, मग नोकरीत तिला किती पुढे जायचं आहे, किती करियर करायचे आहे हे सगळं सांगत होती..
“नोकरी वगैरे ठीक आहे, पण घर कसं संभाळशील?”
“मी पुरेसा पगार कमवत जाईल, घरात बहुतांश कामांना बाई लावून इतर लहान मोठी कामं मी करत जाईल..”
कार्यक्रम आटोपला आणि सर्वजण घरी गेले…दुसऱ्या दिवशी ज्या नातेवाईकाने स्थळ आणलं होतं ती स्त्री घरी आली..
“काय गं सुलेखा, हे काय ऐकतेय मी??”
“काय झालं?”
“त्यांनी दीक्षा ला नाकारलं..”
“मला कल्पना होतीच..”
“अगं साधी गोष्ट आहे, तुझ्याकडे पाहून तुझी मुलगीही तशीच असावी अश्या अपेक्षेने ते आले होते… पण त्यांचा अपेक्षाभंग झाला..”
“असुदेत…जरुरी नाही मी जे कष्ट घेतले माझ्या मुलीच्याही वाटेला ते यावेत..मी लग्न करून या घरात आले तेव्हा मला प्रचंड सासुरवास होता, पण त्यावेळी निमूटपणे ऐकण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. घुसमटत जगत होते मी…सर्वांना एकदम परफेक्ट सून आणि बायको वाटण्यासाठी हाडाची काडं केली, दिवसरात्र घरच्यांना खुश ठेवावं म्हणून काबाडकष्ट केले, पण पदरी काय पडलं?”
“असं कसं म्हणतेस, अगं दूरदूरपर्यंत नाव आहे तुझं, की सुगरण असावी तर अशी, संसारी स्त्री असवी तर अशी”
“आयुष्याची 30 वर्ष लागली मला हे ऐकायला..त्याआधी काय ऐकत होतीस तू सांग ना..? माझ्याबद्दल चुकीचंच पसरवलं जात होतं ना? जे प्रत्येक स्त्रीला ऐकावं लागतं तेच…अगदी आपले 100% देऊनही….30 वर्ष अथक प्रयत्न केले तेव्हा जाऊन लोकं नाव काढायला लागले..पण हेच ध्येय असावं का स्त्री चं?? माझं कुणीतरी नाव काढावं म्हणून काबाडकष्ट करायचे, अपमान सहन करायचा, घुसमट सहन करायची…हे सगळं जर करावं लागत असेल तर नको ते नाव….या 30 वर्षात मी स्वतःसाठी जगायचं विसरून गेले होते….माझ्यातली मी हरवले…लोकं माझं नाव काढतात याहीपेक्षा जर मी स्वतःसाठी थोडं जगले असते तर त्याचा आनंद आणि समाधान मला जास्त असतं… माझ्या मुलीला मी याच रस्त्याने जायला सांगणार नाही, काहीही झालं तरी ती स्वतःसाठी जगेल, चार पैसे कमवेल, स्वतःचं नाव काढेल पण ते दुसऱ्यासाठी काबाडकष्ट करून नाही, तर स्वतःची ओळख बनवून…स्वतःचं अस्तित्व बनवून…”
आजही आपण बघतो, समाजात प्रत्येक स्त्री ही दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी झटत असते, परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत असते…काहींना त्याचं श्रेय मिळतं, काहींना शेवटपर्यंत कितीही केलं तरी त्यात काहीतरी कुरापत काढण्यात येते…मग पुन्हा प्रयत्न, परिपूर्ण बनण्याचा…मुलींनो, सोडा हा अट्टहास… कुणीतरी आपलं नाव काढावं, आपलं कौतुक करावं यासाठी आपलं आयुष्य दिवसरात्र खर्ची होत असेल तर तो नाद सोडा…आपल्या आवाक्यात जेवढं असेल तेवढंच पेला…स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी जगा.आपलं स्वतंत्र अस्तित्व बनवा…
Agdi khar aahe
Barobar.
आपण सगळ्यांना खूष करताना स्वतः खूष राहण विसरुन जातो