अशिक्षित सून हवी (भाग 8)

#अशिक्षित_सून_हवी (भा

सुधीर रावसाहेबांना शब्दात पकडून बरोबर तयार करतो.. रावसाहेब अखेर नातेवाईक म्हणून जमीन सुधीर ला भाड्याने द्यायला तयार होतात..

रावसाहेबांकडे दुपारी एक वकील येतात,

“नमस्कार रावसाहेब…मी मिस्टर सुधीर यांच्याकडून आलो आहे…जमिनीच्या व्यवहारासंबंधी बोलायचं आहे..”

“हो बसा तुम्ही…पण असे अचानक आलात, मला माझ्या वकिलांशी बोलायचं होतं..”

“अहो त्यात काय बोलायचं, मी सगळे कागदपत्र तयार केले आहेत..”

“हो पण जमिनीचा एकही निर्णय मी माझ्या वकिलांशिवाय घेतलेला नाही..”

“सुधीर तर सांगत होता की तुम्ही त्यांचे दाजी आहात..नातेवाईकावर अविश्वास??”

“तसं नाही हो, सुधीर म्हणजे घरातलाच… बरं चला काय प्रोसिजर आहे पुढे??”

“मी उद्या सुधीरला घेऊन येतो, सगळी कागदपत्रे आणतो…सह्या झाल्या की तुमची जमीन त्याला वापरता येईल भाडेतत्वावर..तोवर हा कागद घ्या, यावर तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे ते लिहिलेलं आहे…”

“पण फक्त भाड्याने देण्यासाठी इतकी कागदपत्रे??”

“हो काय करणार..सरकार बदललं, कायदे बदलले..”

“ठिके…उद्या भेटू..”

रावसाहेब तो कागद घेऊन त्यांच्या खोलीत जातात आणि कागद ठेऊन देतात.
शिखा बघत असते, सुधीर काहीतरी घोळ घालणार हे तिला माहीत होतं…

रावसाहेब खोलीतून बाहेर जातात. आता काहीही संधी शोधून खोलीत जायला हवं आणि कसला कागद आहे हे बघायला हवं..शिखा सगळी कामं आवरून घेते, खोलीत जायची संधी ती शोधत असते..

दुपारी हळूच खोलीत जाऊन बघते तर रावसाहेब खोलीतच असतात..

“काय गं शिखा..”

“काही नाही, आज कामासाठी बाहेर गेले नाही?”

“आज जरा कणकण वाटतेय..आराम करतो..तुझ्या लहान सासूबाईंनी औषध दिलं आहे..झोप येतेय त्याने..”

“बरं बरं.. आराम करा..काही लागलं की कळवा..”

शिखा बाहेर जाते अन रावसाहेब कधी एकदाचे झोपतात याची ती वाट पाहते.
कोरोना चं सावट गावावरही आलेलं असतं, शिखा हातात सॅनिटायझर घेऊन बाहेरून आणलेल्या वस्तूंवर मारत असते…
थोड्या वेळाने परत जाऊन बघते, रावसाहेब झोपलेले असतात..हीच योग्य संधीं आहे बघत ती आत जाते आणि कागद कुठे ठेवला आहे हे शोधते..

टेबलच्या ड्रॉवर मध्ये तिला तो कागद सापडतो..
तिला काहीतरी आठवतं… सुधीरला जेव्हा आपण भर पत्रकारांमध्ये प्रश्न विचारला होता तेव्हा कॅमेऱ्याने सुधीरच्या सर्व हालचाली कैद केल्या होत्या..फुटेज मध्ये एक माणूस सुधीरच्या हातात एक कागद आणून देताना दिसतो…तो कागद जरा विचित्र होता…सहसा कागद पांढऱ्या रंगाचा असतो, पण तो कागद लालसर आणि सोनेरी कडा असलेला होता…एखाद्या महागडया डायरीतला असल्यासारखा..

“म्हणजे… हा तोच वकील आहे जो सुधीरकडून कोर्टात लढतोय… हाच तो वकील जो कायद्यात खेळून गुन्हेगाराला बरोबर सोडवतो…त्याला पाठीशी घालतो..”

शिखाची खात्री पटली, सुधीर नक्की जमीन बळकवणार…ती तो कागद वाचते..

“हे काय? जमीन विकण्यासाठी जे कागदपत्र लागतात ही त्याची लिस्ट आहे..म्हणजे सुधीर रावसाहेबांना विश्वासात घेऊन मग फसवायला निघाला आहे तर…सांगायला जमीन भाड्याने हवीय म्हणाला पण प्रत्यक्षात तो बळकावू पाहतोय..”

“सुनबाई…??”

शिखा घाबरते…

“काय करतेय इथे??” सासरे जागे होऊन विचारतात..

“तुम्हाला बरं नाही ना, खोलीत गोमूत्र शिंपडू म्हटलं..ईडा पिडा टळते त्याने..” असं म्हणत छोट्या सॅनिटायझर स्प्रे ने ती खोलीत स्प्रे मारते…

“बरं बरं..”

शिखा वेळ मारून नेते, हातात सॅनिटायझर होतं म्हणून वाचली…

पण आता राबसाहेबांना कसं सांगायचं की सुधीर जमीन बळकवतोय? कारण सांगितलं तर माझं शिक्षण बाहेर येणार..इतके दिवस मिळवलेला विश्वास आणि प्रेम क्षणात उध्वस्त होणार.. .आणि नाही सांगितलं तर रावसाहेबांचं नुकसान…काय करावं??

शिखा लहान सासूबाईंच्या कानावर घालते.. त्याही घाबरतात..

“माझा भाऊ नालायक आहेच..पण बहिणीची जमीन घशात घालायला त्याला लाज पण वाटली नसेल का??”

“ते सोडा…जमीन कशी वाचवायची आपण?”

“मला तर काही सूचत नाहीये..”

दुसऱ्या दिवशी सुधीर वकिलाला घेऊन घरी येतो…सगळी कागदपत्रे तयार असतात..

“रावसाहेब, यावर सही करा आणि उरकून टाका हे काम..”

आतून शिखा आणि सासूबाई बघत असतात..

“शिखा काहीतरी कर…रावसाहेबांनी सही केली तर फार मोठा घोळ होईल…त्यांचं शिक्षण कमी, सगळी कामं वकिलाला सोबत घेऊन करतात, पण नेमका तो यावेळी गावात नाही आणि सुधीरने काहीबाही भरवून रावसाहेबांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे…”

काय करावं, जाऊन सांगितलं तर सगळंच संपेल..आणि नाही सांगितलं तर …काय करू..
इतक्यात ती बघते… घरातला गडी सर्वांना चहा घेऊन जात असतो..

“शिरप्या..इकडे ये..” शिखा त्याला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगते..

“बाईसाहेब हे काय सांगताय करायला..”

“शिरप्या, तुला बोल बसतील पण आपलं खूप मोठं नुकसान टळेल…ऐक माझं..”

शिरप्या काहीही न बोलता निघून जातो..त्याच्या मनात काय चाललंय, त्याने होकार दिला की नकार काहीच समजेना..

शिरप्या ट्रे घेऊन पुढे जातो आणि सर्वांसमोर ठेवतो..
रावसाहेब कागदपत्रावर सही करायला पेन पुढे करताय इतक्यात शिरप्या एक कप हातात घेऊन त्यावर चहा सांडतो..

“माफ करा साहेब..चुकून झालं..मी करतो साफ..”

एवढं म्हणत शिरप्या ते ओले कागद असे गोळा करतो की त्यांचे तुकडे पडून जातात..

“शिरप्या..अरे तुला काही लाज, किती महत्वाचं काम होतं हे..नीट काम करता येत नाही का तुला..” सुधीर चिडतो..

“माफ करा साहेब..”

“सुधीर जाऊदे..गडी माणूस…”

“अहो पण किती मुश्किलीने कागदपत्र तयार केलेली..आता पुन्हा सगळं बनवायला 8 दिवस जाणार..”

“हरकत नाही, आठ दिवसांनी करू..”

शिखा आणि सासूबाई सुस्कारा टाकतात..तात्पुरता टेन्शन मिटलेलं असतं.. पण जमीन अजूनही संकटात होती…आठ दिवसांनी सुधीर कागदपत्र घेऊन पुन्हा येणार होता..

एके दिवशी रात्री शिखा आणि लहान सासूबाई शिरप्या ला घेऊन कुदळ घेऊन जमिनीवर जातात..आणि कुणाला समजायच्या आत घरी येतात..

____

सुधीर यायच्या एक दिवस आधी..

“रावसाहेब… मला काल रात्री एक स्वप्न पडलं..”

“कसलं??”

“आपल्या त्या जमिनीवर मंदिर उभार असं माझ्या स्वप्नात देवी येऊन सांगून गेली..”

“अगं पण ती जमीन आता सुधीरला द्यायची आहे आणि त्यावर कारखाना उभारला जाणार आहे..”

“पण माझं स्वप्न?? एक काम करा, मला तिथे घेऊन चला..”

शिखा, सासूबाई आणि रावसाहेब तिथे जातात..

“काय गं.. आलो बघ आपण इथे..आता??”

“या जमिनीत काहीतरी आहे..माझं मन मला सांगतय..”

“लगेच बघू की ताई… मी कुदळ आणली आहे सोबत..” शिरप्या म्हणाला..

“तू कधी आलास??”

“तुम्ही जाताना दिसले मग आलो तुमच्या मागे..”

शिरप्या जमीन खोदायला सुरवात करतो..मुद्दाम आजूबाजूला खोदून ठेवतो.. तिथे काहीही नसतं..

“काही नसेल रे..”

“थांबा..इथे बघतो..”

तो खोदायला सुरवात करतो आणि एका पितळाच्या मूर्तीचा मुकुट वर दिसतो..रावसाहेब चमकतात…

“हे काय??”

शिरप्या अजून खोदून देवीची मूर्ती बाहेर काढतो..

“माते… भाग्यवान आहे मी…दर्शन दिलंस तू मला..शिरप्या, जा गावात दवंडी पीट… इथे एक मोठं मंदिर उभारले जाईल.. ”

रावसाहेब मूर्तीच्या घटनेने एकदम भारावून जातात..

“रावसाहेब पण सुधीर..”

“सुधीर मोठा की देव?? त्याला नाही सांगेन मी..”

सासूबाई आणि शिखा मोठ्या संकटातून रावसाहेबांना वाचवतात..

____

शिखाच्या आर्टिकल्सचे विविध स्तरातून कौतुक होत असते..तिच्या याच कामामुळे तिला एक विशेष पत्रकारितेचा अवॉर्ड जाहीर होतो आणि तो स्वीकारायला तिला शहरात बोलावण्यात येतं..

इकडे राबसाहेबांना एक फोन येतो..

“रावसाहेब, प्रामाणिक समाजसेवक म्हणून तुम्ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहात..तुमच्या हस्ते काही दिग्गजांचा सत्कार करायचा आहे, यायला जमेल??”

क्रमशः

Leave a Comment